

सकाळची सुरुवात गरमागरम कॉफीने करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेकांसाठी हा केवळ झोप उडवण्याचा एक मार्ग असतो. पण, तुम्ही जर सलग एक महिना दूध आणि साखरेविना, म्हणजेच 'ब्लॅक कॉफी' पिण्याचा नियम केला तर काय होईल? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा छोटासा बदल तुमच्या शरीरात आश्चर्यकारक फायदे घडवू शकतो. मात्र, त्याचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ब्लॅक कॉफीला केवळ वजन कमी करण्याच्या ट्रेंडपुरते मर्यादित न ठेवता, तिच्या आरोग्यदायी फायद्यांकडे पाहिल्यास अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.
ऊर्जेचा तात्काळ स्रोत: ब्लॅक कॉफीमधील कॅफिन थेट मज्जासंस्थेवर परिणाम करते, ज्यामुळे आळस दूर होऊन दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. सकाळी एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास कामावर लक्ष केंद्रित करण्यासही मदत होते.
वजन नियंत्रणासाठी प्रभावी: ब्लॅक कॉफी शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) गतिमान करते. यामुळे अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. पोटाच्या आरोग्यासाठीही ती फायदेशीर ठरते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मधुमेहाचा धोका कमी: विविध संशोधनांनुसार, नियमितपणे मर्यादित प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणाऱ्यांमध्ये टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी झाल्याचे दिसून आले आहे. हे स्वादुपिंडातील (Pancreas) बीटा पेशींचे कार्य सुधारते, जे इन्सुलिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात.
मेंदूसाठीही फायदेशीर: ब्लॅक कॉफीमुळे मेंदूला चालना मिळते. अल्झायमर आणि डिमेन्शियासारख्या विस्मरणाच्या आजारांचा धोका कमी करण्यास ती मदत करते. यामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक थकवा दूर होतो.
चमकदार त्वचेसाठी: कॉफी एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढून त्वचा आतून स्वच्छ (Detox) करते. यामुळे मुरुमे, पिंपल्स कमी होतात, सीबम निर्मिती नियंत्रणात राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
मात्र, ब्लॅक कॉफी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेलच असे नाही, "ज्या व्यक्तींना ऍसिडिटी, पित्ताचा त्रास किंवा पचनाच्या गंभीर समस्या आहेत, त्यांनी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे टाळावे."
आयुर्वेदानुसार कॉफीची प्रकृती 'पित्तवर्धक' मानली जाते, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचे सेवन करू नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे आणि आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार निर्णय घेणे हेच आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते.