

हिवाळ्यात व्यायाम सुरू करणे फायदेशीर असते. हिवाळ्यात घाम कमी येतो, हवा सुसह्य असते. त्यामुळे व्यायाम केल्यावर अधिक फ्रेश वाटते. व्यायामामुळे शरीराची आणि स्नायूंची क्षमता वाढते. शरीराला पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. व्यायामाचा अतिरेक होता कामा नये. उत्तम मार्गदर्शकाच्या सल्ल्याने तो करावा.
मनात आले आणि लगेच भरपूर प्रमाणात कोणताही व्यायाम सुरू केला, असे करून चालत नाही. कोणाचे तरी अनुकरण करून दोन दोन तास व्यायाम करतात, जिममध्ये जातात, वजने उचलतात. परंतु ते प्रत्येकाच्या शरीराला झेपणारे नसते. त्यामुळे आधी ब्रिक्स वॉकिंग, पोहणे, सूर्यनमस्कार, चालणे, धावणे असे सोपे व्यायामप्रकार करणे उत्तम. त्यानंतर हळूहळू व्यायामाचा वेळ आणि आवर्तने वाढवत न्यावीत.
एकाच दिवशी वेगवेगळे व्यायाम प्रकार थोडा-थोडा वेळ करण्याची चूक केल्याने शरीराला नुकसानच होते. कोणताही व्यायाम योग्य पद्धतीने आणि ठराविक वेळ केल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे एका व्यायाम प्रकाराला पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे आहे. आठवड्यात दोन दिवस एक व्यायाम प्रकार करावा किंवा एक दिवसआड अशा पद्धतीनेही व्यायामाचा मेळ घालून वेळापत्रक तयार करता येईल. काही व्यायाम प्रकार शरीराची लवचिकता वाढवतात, तर काही व्यायाम प्रकार स्नायूंची क्षमता वाढवतात. त्यामुळे दोन्ही व्यायाम प्रकारांचा मेळ घालून तो केला जावा आणि त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ नियोजनपूर्वक राखून ठेवावा. वेळ पुरत नाही म्हणून व्यायाम कसाबसा उरकता येत नाही.
कोणताही व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप आणि कूल डाऊन करणे महत्त्वाचे. अचानक व्यायाम सुरू केल्यास वाढत्या वयात स्नायू आणि सांध्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे गरजेचे. त्यामुळे स्नायूंना हालचालीची सवय होते. वॉर्मअप केलेले नसते, तेव्हा स्नायू व्यायामासाठी तयार नसतात. अर्धा- पाऊण तास पळाल्यानंतर वेग हळू हळू कमी केला पाहिजे. तसेच व्यायामाचेही असते.
हिवाळ्यात योग केल्यास शरीर उबदार आणि लवचिक राहते. अन्नपचन सुधारते. विशेष म्हणजे थंडीत केलेल्या योगासनांचे फायदे पुढे ७-८ महिने होतात. पुढील ऋतुचक्रासाठी शरीर तयार होते. नियमित योगासनांमुळे शरीर आणि मन उल्हसित राहते. थंडीत सूर्यनमस्कार, पर्वतासन, वीरभद्रासन, मत्स्यासन, हलासन, सर्वांगासन करतात.