illness Symptoms : लक्षणांमधील फरक ओळखा | पुढारी

illness Symptoms : लक्षणांमधील फरक ओळखा

अनेक गंभीर आणि सामान्य आजारपणाची लक्षणे ( illness Symptoms) जवळपास सारखीच असतात. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने घाबरणे किंवा अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. परंतु, या लक्षणांतील फरक समजून डॉक्टरांचा सल्ला आणि तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

यूट्यूबवर किंवा संकेतस्थळावर लक्षणांची पडताळणी करून घरच्या घरी वाटेल तसे उपचार करण्याच्या भानगडीत पडू नये. त्याचवेळी काही जण लक्षणांकडे दुर्लक्ष करतात; पण सुरुवातीला किरकोळ असणारा आजार हा हलगर्जीपणामुळे कालांतराने गंभीर रूपधारण करू शकतो.

अनेकदा इंटरनेट, टीव्ही किंवा अन्य माध्यमे, मित्रांकडून तसेच नातेवाईकांकडून विविध आजाराची लक्षणे ( illness Symptoms), उपचार, होणारा त्रास ऐकून आपण घाबरतो. त्यामुळे शरीरावर कोणतीही किरकोळ लक्षणे दिसली तरी आपली घाबरगुंडी उडते. ही लक्षणे गंभीर आजाराची तर नाहीत ना, अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.

घरातच किंवा नातेवाईकांशी चर्चा करून तर्कवितर्क लावण्यापेक्षा थेट डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही श्रेयस्कर राहू शकते. सध्या ओपीडीची फी परवडत नसली तरी ती आपल्या तब्येतीपेक्षा अधिक नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही लक्षणाबाबत संशय वाटू लागल्यास किंवा प्रामुख्याने वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कोणतेही लक्षणे किंवा त्रास वाटू लागल्यास डॉक्टराशी संपर्क करा आणि योग्य उपचार घ्या.

टेन्शन हेडेक किंवा ब्रेन ट्यूमर : टेन्शन हेडेकच्या त्रासात आपल्याला डोक्यावर एक दबाव असल्याचा भास होतो. डोक्याच्या चोहोबाजूंनी एखादे रबरबँड बांधल्यासारखे वाटत राहते. ही बाब आपल्याला अनेक महिने, वर्ष त्रास देऊ शकते. परंतु, ब्रेन ट्यूमरची डोकेदुखी ही दिवसागणिक आणि काळानुसार गंभीर होत जाते. सुरुवातीच्या काळात उलटी येणे, चक्कर येणे, शरीराचा एक भाग बधिर होणे, मन अस्वस्थ होणे, अंधुक दिसणे, संभम्रावस्था निर्माण होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.

अ‍ॅसिडिटी किंवा इंटेस्टाईनल कॅन्सर : अ‍ॅसिडीटी इनडायजेशन आणि इंटेस्टाईनल कॅन्सर या आजाराची लक्षणे काही प्रमाणात सारखी आहेत. अशावेळी बदलत्या लक्षणांवर नजर ठेवा. अचानक वजन कमी होणे, गिळताना त्रास होणे, उलटी येणे, काळी शौच होणे आदी लक्षणे दिसू लागली तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यापैकी कोणतेही लक्षणे नसली तर घाबरू नका. ही साधारण अ‍ॅसिडीटी किंवा इनडायजेशनची समस्या असू शकते.

पाईल्स किंवा कोलोन कॅन्सर : शौच करताना त्रास होणे, दाह होणे यासारखी लक्षणे ही मूळव्याधीची असू शकतात. या त्रासात रुग्णाला साधारण स्थितीत बसणेही कठीण जाते. मलद्वाराच्या ठिकाणी असलेल्या शिरा या सततच्या गॅसमुळे, अपचनामुळे फुगतात आणि तेव्हा मुळव्याधीची समस्या निर्माण होते.

याशिवाय कोणतेही अन्य लक्षणे दिसत नाहीत. परंतु, कोलोन कॅन्सरच्या स्थितीत वजन कमी होणे, अतिसार होणे, पोटदुखी, शौचास रक्त पडणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. अर्थात, काही वेळा कोलोन कॅन्सरमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे मलद्वारातून रक्त पडत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी.

स्टमक इन्फेक्शन किंवा अ‍ॅपेंडिक्स : काही वेळा पोटातील संसर्गामुळे पोटदुखी, अतिसार किंवा उलटी येण्याचा त्रास होऊ शकतो. परंतु, आपण त्यास अ‍ॅपेंडिक्सचा त्रास असल्याचे गृहीत धरतो. लक्षात ठेवा, अ‍ॅपेंडिक्समध्ये पोटदुखीचा त्रास हा अधूनमधून होतो. तब्बल बारा तासांच्या अंतरानंतर पोटाच्या खालच्या भागात बेंबीच्या डाव्या बाजूूला सतत दुखत राहते. या स्थितीत आपण उभादेखील राहू शकत नाही. पोटाचा त्रास हा वेदनादायी असतो.

मसल पुलिंग किंवा हृदयविकाराचा त्रास : अनेकदा छातीतील पेशी ओढल्यासारख्या वाटतात. तेथे हाताने दाबल्यानंतर, खोकला आल्यावर किंवा खूप हसल्यावर त्रास होतो. हा त्रास नेहमीच होत असल्यास ते मसल पुलिंगचे लक्षण असू शकते. परंतु, हृदयविकाराच्या त्रासात हे लक्षण एकदाच जाणवते आणि प्रचंड त्रास होतो. एवढेच नाही तर हा त्रास मान आणि डाव्या हातापर्यंत पोहोचतो. छाती गच्च झाल्यासारखे वाटते. कोणीतरी वजन ठेवल्याचा भास होतो. हा त्रास अर्धा तासापेक्षा अधिक काळ राहू शकतो. अचानक हा त्रास जाणवत असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गॅस्ट्रिक प्रॉब्लेम किंवा ओव्हेरियन कॅन्सर : एखाद्या महिलेच्या पोटात सतत दुखत असेल, पोटात गॅस होत असेल, पोट फुगत असेल, वारंवार शौचास जावे लागत असेल तर अपचन झाले, असे समजायला हरकत नाही. परंतु, त्यात अधिक निष्काळजीपणा दाखवू नये. यासाठी आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण, हे काहीवेळा ओव्हेरियन कॅन्सरचेदेखील लक्षण असू शकते.

गॅस्ट्रोएंटोरोलॉजिस्टिक्सच्या मते, ओव्हेरियन कॅन्सर पीडित महिलांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक जणांना सुरुवातीच्या काळात पोट बिघडण्याचा त्रास सहन करावा लागतो. परंतु, याकडे त्या फारसे लक्ष देत नाहीत. हा त्रास बळावल्यानंतर संबंधित महिला जेव्हा डॉक्टरकडे जाते, तेव्हा ओव्हेरियन कॅन्सर अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजपर्यंत पोहोचलेला असतो. त्याचा शोध घेण्यासाठी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. (illness Symptoms)

शहरी महिलांचे पोट हे ओव्हेरियन, ब्रेस्ट किंवा युट्रिन कॅन्सरचे कारण ठरू शकते. फास्ट फूड, अनियमित जीवनशैली आणि व्यायामाची कमतरता हे कर्करोगाचे कारण असू शकते. त्यामुळे पोटासंबंधी कोणताही विकार झाल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवणे हिताचे ठरू शकते.

डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button