डोळ्यांची अनमोल दृष्टी वाचवता येऊ शकते - पुढारी

डोळ्यांची अनमोल दृष्टी वाचवता येऊ शकते

वाढत्या वयासोबत हरतर्‍हेचे आजार व्यक्तीला घेरत असतात. यामध्ये डोळ्यांशी संबंधित काही आजार प्रमुख आहेत. वाढत्या वयात डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांची लवचिकतादेखील कमी होते. परिणामी व्यक्तीची दृष्टिक्षमता कमी होते. अशा प्रकारचे काही इतर आजारदेखील आहेत. ज्यांच्याबाबत माहिती असल्यास आणि नियमितपणे तपासणी केल्यास त्यांपासून बचाव करता येेऊ शकतो.

डोळ्यांच्या समस्या खासकरून दृष्टीसंबंधी तसेच संक्रमणाद्वारे होणार्‍या समस्या कधीही होऊ शकतात. मात्र, काही आजार असेही आहेत की, जे वाढत्या वयात होतात. त्यापैकी काही महत्त्वाचे आजार जाणून घेऊ.

प्रेस बायोपिया : वाढत्या वयासोबत डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांची लवचिकतादेखील कमी होते. यामुळे डोळ्यांच्या भिंगांची फोकस करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे व्यक्तीची जवळच्या वस्तू पाहण्याची क्षमता कमी होते आणि त्याला धूसर दिसू लागते. याच समस्येला ‘प्रेस बायोपिया’ असे म्हणतात. बहिर्वक्र भिंग अर्थात कॉन्व्हेक्स लेन्सपासून बनविलेला चष्मा लावल्यामुळे ही समस्या दूर होते.

मोतीबिंदू : वाढत्या वयासोबत होणारी डोळ्यांची सर्वात सामान्य समस्या म्हणजे मोतीबिंदू होय. यामध्ये डोळ्यांच्या आतील भिंगाची पारदर्शकता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे व्यक्तीला धूसर दिसू लागते. डोळ्यांमधील भिंग प्रोटिन आणि पाण्यापासून बनलेले असते. वाढत्या वयासोबत प्रोटिन एकमेकाला जोडले जाते आणि भिंगाचा तो भाग धूसर करते. मोतीबिंदू हळूहळू वाढून पूर्णपणे दृष्टी घालवितो. वयाच्या 50 वर्षांनंतर प्रत्येक व्यक्तीने मोतीबिंदूची तापसणी करून घेण्यासाठी तज्ज्ञांकडे जावे. मोतीबिंदूच्या उपचारात शस्त्रक्रियेद्वारे ही अपारदर्शी लेन्स काढून बाहेरून कृत्रिम पारदर्शी लेन्स बसवली जाते.

एज रिलेटेड मॅकुलर डिजनरेशन (एआरएमडी) : वाढत्या वयासोबत दृष्टी प्रभावित करणारी एक मोठी समस्या म्हणजे एआरएमडी ही होय. याची महत्त्वपूर्ण लक्षणे म्हणजे धूसर दिसणे, वस्तू विकृत दिसणे, सरळ रेषा वाकडी, तुटक किंवा वक्राकार दिसणे, काळ्या डागासारखे दृष्टीसमोर दिसणे तसेच रंगीत वस्तूंचे रंग कमी दिसणे इत्यादी होय. आपल्या डोळ्यात कॉन नावाच्या पेशी असतात. या पेशी प्रकाशात बघण्यासाठी तसेच रंगीत वस्तू पाहण्याचे काम करत असतात. या पेशी डोळ्यातील संवेदनशील भाग असणार्‍या रेटीनाच्या मॅकुला या भागात असतात. एआरएमडीमध्ये या पेशींचे नुकसान होते, त्यामुळे आपल्या सेंट्रल व्हिजनवर परिणाम होतो. या आजारात पेरिफेरल व्हिजनवर परिणाम होत नाही. त्यामुळे व्यक्ती एखाद्या वस्तूला पाहू शकते; पण त्याचे विश्लेषण करू शकत नाही. म्हणूनच वरील लक्षणे दिसल्यास नेत्रतज्ज्ञांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा.

फ्लोटरस (काळा डाग दिसणे) : वाढत्या वयासोबत व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर डासाप्रमाणे उडणारा काळा डाग दिसू शकतो. यालाच फ्लोटरस असे म्हणतात. आपल्या डोळ्यामध्ये एक जेलीसारखा पदार्थ असतो त्याला विट्रस ह्युुमर असे म्हणतात. वाढत्या वयासोबत विट्रस ह्युुमरच्या रचनेत परिवर्तन होते. याचे सूक्ष्म फायबर्स तुटून वेगळे होतात. नंतर हे फायबर्स पुन्हा आपापसात जोडले जातात आणि विट्रस ह्युुमरमध्ये तरंगत राहतात. या फायबर्सचे रेटीनेच्या वर काळे प्रतिबिंब बनते आणि व्यक्तीला डोळ्यांच्या समोर काळे डाग उडताना दिसू लागतात. हे डाग अचानकपणे खूप जास्त तयार झाले तर त्वरित नेत्रतज्ज्ञांशी भेटून डोळ्यांची तपासणी करावी.

ग्लुकोमा : ग्लुकोमा या आजारात डोळ्यांच्या आतला डाग वाढतो. यामुळे दृष्टीसाठी उपयुक्त असणार्‍या ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. ग्लुकोमाची तपासणी आणि उपचार केले नाही तर व्यक्ती अंध होऊ शकते. हा एक चिरकालीन रोग आहे. अर्थात यामुळे होणारा दृष्टीनाश खूप सावकाश होतो. यामुळे बहुतेक लोक याला सामान्य दृष्टी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वय वाढते तसे डोळ्यांतील कॉर्नियाची जाडी कमी होत जाते. म्हणूनच ग्लुकोमा होण्याची शक्यता वाढते. ग्लुकोमाची ओळख जेवढ्या लवकर होईल, तेवढे त्याला रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. या आजाराच्या उपचारात आयड्रॉप्स, लेझर उपचार किंवा शस्त्रक्रिया केली जाते.

या व्यतिरिक्त वाढत्या वयाबरोबर येणार्‍या डोळ्यांच्या इतर समस्यादेखील आहेत. ड्राय आय, डायबेटिक रेटीनोपॅथी, हायपर मेट्रिपिया, रेटिनल डिटॅचमेंट, डोळ्यांतून पाणी येणे इत्यादी होय. म्हणूनच वय वाढल्यानंतर प्रत्येक सहा महिन्यांनी नेत्रतज्ज्ञांकडून डोळे तपासून घ्यावेत; जेणे करून आपल्या डोळ्यांची अनमोल दृष्टी वाचवता येऊ शकते.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button