व्यावसायिकांसाठी आरोग्य सल्ला | पुढारी

व्यावसायिकांसाठी आरोग्य सल्ला

वैद्य विजय कुलकर्णी

दुकानात बसणारे किंवा दिवसभर उभे राहणारे व्यावसायिक, याचं सगळे आरोग्य हे त्यांच्या रोजच्या दिनक्रमावर बहुतांशी अवलंबून असते. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना करायला लागणार्‍या वेळेच्या तडजोडी या कित्येकदा अनेक रोगांना निमंत्रण देणार्‍या ठरतात. म्हणूनच त्यांचा दिनक्रम, त्यामुळे निर्माण होणारे आजार आणि ते होऊ नयेत यासाठी पाळावयाचे व्यावहारिकसोपे नियम आहेत.

साधारणतः दुकानदार, मग ते कोणत्याही प्रकारचे असोत, त्यांची व्यवसायाची वेळ साधारणपणे सकाळी दहा ते रात्री साडेआठ-नऊ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे अकरा तास असते. या कालावधीत क्वचितच त्यांना विश्रांती मिळते. विश्रांती न घेता केलेले हे काम घरी गेल्यावर काहीही करावेसे न वाटणे, भूक नसणे, काही तरी खायचे म्हणून दोन घास खाणे आणि रात्री व्यवसायाचे विचार थोपवत-थोपवत झोपणे असा सगळा उद्योग त्यांचा असतो. दिवसभराचे बैठे (किंवा फारशी हालचाल नसलेले) काम दुकानात केले जात असल्यामुळे जठराग्नी मंद होणे, भूक न लागणे, खाल्लेले नीट न पचणे अशा प्रकारच्या तक्रारींना या दुकानदार मंडळींना प्रामुख्याने तोंड द्यावे लागते. पोटात गॅसेसचा त्रास, अन्न पुढे न सरकणे, त्यामुळे निर्माण होणारा मलावरोध या गोष्टी ओघानेच आल्या. या टाळण्यासाठी या दुकानदार व्यावसायिकांनी रोज थोडे तरी फिरले पाहिजे. ते फिरणे शक्यतो सकाळी असावे. पोट मोकळे राहणे इतपतच हे फिरणे असावे.याचबरोबर सूर्यनमस्कारासारखा काही व्यायामही त्यांनी करावा. यामुळे त्यांचे स्नायू, सांधे बळकट राहायला मदत होईल. त्रिफळा चूर्णाचा उपयोग रात्री झोपताना योग्य प्रमाणात प्रकृतीला अनुसरून केला तर मलावरोधाचा त्रास कमी होऊ शकेल. दुकानावर कोणीतरी आलाय म्हणून समोसा, वडा, भजी या वरचेवर खाण्याच्या गोष्टी टाळाव्यात.

दिवसभर काही मंडळींचा अक्षरशः 10-15-20 कप चहा होतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटी, अल्सर, डोकेदुखी यांसारख्या अनेक विकारांना तोंड द्यावे लागते. ते टाळायला हवे. दिवसातून चहा घ्यायचाच झाला तर दोन कपांपेक्षा जास्त नको. घर आणि दुकान याचे अंतर जास्त असले तर अनेकांना दुपारचा जेवणाचा डबा लागतो. त्या डब्यामध्ये ताजे अन्न असणे, योग्य तेवढे पातळ (द्रव) अन्न असणे हे आवश्यक असते.
दुकानात काम करताना सतत बसावे लागणे किंवा सतत उभा राहावे लागणे यामुळे पायांचे दुखणे, सांधेदुखी निर्माण होण्याची दाट शक्यता असते. म्हणून सकाळी व्यायाम, फिरणे याबरोबरच अांघोळीच्या वेळेस अभ्यंग करणे हेसुद्धा गरजेचे ठरते. दुकानदारांना आपल्या गिर्‍हाईकांशी सतत बोलावे लागते. त्यामुळे अनेक वेळा ऊर्जा खूप जाते. अशा वेळी या मंडळींनी आपल्या खाण्यापिण्यात गायीचे दूध, गायीचे तूप, खजूर, मनुका, नारळपाणी असे पदार्थ नेहमी ठेवावेत. शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध यांचे चूर्ण दुधातून सेवन करण्याची सवय ठेवली तर ती अतिशय उपयुक्त ठरते.

बिलांची बेरीज करताना शक्यतो कॅलक्युलेटर न वापरता जितकी बेरीज शक्य असेल, तितकी मनात करण्याचा प्रयत्न ठेवायला हवा. याने बेरीज करण्याची मेंदूची क्षमता टिकून राहते. छोट्याशा बेरेजेसाठीही कॅलक्युलेटरची किंवा मोबाईलची मदत घेणे बुद्धीला परवडणारे नाही हे पक्के लक्षात ठेवावे. अगदी छोट्या पानपट्टीपासून अगदी मोठ्या कापडाच्या व्यापार्‍यापर्यंत थोड्या कमी-अधिक पद्धतीने वरचे वर्णन लागू पडत. आपले आरोग्य चांगले राहिले तरच पुढे आपण उत्तम व्यवसाय करू शकू, हा विचार मनात सतत ठेवला पाहिजे आणि नियमित दिनक्रमाची जोपासना केली पाहिजे.

Back to top button