Breast Cancer : दुर्लक्षाने वाढेल गुंतागुंत

Breast Cancer : दुर्लक्षाने वाढेल गुंतागुंत
Published on
Updated on

डॉ. प्राजक्ता पाटील
स्तनाची रचना संत्र्याप्रमाणे अनेक कप्प्यांसारखी असते. त्यात मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणार्‍या ग्रंथी असतात. प्रत्येक कप्प्यात दूध बोंडाकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. दूध निर्माण करण्याची क्रिया स्तनपानाच्या काळात अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते. या टप्प्यावर मुख्यतः तीन प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते- दुधाच्या गाठी व जंतुदोष-गळू इत्यादी.

दुधाच्या गाठी व जंतुदोष हा सामान्यत: आढळणारा त्रास आहे. स्तनाच्या बोंडाला चीर पडली असेल तर दुखरेपणामुळे त्या बाजूला कमी पाजले जाते. यामुळे दुधाची गाठ बनू शकते व त्यात जंतुदोष होऊ शकतो. कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा स्तनाच्या भागातले दूध बाहेर न पडता आतच राहते. इथे आधी दुधाची गाठ तयार होते. या दुधाच्या गाठी सुरुवातीला मऊ असतात,पण चार-पाच तासांतच फुगून घट्ट होतात. दुधाची गाठ असून स्तन पिळून दूध काढले नाही तर त्यात बाहेरून जंतू शिरून गळू तयार होते. एकदा जंतुदोष झाला, की त्या बाजूचा स्तन आकाराने मोठा व कडक होतो. या स्तनावर गरमपणा व दुखरेपणा आढळतो. दोन-तीन दिवसांत गळवावरची त्वचा ताणली जाते आणि आतल्या 'पु'मुळे तिथे पांढरटपणा दिसतो. जर गळू आत खोलवर असेल तर मात्र असा पांढरटपणा कदाचित आढळणार नाही. एकदा पू झाल्यावर शस्त्रक्रिया करून पू बाहेर काढणे आवश्यक असते. सामान्यत: स्तनपान चालू असताना स्तनात अशा गाठी व जंतुदोष होऊ शकतो. दुधाची गाठ होणे ही तशी पाहता जाणीवपूर्वक टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. यासाठी दोन्ही बाजूंना पाजणे व राहिलेले दूध रोज पिळून काढणे आवश्यक असते.

स्तनातल्या साध्या गाठी सहसा मध्यम वयात येतात. त्या आकाराने हळूहळू वाढतात. स्तनामध्ये ही गाठ बोटाने धरण्याचा प्रयत्न केल्यास ती हातातून सटकते. पण ही साधी गाठ आहे, की कर्करोगाची आहे हे ठरवणे अवघड असते. त्यासाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे जाणे चांगले. आता अशा स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांसाठी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. हा कॅन्सर स्त्रियांना 35-55 या वयात होण्याची शक्यता असते. हा कॅन्सर होण्यामागे सामान्यत: कारणे पुढीलप्रमाणे असतात- स्थूलता म्हणजे चरबी वाढणे, स्तनभार जास्त असणे, खाण्यामध्ये तेल-तूप जास्त असणे, संततीप्रतिबंधक गोळ्यांचा दीर्घकाळ वापर, अपत्य नसणे. अर्थात यात काही आनुवंशिक कारणेदेखील असतात. ज्या स्त्रिया एकूणच स्तनपान कमी करतात त्यांना कर्करोगाचा धोका थोडा जास्त असतो, असेही आढळून आले आहे.

या कॅन्सरचे रोगनिदान करण्याच्या काही मान्य पद्धती आहेत. न दुखणारी छोटी गाठ किंवा गोळ्याने स्तनाच्या कर्करोगाची सुरुवात होते. नंतर स्तनांमध्ये दुखरेपणा आणि बोंडावर थोडा रक्तमिश्रित स्राव होऊ शकतो. त्या स्तनाचे बोंड ओढलेले किंवा संकुचित असू शकते. काखेमध्ये गाठी असतील तर मात्र कर्करोग वाढल्याची खूण मानली जाते. या पार्श्वभूमीवर, स्तनाच्या कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होणे कधीही चांगले, हे आपल्या लक्षात आलेच असेल. त्यासाठी आपण आपल्या स्तनांची दरमहा एकदा तरी हाताने चाचपणी करणे चांगले. यासाठी घड्याळाच्या दिशेप्रमाणे क्रमश: स्तन तपासा. यात एखादी गाठ किंवा गोळा जाणवला तर ते महत्त्वाचे आहे. अर्थात प्रत्येकच गाठ किंवा गोळा कर्करोग नसतो नाही हेही लक्षात ठेवा. पण गाठ आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. किंवा डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करू नका. नक्की खात्री करण्यासाठी त्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक तपासणी करावी लागते. सुईने हा नमुना घेता येतो. मॅमोग्राफी या एक्स-रे चित्रातून स्तनातील छोट्या गाठीही शोधता येतात. ही तपासणी चाळिशीनंतर जास्त भरवशाची असते. एम.आर.आय. तपासणी ही जास्त चांगली पण खर्चिकही असते.

तज्ञमंडळी असं सुचवतात की, सर्व स्त्रियांनी स्वत:च्या स्तनांची तपासणी करायला शिकायला पाहिजे. आपण आपली तपासणी पाळीनंतर चार-पाच दिवसांनी किंवा महिन्याच्या ठरावीक तारखेला करायला हवी. रजोनिवृत्तीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी तपासणी करणे चांगले. स्तन कर्करोग वेळीच काढला तर पुढे आयुष्यात तो परत होण्याचा धोका कमी होतो. पण यासाठी कर्करोगाचा प्रकारही महत्त्वाचा असतो. निस्तेजपणा किंवा वजन घटणे हे कर्करोग बळावल्याचे चिन्ह असू शकते, तेव्हा त्याबाबत सतर्क राहाणे चांगले. स्तन कर्करोगाचा प्रकार आणि प्रसार यावर उपचार अवलंबून असतात. कर्करोगाच्या छोट्या गाठी काढून टाकता येतात. मात्र गाठ मोठी असली तर तो स्तन आणि काखेतील गाठी काढाव्या लागतात. या शस्त्रक्रियेनंतर किरणोपचार लागू शकतात. स्तन कर्करोगासाठी शस्त्रक्रियेनंतर कॅन्सरविरोधी औषध योजना केली जाते. यामुळे परत कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news