डॉ. प्राजक्ता पाटील
साधारण तीस वर्षांपूर्वी मुलांच्या संगोपनाची पद्धत आणि आजची संगोपनाची पद्धत यात खूप फरक आहे. त्यावेळी लहान मुले आणि पालक किंवा घरातील, शेजारची मोठी माणसे यांच्यात संवाद होत होता. मुलांना पडत असलेल्या प्रश्नांना कुठे ना कुठे उत्तरे मिळत असत. मुळात मुलांचे विश्वच वेगळे होते. आता परिस्थिती खूप बदललेली आहे.
कुटुंबात एकच मुलगा किंवा मुलगी असते. भावंड असेल तर त्यांच्या वयात पाच ते सात वर्षांचे अंतर असते. त्यामुळे मुले काहीशी एकलकोंडी असतात. त्यांना व्यक्त व्हायला योग्य व्यासपीठ मिळत नाही आणि त्यातून त्यांचे मानसिक आरोग्य ढासळत जाते. म्हणूनच आपल्या मुलांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याची काळजीही पालकांनी, शिक्षकांनी घेण्याची गरज आहे.
चौथीत जाणार्या अनुजाने आपल्या हाताला चाकूने जखम करून घेतल्याचे पाहून तिच्या आईला धक्काच बसला. शाळेत काही कारणांनी मित्रमैत्रिणींनी चिडवल्यामुळे झालेला अपमान तिला सहन झाला नव्हता. अनुजा एकटीच. साहजिकच आई-बाबा, आजी-आजोबा तिचा शब्द खाली पडू देत नव्हते. तिला हवी ती गोष्ट तिच्या तोंडातून शब्द पडायचा अवकाश तिला मिळत असे. आई-वडील दोघेही नोकरी करणारे. घरात तिच्याबरोबर आजी-आजोबा असत; पण शाळेव्यतिरीक्त तिच्याबरोबर तिच्या वयाची मुले खेळायला, अभ्यास करायला नसत. शाळेतून आल्यानंतर वेगवेगळे क्लास आणि होमवर्क यातच ती गर्क होऊन जात असे. कदाचित म्हणूनच चार मुलांमध्ये मिसळून कसे वागायचे, कसे खेळायचे, कुणी चिडवले तर कसे उत्तर द्यायचे, कुणी मारले, रागावले तर काय करायचे हेच तिला माहीत नव्हते. घरात कुणी तिला नाही म्हणत नव्हते त्यामुळे तिला कुणाकडून नकार घेण्याचीही सवय नव्हती. तिच्या स्वभावात एक प्रकारचा एककल्लीपणा आला होता आणि शाळेत तिच्या बरोबरीच्या मुलामुलींशी जुळवून घेणे तिला जमत नव्हते. अशा वेळी शाळेत काहीतरी चिडवाचिडवी झाली आणि त्यात प्रतिकार करता न आल्यामुळे संतापून तिने स्वत:लाच जखम करून घेतली होती.
हे पाहून घरातले सगळेच चिंतेत पडले; पण सुदैवाने अनुजाच्या शाळेने त्यांची मदत केली. शाळेच्या मनोचिकित्सा तज्ज्ञांनी अनुजाच्या समस्यांवर तोडगा दिला आणि तिच्यातील उणिवांची तिला अतिशय संवेदनशीलपणे जाणीव करून दिली. तिच्या पालकांशीही चर्चा केली, त्यांचेही कौन्सिलिंग केले. आता अनुजा हळूहळू आपल्या मानसिक अस्थिरतेतून बाहेर पडत आहे.
हल्लीच्या बदलत्या आणि वेगवान युगात लहान मुलांचे विश्व कुठेतरी हरवल्यासारखे झाले आहे. मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. अगदी लहान वयापासून त्यांना विविध स्पर्धा, त्यासाठी क्लासेस, अभ्यास, अभ्यासाचे क्लासेस यात अडकवून ठेवले जाते. मुक्तपणे जगायला, हुंदडायला त्यांना वावच नाही. म्हणूनच लहान मुलांचा होणारा कोंडमारा बाहेर पडायला काही जागा नाही अशी स्थिती आहे. म्हणूनच मग आता लहान मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे.
