भूक न लागण्याची ‘ही’ आहेत कारणे, पण ‘हे’ उपाय केल्यास भूक वाढेल! जाणून घ्या अधिक…

भूक न लागण्याची ‘ही’ आहेत कारणे, पण ‘हे’ उपाय केल्यास भूक वाढेल! जाणून घ्या अधिक…
Published on
Updated on

अनियमित दिनक्रमाचा परिणाम थेटपणे आपल्या आरोग्यावर पडतो. दिवसभरात जर कमीत कमी सहा तास झोप घेतली नाही तर दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो. तसेच भूक न लागण्याची तक्रार सुरू होते. कारण, पचन शक्तीत झालेल्या गडबडीमुळे ही समस्या उद्भवते. नैसर्गिक उपाय वापरून या समस्येपासून सुटका मिळवता येते.

व्यायाम : तंदुरुस्तीसाठी रोज अर्धा तास ते चाळीस मिनिटे व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे व्यक्ती क्रियाशील राहते. तसेच पचन संस्थादेखील उत्तम राहते. शरीराची चयापचय क्रियाही उत्तम रहाते. तसेच कॅल्शिअमसारख्या घटकांचे अवशोषणही उत्तम प्रकारे झाल्याने शरीरातील अतिरिक्त उष्मांक जळतात. त्याचा फायदाच होतो.

अपचनाची तक्रार दूर होते. तसेच, भूक लागते. फिरायला जाण्याबरोबरच सायकलिंगचाही खूप फायदा होतो. बॅडमिंटन, टेनिससारखे आवडीचे खेळ खेळावेत किंवा घरीच व्यायामाची साधने असतील तर ट्रेडमिल वॉक, इनडोअर व्यायाम किंवा योगासने करावीत आणि स्वतःला तंदुरुस्त राखावे. सूर्यनमस्कार, कपालभाति, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासनासारखी योगासने उपयुक्त आहेत.

त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आहार नियोजन. व्यक्तिपरत्वे काही गोष्टी ठरवल्या जाऊ शकतात. जसे आपण तीन वेळा जेवणे पसंत करतो की दिवसातून पाच ते सहा वेळा थोडे थोडे जेवण्याला प्राधान्य देतो. अर्थात, दोहोपैकी कोणतेही नियोजन करताना त्यात जंक फूडऐवजी पोषक घटकांनी युक्त संतुलित आहार घ्यावा.

न्याहारी, दुपारचे जेवण यांच्यादरम्यान, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्यादरम्यान थोडेसा आहार सेवन करू शकता. ज्यामध्ये फळे, फळांचा रस, सुकामेवा, मोडाची धान्ये सारख्या गोष्टी खाऊ शकता. सफरचंद, बेरी, पेरू, संत्रे, द्राक्ष्यांसारखी मोसमी फळे त्या-त्या काळात सेवन केल्यास पचनशक्ती चांगली रहाते आणि भूक वाढण्यास मदत होते.

आहारात शक्यतो तळलेले, अतितिखट पदार्थ सेवन करणे टाळावे. वरून फोडणी घालताना त्यात आल्याचा वापर करावा. आल्यातील तेल जेवणाची रुची वाढवतेच पण पचन तंत्रही योग्य प्रकारे चालण्यास मदत करते. पराठे, भजी, पुरी, कचोरीसारखे पदार्थ खाणे टाळावे. कारण, हे सर्व पदार्थ पचण्यासाठी खूप कालावधी लागतो आणि खूप वेळ पोट भरल्यासारखेच वाटते. त्याऐवजी भाजलेले, ग्रिल केलेले किंवा एअर फ्रायरमध्ये भाजलेले पदार्थ खाऊ शकता. जेवणात सलाड, हिरवी कोथिंबीर, केळे, ब्रोकोली सारखे खाद्यपदार्थ असावेत. त्यामुळे आपल्याला आहार पचण्यासाठी लागणे पाचक रस आणि एन्झाईम्सचे उत्पादन होण्यास मदत होते.

जेवणात चांगल्या प्रतीचे मोनो सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (मुफा)आणि पॉली सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (पुफा) तसेच सीडस् ऑईलचा वापर करणे उत्तम. सीड ऑईल म्हणजे चिया, ऑलिव्ह, सोयाबीन, सनफ्लॉवर, ग्राऊंडनट (शेंगदाणे)आणि आल्मंड (बदाम) आदी तेले वापरावीत. ही सर्व तेले ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिडने युक्त असतात. त्यामुळे शरीराचे नुकसान होत नाही. अर्थात, तेले बदलून वापरावीत. दर पंधरा दिवस किंवा एक महिन्याने त्यात बदल केला पाहिजे. जेणेकरून कोणत्याही घटकाची कमतरता शरीराला भासणार नाही. या तेलांमध्ये चरबीचे प्रमाण कमी असले तरी ही तेले रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ करतात.

शरीर लवचिक आणि मजबूत बनवतात. दिवसातून कमीत कमी तीन लिटर पाणी जरूर प्यायला हवे. पाण्यामुळे चयापचय क्रिया चांगली चालते. शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे आणि सकाळी अनशापोटी प्यावे. जेवताना मध्येच किंवा जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. त्यामुळे पचनक्रिया मंद होते. जेवण पचण्यास वेळ लागतो आणि भूक लागत नाही.

डॉ. मनोज शिंगाडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news