त्रासदायक चिडचिडेपणा आणि आयुर्वेद | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

राग येणे हा एक मनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला न पटणार्‍या, नकोसे वाटणार्‍या, न आवडणार्‍या गोष्टींवर, घटनांवर दिली जाणारी ती एक मनाची नैसर्गिक प्रतीक्षिप्‍त क्रिया आहे. त्यामुळे अशा मोठ्या गोष्टीवर चिडणे हे स्वाभाविक असते; पण ज्यावेळी राग ही भावना छोट्या आणि क्षुल्लक बाबीवर घडू लागते किंबहुना अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय राग उत्पन्न होतो अथवा व्यक्‍त होतो, त्यावेळी मग आपण त्यास 'चिडचिड' होणे असे म्हणतो. 


काही वेळा विनाकारण होणारी चिडचिड आपल्या स्वत:च्या लक्षात येते, तर अनेकदा आपल्या सानिध्यातील व्यक्‍तीला ती जाणवत असते.

चिडचिड होण्याचे दुष्परिणाम –

प्रमाणापेक्षा जास्त चिडचिड होऊ लागल्यास कामातील एकाग्रता कमी होते. कामातील आनंद, समाधान मिळत नाही. मनःशांती ढळते, अस्वस्थपणा वाढलेला असतो, निर्णय चुकीचे घेतले जातात. शरीरावर दुष्परिणाम होतो. भूक कमी लागते, पित्ताचे प्रमाण वाढून पचन बिघाड उत्पन्न होऊ शकतात. अन्‍न अंगी कमी लागते, शरीरप्रकृती सुधारत नाही. रक्‍तदाब वाढू शकतो. अतिप्रमाणात रागाचा पारा चढल्यावर क्वचित वेळी हृदयविकार उद्भवल्याचे देखील आढळते.

सतत चिडचिडेपणामुळे सानिध्यातील व्यक्ती दुखावतात आणि कालांतराने दुरावतात. मित्रमैत्रिणी, नातेवाईक कमी हातात. तुम्हाला ते टाळू लागतात. यातूनच मग नंतर एकटेपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे नैराश्य आणि पुन्हा अधिकच चिडचिड वाढणे असे होऊ शकते. काही वेळा आत्मविश्‍वास कमी होतो. कार्यक्षमता कमी होते, कदाचित काम पार पडते; पण ते केल्याचे समाधान मिळत नाही. एकंदर चिडचिडेपणा हा प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास शरीर स्वास्थ्य, मनःस्वास्थ्य, सामाजिक संबंध, नातेसंबंध इ. अनेक गोष्टींवर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे चिडचिडेपणाच्या उपचारांकडे प्रत्येकजणाने वेळीच लक्ष द्यायला हवे, असे मला वाटते.

चिडचिडेपणाची कारणे –

चिडचिडेपणावर उपचार करताना केवळ डोके शांत ठेवणारी अथवा झोपेची गोळी घेणे अशा स्वरूपाचे तात्पुरते उपचार घेण्यापेक्षा चिडचिड होण्याचे मुख्य कारण शोधून त्याचे उपचार करणे हा खरा शास्त्रीय उपचार असतो. त्यामुळे चिचिडेपणाची कोणती कारणे असतात, याची माहिती असायला हवी.

