Akshay Kumar diet plan: अक्षय कुमारच्या फिटनेसच्या सवयी: झोप, व्यायाम आणि आहाराबद्दलची माहिती

अभिनेता अक्षय कुमारने एका मुलाखतीत त्याच्या या आरोग्याचे गुपित शेअर केले असून, चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी '८-८-८' या खास नियमाचा सल्ला दिला आहे.
Akshay Kumar diet plan
Akshay Kumar diet planfile photo
Published on
Updated on

Akshay Kumar diet plan

मुंबई: चित्रपटसृष्टीत 'खिलाडी' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार वयाच्या ५८ व्या वर्षीही आपल्या अद्भूत फिटनेसने तरुणांना लाजवतो. त्याचे पहाटे लवकर उठणे आणि कडक शिस्तीचे पालन करणे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकतेच अक्षयने एका मुलाखतीत त्याच्या या आरोग्याचे गुपित शेअर केले असून, चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी '८-८-८' या खास नियमाचा सल्ला दिला आहे.

सूर्योदय कधीच चुकवला नाही

अक्षय कुमारच्या दिवसाची सुरुवात भल्या पहाटे होते. "मी लहानपणापासून आजतागायत कधीही सूर्योदय पाहिल्याशिवाय राहिलो नाही," असे अक्षयने मिश्कीलपणे सांगितले. तो रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान झोपी जातो आणि पहाटे ४ वाजता उठतो. लवकर उठल्यामुळे दिवसातील बहुतांश कामे सकाळच्या सत्रातच पूर्ण होतात आणि इतर गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळतो, असा त्याचा अनुभव आहे. निरोगी शरीरासाठी ७ ते ८ तासांची गाढ झोप अत्यंत आवश्यक असल्याचे तो मानतो.

काय आहे अक्षयचा '८-८-८' नियम?

आपल्या दैनंदिन आयुष्यात समतोल राखण्यासाठी अक्षयने '८-८-८' चा फॉर्म्युला दिला आहे. दिवसाच्या २४ तासांची तीन भागांत विभागणी करावी ८ तास: कामासाठी, ८ तास: शांत झोपेसाठी, ८ तास: स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी. कामासोबतच कुटुंबाला आणि आरोग्याला वेळ देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे अक्षय सांगतो.

बॉडीबिल्डर नाही, तर ॲथलीटसारखी वर्कआऊट स्टाईल

अक्षय जिममध्ये जाऊन जड वजने उचलण्यापेक्षा मैदानी खेळांना आणि बॉडीवेट व्यायामाला प्राधान्य देतो. त्याच्या सकाळच्या दिनचर्येत मार्शल आर्ट्स, योगासने, पोहणे आणि धावणे यांचा समावेश असतो. शरीराची लवचिकता आणि अंतर्गत ताकद वाढवण्यासाठी तो क्लाइंबिंग आणि हँगिंगसारखे व्यायाम करतो. तसेच, शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याने तो नियमित ध्यान करतो. कोणत्याही लेट नाईट पार्ट्यांना जाणे तो पूर्णपणे टाळतो.

आहार आणि आठवड्याचा उपवास

अक्षयने वयाच्या ५३ व्या वर्षी शाकाहार स्वीकारला. त्याच्या आहारात प्रामुख्याने फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश असतो. शाकाहारी अन्नातूनही पुरेसे प्रोटीन मिळते, असा त्याचा विश्वास आहे. तो कोणत्याही प्रकारचे प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्स घेत नाही, तर घरच्या साध्या अन्नावर भर देतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी तो दिवसभरात भरपूर पाणी पितो. तसेच, पचनसंस्थेला आराम देण्यासाठी तो आठवड्यातून एकदा पूर्ण उपवास करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news