Potassium : स्नायूंच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मजबुतीसाठी पोटॅशियम गरजेचे | पुढारी

Potassium : स्नायूंच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मजबुतीसाठी पोटॅशियम गरजेचे

स्नायूंच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मजबुतीसाठी पोटॅशियम (Potassium) हे गरजेचे असते. सोडियम हे शरीरात साठवले जात असले, तरी पोटॅशियम साठवले जात नाही म्हणूनच ते नियमितपणे आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते.

पोटॅशियम हा शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण क्षार घटक असून सेल्युलर (पेशीयुक्त) आणि इलेक्ट्रिकल (विद्युत) अशा दोन्ही कार्यांसाठी गरजेचे असते. हे रक्तातील महत्त्वाचे क्षार असून त्याला इलेक्ट्रोलाईटस् असे म्हणतात. रक्तातील इतर क्षार सोडियम आणि क्लोराईडदेखील आहेत. इलेक्ट्रोलाईटस् म्हणजे ते अगदी सूक्ष्म इलेक्ट्रिकल चार्ज वाहून नेतात.

पोटॅशियम हे पेशींमध्ये आढळणारे प्राथमिक धनभारयुक्त अणू आहेत. रक्तामधील द्रवामध्ये (सिरम) प्रत्येक 100 मिलिलिटरमध्ये 4 ते 5 मिलिग्रॅम पोटॅशियम असते. सामान्यपणे रक्तातील एकूण पोटॅशियमची पातळी 420 मिलिग्रॅम असेल, तर ती सर्वसामान्यपणे चांगली मानली जाते.

मॅग्नेशियम हे पेशींमधील पोटॅशियम नियमित राखण्यास मदत करते; पण सोडियम आणि पोटॅशियम (Potassium) या घटकांमुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस संतुलित राखले जाते. संशोधनानुसार असे आढळले आहे की, कमी पोटॅशियम असणारे आणि अधिक सोडियम असणार्‍या पदार्थांचा आहारात अधिक समावेश केला, तर रक्तदाबाची समस्या निर्माण होते. त्यामुळे डॉक्टर कमी मीठ खाण्याचा सल्ला देतात; पण या सर्व क्षारांची पातळी संतुलित राखायची असेल, तर नैसर्गिक पद्धतीने राखणे आवश्यक ठरते. त्यासाठी पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थ, फळे, भाजीपाला खावे.

फळे, भाजीपाला, कडधान्ये या नैसर्गिक आहारात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असून सोडियमचे प्रमाण कमी असते. यामुळे सर्वसामान्य रक्तदाब कायम राखण्यास मदत होते. शरीरामध्ये पोटॅशियम सोडियमच्या तुलनेत जास्त असते; पण अमेरिकन आहारामध्ये फास्ट फूड, पॅक फूड, चीप्स यासारख्या पदार्थांत मोठ्या प्रमाणात सोडियम असते.

पोटॅशियम हे लहान आतड्यामध्ये चांगल्या प्रकारे शोषले जाते. ते एक सर्वांत जास्त विरघळणारे क्षार आहे. त्यामुळे अन्न शिजवताना ते वेगाने नष्ट होते. शरीरातील बरेचसे पोटॅशियम हे मूत्रावाटे बाहेर टाकले जाते, तर काही प्रमाणात घामावाटे बाहेर टाकले जाते. ज्यावेळी आपल्याला खूप थकल्यासारखे वाटत असेल तेव्हा संत्र्याचा रस किंवा भाज्यांचा रस पुरेशा प्रमाणात घ्यावा. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. केवळ सॉल्ट टॅबलेटस् घेण्याचे टाळावे.

शरीरातील पोटॅशियम नियमित राखण्यासाठी किडनी महत्त्वाची भूमिका निभावतात. अल्कोहोल, कॉफी, साखर आणि ड्युरेटिक औषधे यामुळे पोटॅशियम मोठ्या प्रमाणात शरीरातून बाहेर टाकले जाते आणि त्यामुळे रक्तातील पोटॅशियम कमी होते. पोटॅशियमचे क्षार उलट्या आणि डायरियामध्येसुद्धा कमी होतात.

पोटॅशियम हे बर्‍याच अन्न घटकांमध्ये आढळते. हिरव्या पालेभाज्या खासकरून पालक, लेट्यूस, ब्रोकोली, मटार, टोमॅटो, बटाटे, डबल बी यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असते. ज्या फळांमध्ये अधिक क्षार असतात त्यामध्ये पोटॅशियम आढळते. संत्रा आणि त्या जातीची सर्व फळे, केळी, सफरचंद यासारख्या फळांमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते.

कडधान्ये, गहू इतर बिया यामध्येही भरपूर पोटॅशियम असते. सॅल्मन, फ्लोंडर, सार्डिन्स आणि कॉड या माशांमध्ये तसेच सर्व प्रकारच्या मीटमध्ये पोटॅशियम आढळते. ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात अल्कोहोल घेतात, जे ड्रग अ‍ॅडिक्ट असतात किंवा जे क्रॅश डाएट करतात त्यांना पोटॅशियम कमी होण्याचा धोका असतो. कॉफीन आणि तंबाखू यामुळे शरीराद्वारे कमी प्रमाणात पोटॅशियम शोषले जाते.

चयापचयाच्या प्रक्रियेतही पोटॅशियम खूप महत्त्वाची भूमिका निभावते. स्नायूंच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मजबुतीसाठी देखील ते गरजेचे असते. सोडियम हे शरीरात साठवले जात असले, तरी पोटॅशियम साठवले जात नाही म्हणूनच ते नियमितपणे आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते. (Potassium)

औषधांमध्येसुद्धा पोटॅशियमयुक्त औषधांचा डोस अधिक प्रमाणात घ्यायला सांगितला जातो. पोटॅशियमचे शरीरातील प्रमाण कमी झाले, तर ते बायोकेमिकल चाचणीद्वारे मोजले जाते आणि प्रमाण कमी आढळल्यास सप्लीमेंटच्या रूपात दिले जाते. हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, काही वेळेला लहान बाळांच्या अ‍ॅलर्जिकस्थितीमध्ये, डायरियानंतर पोटॅशियमयुक्त आहार घेणे फार गरजेचे असते.

पोटॅशियमची कमतरता ही तशी सामान्यपणे दिसून येणारी बाब आहे. खासकरून वाढत्या वयात आणि जुन्या आजारात ही तक्रार दिसून येते. पोटॅशियमची पातळी कमी झाल्यानंतर दिसून येणार्‍या काही सर्वसामान्य समस्या म्हणजे हायपरटेन्शन, कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, थकवा, नैराश्य आणि इतर मानसिक असंतुलन या होत. तसेच डायरिया, उलट्या आणि इतर पोटाच्या समस्यांदरम्यान पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचे दिसून येते.

लहान बाळांना डायरिया झाल्यानंतर पोटॅशियमच्या पातळीकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते. मधुमेह आणि किडनी संबंधीच्या आजारांमध्येसुद्धा पोटॅशियमची पातळी कमी किंवा जास्त होऊ शकते. पोटॅशियमची रक्तातील पातळी कायम राखण्यासाठी नियमितपणे फळे आणि पालेभाज्या खाव्यात.

डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button