बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. बाळ जन्मल्यानंतर एका दिवसात मुलगी आई होते आणि आईपण निभवयाचं म्हणजे काय, याची कल्पना तिला पहिल्या काही तासांत पहिल्या काही दिवसांतच येते. बाळंतपण कोणत्या पद्धतीनं झालं, यावरही निश्चितच काही गोष्टी अवलंबून असतात.
नैसर्गिक प्रसूती– निसर्ग आपल्या नियमांनुसार बाळाला जन्म घ्यायला भाग पाडतो. यात बाळ स्वतः वेदना सहन करत, रडत जन्माला येतं. याचा त्रास त्यावेळी आई आणि बाळ दोघांनाही होतो. मात्र, या त्रासातून आई लवकर बरी होते. नैसर्गिक प्रसूतीमुळेही आईस काहीवेळा टाके घालावे लागतात. पहिले काही दिवस तिच्यासाठी वेदनांचे असतात; पण नंतर तिला शक्यतो कसलाच त्रास होत नाही.
सिझेरियन सेक्शन – या प्रकारात विविध कारणांमुळे आईच्या पोटावर छेद देऊन बाळाला पोटातून बाहेर काढलं जातं. त्यासाठी आईस टाके घातले जातात. त्याच्या वेदना दीर्घकाळ राहतात; पण सध्या प्रसूती कोणत्याही प्रकाराने झाली, तरी त्यानंतर काळजी ही आपणच घेतली पाहिजे, हे स्त्रियांनी स्वतःच्या मनावर ठसवलं पाहिजे.
शारीरिक वेदना – प्रसूतीसमय म्हणजे वेदना हे तर खरंच; पण हल्ली मोठ्या हॉस्पिटलमध्ये वेदनारहित प्रसूती होते. त्यामुळे आईला कोणताही त्रास न होता बाळ जन्माला येतं. यासाठी आईला पाठीत एक इंजेक्शन घ्यावं लागतं. बाळाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर काही जणींना दुखणं, रक्तस्त्राव होणे, स्तनात गाठी होणे, असं कधी-कधी होतं. त्या प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
नेमकं याचवेळी आया स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्या बाळाचे पोट भरणे, त्याची शू-शी यात दिवस-रात्र अडकलेल्या असतात. त्यांना स्वतःच्या वेदनांकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. अशा स्थितीत मातेने दुर्लक्ष केलं की, पुढे त्याचा त्यांना त्रास भोगावाच लागतो. त्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
भावनिक एकटेपण – बाळ झाल्यानंतर अनेक स्त्रियांना भावनिक एकटेपणाचा त्रास होतो. याला वैद्यकीय भाषेत प्युपेरिअल ब्लूज किंवा बेबी ब्लूज असं म्हणतात. या काळात आई खूप निराश असते. तिच्याजवळ असलेल्या बाळाला पाहून ती रडत असते. खरंतर आई होणं ही आनंदाची गोष्ट असते. याचं एक कारण असं सांगतात की, बाळ होईपर्यंत नऊ महिने सर्वांच लक्ष आईकडे असतं. बाळ झाल्यावर मात्र आईकडे कोणीच लक्ष देत नाही, यामुळे असं होतं. अचानक येणारी जबाबदारी, आई होण्यामुळे आलेली थोडी-फार बंधनं, हार्मोनल चेंज यामुळे आईला भावनिकद़ृष्ट्या एकाकी वाटतं.
आईच्या मनात अशा भावना निर्माण होण्यामागे बर्याचदा विभक्त कुटुंबपद्धती कारणीभूत आहे, असं दिसतं. पूर्वी घरात खूप माणसं असायची. बोलायला कोणी ना कोणी असायचं. मन मोकळं केलं जायचं. मन जाणणारी नातीही असायची; पण आता जर नवरा आणि बाळ या दोघांच्याच संगतीत ही नवबाळंतीण असेल तर तिला भावनिक एकटेपणा वाटू लागतो. मात्र, यावर बोलणं हा एक चांगला उपाय आहे. याबाबत डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे अतिशय गरजेचे आहे.
आईचा आहार कसा असावा?
बाळंतपण नंतर झालेली झीज भरू काढण्यासाठी भरपूर दूध-तूप, डिंकाचे लाडू द्यायची पद्धत आपल्याकडे होती, अजूनही आहे. आता डॉक्टर्स आणि आहार शास्त्रज्ञ बाळंतीण स्त्रीला पहिल्या दिवसापासून चौरस आहार घ्यायला सांगतात. बाळंतपणानंतर प्रथिनयुक्त आहार घेण्यावर भर द्यावा. नियमित आहारात सोयाबीन, अंडी, दूध, मासे, मटण, डाळी, कडधान्ये व तेलबिया यांचा समावेश करावा.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे स्तनपान करणार्या आईला पहिल्या सहा महिन्यांत रोज 16 ग्रॅम, पुढच्या सहा महिन्यांत दररोज 12 ग्रॅम आणि त्यानंतर रोज 11 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. परंतु, गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांत आणि बाळंतपणाच्या तीन महिन्यांत मुलींनी जर सुडौल शरीर राखण्याकडे लक्ष दिलं तर त्यापासून होणारे त्रास पुढे त्यांना सहन करावे लागतील. हल्लीच्या फिगर कॉन्शसनेसमुळे मुली आहार व्यवस्थित घेत नाहीत. काही मुली बाळाला स्तनपान करायलाही राजी नसतात.
बाळंतपणात योग्य आहार घेतल्यास शरीराला ताकद मिळते. याशिवाय बाळाचे आरोग्यही उत्तम राहते. प्रसूतीनंतर शरीराच्या अंतर्गत भागात बरीच मोठी उलथापालथ झालेली असते. बाळासाठी ताणलेलं गर्भाशय बाळाच्या जन्मानंतर सैल पडतं. त्यामुळे पोट अजूनही मोठंच दिसतं. पूर्वी हे पोट आत जाण्यासाठी पोटपट्टा बांधण्याची पद्धत होती. परंतु, आता डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला देतात. परंतु, व्यायाम कधीपासून करायचा, कसा करायचा, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
डॉ. मिता नखरे