

डॉ. महेश बरामदे
कामकाजाच्या प्रदीर्घ दिवसानंतर होणारी डोकेदुखी ही सामान्यतः ताण किंवा थकव्यामुळे होते असा अनेकांचा समज असतो; परंतु ही समस्या दररोज उद्भवू लागली, तर दैनंदिन दिनक्रमाची तपासणी करणे अत्यंत गरजेचे ठरते.
गेल्या काही वर्षांत आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या काही सवयींमुळे डोकेदुखीची समस्या तीव्र गतीने वाढत आहे. बिघडलेले झोपेचे वेळापत्रक हे डोकेदुखीमागचे सर्वात मोठे कारण मानले जाते. उशिरापर्यंत जागणे, पुरेशी झोप न मिळणे किंवा झोपण्याच्या वेळा अनिश्चित असणे या घटकांमुळे मेंदूची वेदना प्रक्रिया करण्याची क्षमता प्रभावित होते. विशेषतः मायग्रेनची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये यामुळे वेदना अधिक तीव्र होतात. आठवडाभरात झालेली झोपेची हानी वीकेंडला जास्त वेळ झोपून भरून काढता येत नाही. उलट यामुळे जैविक घड्याळ अधिक बिघडते.
लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनसमोर तासन् तास घालवल्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. सतत बसून काम केल्याने मान आणि खांद्याचे स्नायू आखडतात, ज्याचे रूपांतर अखेर तणावजन्य डोकेदुखीमध्ये होते. कामाच्या दरम्यान विश्रांती न घेणे आणि बसण्याची अयोग्य पद्धत या समस्येत भर घालते. आहारातील अनियमिततादेखील तितकीच घातक आहे. जेवणाच्या वेळा टाळणे, दुपारचे जेवण उशिरा करणे, पुरेसे पाणी न पिणे आणि अतिप्रमाणात कॅफिनचे सेवन करणे हे डोकेदुखीचे मुख्य कारक ठरतात. सकाळी अतिप्रमाणात कॅफिन घेणे आणि दिवसभर व्यस्त राहून घाईघाईत आहार उरकणे ही पद्धत शरीरावर विपरीत परिणाम करते.
दैनंदिन सवयीतील कॅफिन अचानक बंद केल्यास तीव्र वेदना उद्भवू शकतात. कामाचे अतिव्यस्त नियोजन, मानसिक ताण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि विश्रांतीचा अभाव यामुळे एक दुष्टचक्र निर्माण होते. एका कारणाने सुरू झालेली डोकेदुखी इतर घटकांमुळे अधिक तीव्र बनते. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःच्या सवयींची नोंद ठेवणारी डायरी सुरू करावी. संगणकावर काम करताना नियमित विश्रांती घ्यावी, आहाराच्या वेळा निश्चित ठेवाव्यात, भरपूर पाणी प्यावे आणि रोजच्या दिनक्रमात नियमित व्यायाम तसेच पुरेशा झोपेचा समावेश करावा.