लहान मुलांचे मानसिक आरोग्य
लहान मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी अतिशय सावधानतेने घ्यावी लागते. शाळेतील एखाद्या विषयाला घाबरण्यासारख्या साध्या समस्येपासून ते एखाद्याच्या दादागिरीला सामोर जाण्यापर्यंत आणि त्यातून समाजात मिसळण्याची भीती या गुंतागुंतीच्या समस्यांपर्यंत अनेक समस्या असतात. आपल्याकडे अजूनही मानसिक समस्या लपवण्याकडेच कल असतो. त्यामुळे मुलांना काही मानसिक समस्या असल्या तरी त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापेक्षा कौटुंबिक पातळीवरच आपल्याला हव्या त्या मार्गाने त्यावर तोडगा काढण्याकडेच जास्त कल असतो. त्यामुळे लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन, कौन्सिलिंग मिळतेच असे नाही. म्हणूनच याबाबत शाळांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची अत्यंतिक गरज असते. अशा मुलांना जिथे सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा ताण हलका करण्याची गरज असते. अलीकडे मुलींना मासिक पाळीसंदर्भात शाळांमधून शिक्षण दिले जाते. त्यामुळे या प्रक्रियेला मुली घाबरत किंवा बुजत नाहीत असे दिसून येत आहे. त्याच धर्तीवर मुलांना मानसिक आरोग्याचीही जाणीव शाळांमधून करून दिली तर मुले आपल्या समस्यांना धैर्याने सामोरे जातील, असे तज्ज्ञांना वाटते. मुलांना मानसिक आरोग्याच्या वेगवेगळ्या स्थितींविषयी शिक्षण दिले पाहिजे, त्यातून मुले त्यांच्यासमोर येणार्या आव्हानांचा मुकाबला प्रभावीपणे करू शकतील. जर शाळेतच असा एखादा कौन्सिलर असेल आणि योग्य वेळी त्याची योग्य मदत झाली तर त्यातून मुलांच्या अनेक मानसिक समस्या दूर व्हायला चांगली मदत होईल.
अशा प्रकारच्या कौन्सिलिंचा मुलांना फायदा होईल. अभ्यासाचा ताण, चांगल्या कॉलेजमध्येच प्रवेश मिळायला हवा, हा पालकांचा आग्रह आणि त्यातून येणारे दडपण, सामाजिक आयुष्यात अधिकाधिक वरचढ होण्याची ईर्ष्या, तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर, त्यातून वाढलेला सोशल मीडियाचा उपद्रव. सोशल मीडिया तर अगदी लहानपणापासून मुलांच्या अंगात भिनलेला असतो. याचे चांगले-वाईट परिणाम त्यांच्या मनावर होत असतात. शाळेत जर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना मिळाला तर चांगले नागरिक घडण्याच्या द़ृष्टीने ते हितकारकच असणार आहे.
शिवाय एरवी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे आपल्या पाल्याला घेऊन जाताना पालक कानकोंडे होतात. वास्तविक पाहता मानसिक समस्या असणे म्हणजे मानसिक आजार नव्हे; पण आपल्याकडे अजूनही मानसिक समस्यांना आजार समजून एकदम टोकाचा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी पालक मुलांच्या मानसिक समस्यांकडे एक तर दुर्लक्ष करतात किंवा आपल्या मनाने काहीतरी उपाय करत राहतात. यामुळे ती समस्या बळावत जाते; पण हेच शाळेतच त्या पाल्याला कौन्सिलिंग मिळाले तर शाळेतला एक विषय शिकता शिकताच त्याला त्याच्या मानसिक समस्यांवरील उत्तरे मिळतील आणि त्याचा गवगवाही होणार नाही. शिवाय शाळेत मानसिक समस्या असलेले आपल्यासारखे आणखीही विद्यार्थी आहेत हे समजल्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंडही राहणार नाही. आज पालकांना पाल्यांसाठी द्यायला वेळ नसतो.
लहान मुले आणि किशोरवयीन मुले आपले एकाकीपण स्मार्टफोनच्या संगतीत घालवण्याचा प्रयत्न करत असतात; पण त्यामुळे ती अधिक एकाकी होतात. वास्तविक पाहता सीबीएसईच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळांमध्ये पूर्ण वेळ कौन्सिलर असणे आवश्यक आहे. पण अॅसोचेमच्या अहवालात नमूद केले आहे की, देशातील केवळ तीन टक्के शाळांमध्ये पूर्ण वेळ कौन्सिलर आहे. आपल्या देशात कुटुंबे लहान होत चालली आहेत. प्रत्येक जणच एकाकी होत आहे आणि मुले तर जास्तच एकाकी होत आहेत. लहानपणापासूनच त्यांना मानसिकद़ृष्ट्या सुद़ृढ आणि तंदुरुस्त ठेवले तरच पुढे सामाजिक भान असलेले नागरिक तयार होतील.