

आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनक्रियेचे योग्य रीतीने चालणे अत्यावश्यक असते. पचनतंत्र नीटस चालत नसेल, तर शरीरात अपचन, गॅस, जडपणा, मळमळ, आम्लपित्त अशा अनेक तक्रारी होतात. योग्य पचनामुळे शरीराला पोषण मिळतं, ऊर्जा वाढते आणि प्रतिकारशक्तीही मजबूत होते. शिवाय मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
मात्र, अनेकदा लोक नकळत काही चुकीच्या सवयी करतात ज्या पचनक्रियेस अडथळा आणतात. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी अशाच काही सवयींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, जी आपण टाळल्यास आपली पचनक्रिया सुधारू शकते.
बरेच लोक जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय लावून घेतात. मात्र, डॉक्टर सांगतात की हे आरोग्यासाठी घातक असू शकते. जेवणानंतर झोपल्याने शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोट बिघडण्याची शक्यता वाढते.
जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिणे पचनावर विपरीत परिणाम करू शकते. तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी आणि लगेच नंतर पाणी पिणं टाळावं. यामुळे पचन प्रक्रिया बिघडते आणि अन्न योग्य प्रकारे पचत नाही.
जेवणानंतर स्नान केल्यास शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे पचन क्रिया मंदावते. स्नान किमान २ तासांनी करावं. त्याचप्रमाणे, जेवणानंतर त्वरित पोहणे किंवा दीर्घ पायपीट करणं वर्ज्य आहे, कारण यामुळे वात वाढतो आणि पचनात अडथळा निर्माण होतो. तसेच, जेवणानंतर लगेच अभ्यास करणेही टाळावं, कारण यामुळे एकाग्रता आणि पचन दोन्हीवर परिणाम होतो.
जेवणानंतर वज्रासनात बसल्यास खालच्या पोटात रक्तप्रवाह वाढतो आणि मेटाबॉलिझम सक्रिय होतो. त्यामुळे गॅस, आम्लपित्त, अपचन, आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, जेवणानंतर १०–१५ मिनिटांची हळूहळू चालणंही उपयुक्त ठरतं.