मौखिक आरोग्य चांगले असेल, तर शरीराचे आरोग्य चांगले राहू शकते. यामध्ये दातांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. आपण खात असलेले अन्न नीट पचन होण्यासाठी सर्वप्रथम ते नीट प्रकारे चावले गेलेले असणे आवश्यक असते. यासाठी दात सुस्थितीत असणे आवश्यक असते. म्हणूनच लहानपणापासून आपल्याकडे दातांची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला जातो; पण लहान मुलांना सतत काही तरी गोड खायला आवडते. त्यामध्ये गोळ्या, चॉकलेट, लॉलीपॉप हे असतेच. त्यातून मुलांच्या दात किडणे, दंतदुखी या समस्या वाढत जातात.
बाळांचे दात किडणे हे चिंताजनक आहे; कारण त्यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि तो पसरूही शकते. योग्य काळजीअभावी ते गंभीर आजाराचे रूप धारण करू शकते. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम आईने आणि गर्भवती स्त्रियांनी आपल्या मौखिक आरोग्याची योग्य काळजी घ्यायला हवी. रोजच्या दिनक्रमात दात घासणे, तोंड धुणे आणि योग्य आहाराचा समावेश करणे, त्याचबरोबर दातांच्या डॉक्टरांकडून दातांची, तोंडाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आईकडून बाळाला दात किडणार्या जंतूंचे संक्रमण रोखता येऊ शकेल.
लहान बाळासाठी बाटली वापरत असाल, तर त्यातून आईचे दूध, बाहेरचे दूध किंवा पाणी देण्यासाठी ती वापरा. त्या बाटलीमधून फळांचे रस, सोडा किंवा कोणतेही गोड पातळ पदार्थ देऊ नका. झोपणार्या बाळाला बाटलीतून केवळ पाणी पाजा. बाकी कोणतेही पातळ पदार्थ झोपताना देऊ नये. बाळ थोडे मोठे झाले असेल तर त्याला फळांचे रस द्या, हळूहळू जेवण आणि इतर पदार्थांचे प्रमाण वाढवा. बाळाला चोखणी देत असाल, तर साखर किंवा मधात बुडवून देऊ नका. जर ती चोखणी खाली पडली आणि पुन्हा दिल्यास बाळाच्या तोंडात संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे त्याचे दात किडू शकतात. लहान मुलांना गोड पदार्थ कमी प्रमाणात द्यावेत. त्याऐवजी पोषक आरोग्यदायी असे दूध, दाण्याचे लोणी, फळे आणि भाज्या असा आहार द्या.
बाळाला दूध पाजल्यानंतर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात स्वच्छ रुमाल बुडवून तो त्याच्या हिरड्यांवरून हळूवारपणे फिरवा, जेणेकरुन त्याच्या हिरड्या आणि तोंड स्वच्छ राहील. बाळाला पहिले दात येतील तेव्हापासूनच त्याचे दात दिवसातून दोन वेळा मऊ ब्रशने घासावेत. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडिआट्रिक डेन्टीस्ट्रीच्या म्हणण्यानुसार, दातांवर पडणारे डाग टाळण्यासाठी टूथपेस्टचा वापर करण्यास हरकत नाही. 2 ते 5 वर्षांच्या मुलांचे दात घासण्यासाठी शेंगदाण्याएवढी टूथपेस्ट घेऊन मुलांना दात घासण्याची सवय लावावी. मुलांच्या हातात ब्रश देऊन दात घासण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.