वारंवार गर्भपात कशामुळे होतो, जाणून घ्या त्यावर काय आहेत उपचार? | पुढारी

वारंवार गर्भपात कशामुळे होतो, जाणून घ्या त्यावर काय आहेत उपचार?

अनेक स्त्रियांचा आयुष्यात कधी ना कधी गर्भपात होतो. वेगवेगळ्या कारणांमुळे हा गर्भपात होऊ शकतो; पण गर्भपाताचा अर्थ असा नाही की, स्त्रीने पुन्हा गर्भधारणेचा प्रयत्न केल्यास दुसरा गर्भपात होईल. परंतु; काही स्त्रियांचा एकापेक्षा जास्त गर्भपात होतो आणि याला वारंवार गर्भधारणा नुकसान (रिकरंट प्रेग्नन्सी लॉस) असे म्हटले जाते. रिकरंट प्रेग्नन्सी लॉस ही सहसा नैसर्गिक प्रक्रिया असते आणि त्याचे मूळ कारण असते, जे उपचार करण्यायोग्य असते.

जर तुम्हाला वारंवार गर्भपात होत असेल तर तज्ज्ञाद्वारे मूळ कारणाचे निवारण केले जाते. त्यानंतर, मुदतीपर्यंत तुमची गर्भधारणा सुरू ठेवण्याची शक्यता वाढविण्यासाठी योग्य उपचार केले जातात.

शस्त्रक्रिया : तुमच्यावर उपचार करणारे डॉक्टर गर्भाशयातील काही समस्यांचे निराकरण करतात; जसे की, गर्भाशयाला (सेप्टम) विभाजित करणारे अतिरिक्त ऊतक, काही फायब्रॉईड्स (सौम्य ट्यूमर) किंवा टिश्यू. गर्भाशयाच्या आतील भागाचा आकार दुरुस्त केल्यास गर्भपाताचा धोका कमी होण्यास मदत होते.

गर्भाशयाच्या आतील भाग दुरुस्त करण्यासाठी योनीमार्गे कॅमेरा (हिस्टेरोस्कोप) हे एक साधन वापरले जाते. ही एक डे केअर प्रक्रिया आहे आणि शस्त्रक्रियेच्या परिमाणानुसार काही दिवस ती एका आठवड्यात पुनर्प्राप्ती दिसून येते.

रक्त पातळ करणारे : ज्यांना ऑटोइम्यून किंवा क्लॉटिंग (थ्रॉम्बोफिलिया) समस्या आहे, त्यांना एस्पिरिन आणि हेपरिनचा कमी डोस दिला जातो. गर्भपाताची शक्यता कमी करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान ही औषधे घेतली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नयेत.

इतर वैद्यकीय समस्या : रक्तातील साखरेची असामान्य पातळी, थायरॉईड ग्रंथी जास्त किंवा कमी किंवा संप्रेरक प्रोलॅक्टिनची उच्च
पातळी अशा विविध कारणांमुळे वारंवार गर्भपात होऊ शकतो. या परिस्थितीचे व्यवस्थापन केल्याने निरोगी, पूर्ण मुदतीची गर्भधारणा
होण्याची शक्यता वाढते.

आनुवंशिक तपासणी : काहींच्या गुणसूत्राची पुनर्रचना होते; ज्यामुळे गुणसूत्र असंतुलन होते आणि नंतर गर्भपात होतो. क्रोमोझोमल समस्या आढळल्यास आनुवंशिक समुपदेशन सुचवले जाते. तथापि, गुणसूत्राची पुनर्रचना करण्यासाठी असलेल्या अनेक जोडप्यांना गर्भधारणा होऊ शकते.

काही प्रकरणांमध्ये डॉक्टर ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) सारख्या प्रजनन उपचारांची शिफारस करतात. या प्रक्रियेत अंडी आणि शुक्राणू शरीराबाहेर प्रयोगशाळेत एकत्र केले जातात. नंतर गर्भाशयात भ्रूण रोपण करण्यापूर्वी त्यांची चाचणी (प्रीइम्प्लांटेशन आनुवंशिक चाचणी) केली जाते. त्यानंतर, गर्भधारणेचे परिणाम सुधारण्यासाठी ट्रान्सलोकेशनशिवाय भ्रूण रोपण केले जातात.

वारंवार गभपात समस्या असणार्‍या महिलांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. धूम्रपान, अल्कोहोल, कॅफीन, बेकायदेशीर मादक पदार्थांचा वापर सोडून दिल्यास गर्भपात होण्याचा धोका कमी होईल. शिवाय, लठ्ठपणा किंवा जास्त वजन हे गर्भपात होण्याशी संबंधित आहे. वजन कमी केल्याने गर्भधारणेचे परिणाम सुधारू शकतात. गर्भपाताच्या भावनिक वेदनांना तोंड देण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी निरोगी वातावरण तयार करण्यासाठी मानसिक आधार आणि समुपदेशन जोडप्यांना फायदेशीर ठरते.

डॉ. रितू हिंदुजा

Back to top button