

डॉ. संजय गायकवाड
‘पॉपकॉर्न लंग’ हा एक दुर्मीळ पण गंभीर फुफ्फुसांचा आजार आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रॉन्किओलाइटिस ऑब्लिटेरन्स’ असे संबोधले जाते.
‘ब्रॉन्किओलाइटिस ऑब्लिटेरन्स’ या आजारात फुफ्फुसांमधील सर्वात लहान श्वसनमार्ग प्रज्वलित होऊन त्यांना कायमस्वरूपी जखमा होतात. हे जखमांचे व्रण श्वसनमार्ग अरुंद करतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये हवा येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि श्वास घेणे उत्तरोत्तर कठीण होत जाते. हे नुकसान अपरिवर्तनीय असल्याने या आजाराची लवकर ओळख पटवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
या आजाराला ‘पॉपकॉर्न लंग’ हे नाव पडण्यामागे एक विशिष्ट कारण आहे. पॉपकॉर्न कारखान्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांमध्ये हा आजार प्रथम निदर्शनास आला होता. या कारखान्यांमध्ये पॉपकॉर्नला लोण्याचा स्वाद देण्यासाठी ‘डायसिटिल’ नावाच्या रसायनाचा वापर केला जातो. या रसायनाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे कर्मचार्यांच्या फुफ्फुसांना इजा झाल्याचे आढळून आले होते. तथापि, आता केवळ औद्योगिक रसायनेच नव्हे, तर काही व्हेपिंग उत्पादनांमधील रसायने, गंभीर श्वसनविकार, स्वयंप्रतिकारशक्तीचे आजार आणि फुफ्फुस प्रत्यारोपण यांसारख्या कारणांमुळेही हा आजार होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या आजाराची मुख्य समस्या म्हणजे याची लक्षणे दम्यासारख्या किंवा सामान्य श्वसनविकारांसारखी असतात, त्यामुळे सुरुवातीला याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. सततचा कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना घरघर असा आवाज येणे आणि शारीरिक कष्टांची क्षमता कमी होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. जर अशी लक्षणे काही आठवडे टिकून राहिली, तर त्याकडे केवळ किरकोळ समस्या म्हणून न पाहता वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे असते.
पॉपकॉर्न लंगचे निदान करण्यासाठी कोणतीही एकच चाचणी उपलब्ध नाही. डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणारी चाचणी (पल्मोनरी फंक्शन टेस्ट), हाय-रिझोल्यूशन सीटी स्कॅन आणि काही प्रकरणांमध्ये ब्रोन्कोस्कोपी किंवा फुफ्फुसाची बायोप्सी यांचा आधार घेतात.
या आजारातील फुफ्फुसांची झालेली इजा पूर्ववत करता येत नाही, परंतु लवकर निदान झाल्यास आजाराची तीव्रता वाढण्यापासून रोखता येते. उपचारांचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ज्या रसायनांमुळे किंवा घटकांमुळे फुफ्फुसांना इजा होत आहे, त्यांचा संपर्क पूर्णपणे बंद करणे. याव्यतिरिक्त, आजाराची तीव्रता पाहून इनहेलर औषधे, दाहशामक उपचार (अँटी-इन्फ्लेमेटरी), फुफ्फुसांचे पुनर्वसन आणि श्वसन सुलभ करण्यासाठी आवश्यक दिली जाते. विशेषतः ज्यांना व्हेपिंगची सवय आहे किंवा जे रासायनिक वातावरणात काम करतात, त्यांनी श्वसनाच्या कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.