कंबरदुखीची प्रत्येक व्यक्तीतील कारणे भिन्न असतात. तसेच, प्रत्येकवेळी एकच कारण असेल असे नाही. मणक्यांमध्ये जन्मत: असणारे दोष उदा. मणके चिकटलेले असणे, कंबरेचा शेवटचा मणका व माकड हाड चिकटलेले असणे आदी. सतत एका जागी बसून काम, अति प्रवास, कच्च्या रस्त्याने प्रवास, एकदम जाड वजन वारंवार उचलणे, अति प्रमाणात व्यायाम, जड वस्तू ढकलणे. या गोष्टींमुळे कंबरेच्या भागावर म्हणजेच स्नायूवर, नाड्यांवर येणारा अतिरिक्त ताण हे अनेकदा कंबरदुखी चे मुख्य कारण असते.
महिलांमध्ये गर्भवती अवस्था, प्रसूतीनंतरचा कालावधी, अचानक वाढलेले वजन यामुळेही असा ताण येतो. पाय घसरून पडणे, धडकणे, वरून खाली पडणे आदी अपघात हाणामारी जड वस्तू कंबरेवर पडणे यासारख्या कारणांमुळे कंबरेतील स्नायू, नाड्या, मणका यांना इजा पोहोचल्याने कंबरदुखी उद्भवते. काही जणात अशा आघातानंतर उपचाराने बरी झालेली कंबरदुखी नंतरच्या कालावधीत जादा ताण आल्यास थंडीमध्ये पुन्हा उद्भवत असते.
मणक्यातील दोष :
कंबरेतील मणक्याला बाक येणे, मणक्याची हाडे ठिसूळ झाल्याने होणारे फंक्चर, मणक्यातील चकती फुटणे, अथवा सरकणे यामुळेही कंबर दुखते. जंतू संसर्गाच्या परिणामी अस्थि मज्जेला सूज येणे, तसेच मणक्याला होणारा टीबीचा जंतू संसर्ग, वेगवेगळ्या संधिवाताचा प्रादुर्भाव मणक्यातील सांध्यांना होणे, मणक्याला चिकटलेले स्नायू, मांस धातू यांना सूज येणे, मणक्यातील सांध्याच्या हाडाची झीज झाल्यामुळे सूज येणे. मणक्याचा अशक्तपणा, मणक्यातील चकती झिजणे या कारणांनीदेखील कंबर दुखते.
मणक्यातील हाडांचा कॅन्सर तसेच शरीरातील इतरत्र असणार्या कॅन्सरचा प्रसार कंबरेच्या मणक्याच्या ठिकाणी झाल्याने देखील कंबर दुखते. स्त्रियांमधील स्तनांचा, गर्भाशयाचा तर पुरुषांमध्ये प्रोेटेस्टंट ग्रंथींच्या कॅन्सरच्या प्रसारामुळे कंबरदुखी उद्भवलेली सापडते.
इतर कारणे :
काही वेळा मूतखडा, पित्ताशयातील खडा, पित्ताशयाची सूज, अल्सर, हार्निया, गर्भाशयाच्या परिसरातील सूज, किडनीची सूज, प्रोटेस्टंटची सूज पोटामधील गॅसेस बद्धकोष्ठता, मूळव्याध, गुद्भ्रंश आदी विकारात कंबरदुखी आढळते.
आयुर्वेदिक उपचार
कंबरदुखीवरील आयुर्वेदिक उपचार करताना त्या रुग्णाचे वय, शरीर प्रकृती, वजन, शरीरबल, दैनंदिन काम, नियमित येणारा ताण, प्रवासाचे प्रमाण धातूंचे, धातूंचे सारासारत्व, आहाराच्या सवयी, संडास, लघवीचे प्रमाण स्वरूप, त्या विषयींच्या तक्रारी, असणारी व्यसने, पूर्वापार झालेले आघात व कष्ट या गोष्टींची सखल माहिती घेऊन नाडी परीक्षा, कोष्ठ परीक्षा आदी अष्टविध परीक्षांनी कंबरदुखीचे सखोल अचूक निदान केले जाते. व त्यानंतर उपचार सुरू केले जातात.
कंबर दुखण्याचे कारण मणक्यांशी निगडित आढळल्यास आयुर्वेदिक औषधे, पंचकर्मे, आहार, व्यायाम, योगासने यांच्या एकाचवेळी केल्या गेलेल्या सांघिक उपयोगाने काही काळाने पूर्ण लक्षणे बंद होऊन आजारापूर्वीची कार्यक्षमता प्राप्त होऊ शकते.
पंचकर्म :
दशमूळ, निर्गुडी, बला, एरंड, शतावर आदी वातशामक औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाने कंबरेला मालिश करून त्यानंतर औषधी पाल्यांच्या गोळ्याने, तेलाने शेकणे म्हणजेच पिंडस्वेद केला जातो. त्यानंतर औषधी काढ्याच्या वाफार्याने काही वेळ शेक देणे, या क्रिया केल्या जातात. रुग्णांच्या प्रकृती व आजाराच्या अवस्थेनुसार वेगवेगळे तेल व शेक वापरले जातात. औषधी तेल अथवा काढा गुदद्वाराने आत सोडणे म्हणजेच बस्ती हा उपचार केला जातो. वारंवार होणार्या कंबरदुखीवर हे पंचकर्म उपचार रामबाण असल्याचे आढळते. काही रुग्णांमध्ये सूजनाशक लेप, कटिबस्तीही कर्मे केली जातात.
औषधी :
बिब्बा, एरंड, निर्गुडी, गुळवेल, दशमूळ एलाक्षा, पद्मकाष्ठ, त्रिफळा, पुनर्नवा, गोखरू, अश्वगंधा, हळीव, डिंक, गुग्गुळ आदी वनस्पतीज औषधांबरोबर कुक्कुडांभस्म, मण्डुरभस्म, गोदंतीभस्म, त्रिवंगभस्म, नागभस्म तसेच समीर जन्नग, महावात विध्वंस, एकांगवीर रस आदी औषधे आजाराची अवस्था, वय, प्रकृती, व्यवसाय आदींचा विचार करून वापरली जातात. वातकारक आहार टाळून नियमित वेळी भोजन, संडास व लघवी साफ राहण्याची काळजी घेणे, अतिजड वजन उचलण्याचे टाळणे नियमित योगासने, अल्प व्यायाम यांचा वापर करून कंबर दुखीवर कायमस्वरुपी विजय मिळवू शकतो.
रामबाण पंचकर्म उपचार :
कंबरेच्या स्नायूचे, नाड्यांचे मणक्याचे बल वाढविण्यासाठी औषधांनी सिद्ध केलेल्या आयुर्वेदिक तेलाने कंबरेला व पायाला शास्त्रीयपणे मसाज केला जातो व त्यानंतर औषधींच्या काढ्याच्या वाफेने अथवा गरम हवेने शेक दिला जातो. वातप्रकोप अधिक असल्यास बस्ती हा उपचार केला जातो. ज्यामध्ये औषधी तेल आदी गुदमार्गाने रबरी नळीने आत सोडले जाते. याबरोबरच कटीबस्ती, पिंडस्वेद, हे उपचारही कंबरदुखीसाठी उपयोगी ठरत आहेत.
डॉ. आनंद ओक