शरीरामध्ये डोक्यापासून पायापर्यंत कोठेही असणारी वेदना ज्यावेळी थोडी जास्त असते, सतत राहते, लवकर बरी होत नसते, त्यावेळी चिडचिडेपणा वाढलेला असतो. जुनाट सर्दी, डोकेदुखी, दातदुखी, कानात आवाज येणे, ऐकू कमी येणे, सतत तोंड आलेले असणे, त्यामुळे खाता न येणे, उर्ध्व आम्लपित्त, दमा त्यामुळे सतत दम लागत असणे, उच्च रक्तदाब, पोट जड राहणे, पोट साफ न होणे, लघवीला सतत आग होणे, त्याजागी खाजणे, रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने अंगावर सतत सूज येणे, वाढलेले वजन, सोरायसिस, कावीळ, लिव्हर विकार, थायरॉईडचे विकार, रक्तातील हिमोग्लोबिन, कॅल्शियम कमी असणे, जास्त थकवा असणे, शक्तीपेक्षा जास्त काम कमी असणे, मासिक पाळीवेळी पोटदुखी, हार्मोन्समधील असंतुलन, पाळी बंद होण्याच्या काळी अर्थात मेनोपॉझ, मायग्रेन प्रकारची डोकेदुखी, शारीरिक, वैवाहिक संबंध असमाधानकारक होत असणे, नपुसंकत्व, अतिस्थूलपणा इ. शारीरिक कारणे असतात. सतत मनाविरुद्ध घटना घडत राहिल्याने आलेले तीव्र नैराश्य, अतिप्रमाणात चिंताग्रस्तता, अत्याधिक भीती, वाढलेला मानसिक तणाव, लहान मुलात पोषण कमी पडत असणे, हातपाय दुखणे, अभ्यासाचा ताण, घरात जाचहाट, ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी सतत दबावाखाली काम करावे लागणे, यामुळे वाढत जाणारा ताणतणाव, आर्थिक विवंचना, मानसिक कोंडमारा इ. मुळे चिडचिडेपणा वाढलेला असतो.

आयुर्वेदिक उपचार –

अनेक जण चिडचिडेपणावर एखादी टेन्शनची गोळी म्हणून काही आधुनिक रासायनिक औषधे घेत असतात. काहींना त्याची सवय जडलेली असते. काहींना दुष्परिणामही होऊ लागले असतात. असे करत राहण्यापेक्षा तज्ञ वैद्याकडून शास्त्रीय आयुर्वेद उपचार होणे अधिक लाभदायी आणि सुरक्षित असल्याचे जगभरात आढळून येत आहे.

आयुर्वेदीय उपचार करणार्‍या रुग्णाचे वय, व्यवसाय, वजन, आहार, व्यसने, पचन, चिडचिड व्यतिरिक्त होणार्‍या इतर तक्रारी, सुरू असणारी औषधे, शारीरिक मानसिक ताणतणाव इ. संबंधी सखोल माहिती घेऊन त्यानंतर अष्टाविध परीक्षा करून चिडचिड होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जातो व त्यानंतर या कारणारूप असणार्‍या विकारांवरील उपचार आणि मनोबल वाढविणारे, मन:शांती प्रस्थापित करणारे उपचार अशा स्वरूपात उपचार दिले जातात.

औषधी उपचार –

आयुर्वेदातील अश्‍वगंधा, जटामांसी, शंखपुष्पी, ज्योतीष्मती, ब्राह्मी, तगर, दशमूळ इ. वनस्पतीज आणि अभ्रक, मक्षिका, रौप्यभस्म, सुवर्णभस्म इ. च्या एकत्रीकरणातून तयार झालेली औषधे पोटात घेण्यासाठी दिली जातात. औषधी उपचारांच्या जोडीलाच ध्यान, नामस्मरण, संकीर्तन, प्राणायाम, योगासने या गोष्टींचा वापर असे विकार पुन्हा उत्पन्न होऊ नये म्हणून मनोबल वाढविण्यासाठी अतिशय उपयोगी पडतो.

थोडक्यात काय? चिडचिडेपणा वाढला असल्यास त्याचे दुष्परिणाम होण्यापूर्वीच आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने पंचकर्म औषधे आणि यांच्या त्रिवेणी उपचारांनी योग साधना याने त्यावर विजय मिळविता येतो.

पंचकर्म रामबाण-

चिडचडीच्या त्रासामध्ये विविध औषधी तेलाने केले जाणारे हेडमसाज, सर्व शरीराला अभ्यंग अथवा मसाज, औषधी तेल नाकात टाकून केले जाणारे नस्यकर्म, डोक्यावर औषधी तेलाने संततधार म्हणजे शिरोधारा, काही वेळा शिराबस्ती हे उपचार रामबाण इतक्या प्रमाणात अत्यंत उपयोगी ठरत आहेत. काहीवेळा गरजेनुसार बस्ती, निरूह बस्ती, विरेचन यांचाही उपयोग केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news