Control diabetes : नियंत्रण मधुमेहाचे | पुढारी

Control diabetes : नियंत्रण मधुमेहाचे

डॉ. संतोष काळे

‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’, ही म्हण लहानपणी सर्वांनीच ऐकली असेल. पण, हल्ली साखरेचं खाताना थोडे नियंत्रण करूनच खावे लागते. कारण मधुमेहाचे वाढते प्रमाण. मधुमेह हा भारतातील सर्वव्यापी आजार झाला आहे. त्याचे प्रमाणही मोठे आहे. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी असंख्य मधुमेहींना दररोज प्रयत्न करावे लागतात. यामध्ये घरगुती उपाय हमखास उपयोगी असतात, असेही नाही. त्यासाठी आहार नियोजन, व्यायाम आणि औषधोपचार यांची सांगड घालावी लागते.
मधुमेह झाल्यानंतर घरगुती उपायांनी साखर नियंत्रण करण्याचे अनेक प्रयत्न आपण करतो; मात्र घरगुती उपायांनी मुळापासून साखर कमी होणे किंवा मधुमेह न राहणे शक्यच नसते. त्यासाठी आहारनियोजन आणि साखर नियंत्रण करण्यासाठीचे काही महत्त्वाचे उपाय करणे महत्त्वाचे असते. आहार नियोजन आणि औषधोपचार हे डॉक्टरी सल्ल्याने करावे.
इन्सुलिन आणि औषधोपचार

मधुमेह आहे, हे कळल्यानंतर डॉक्टर आपल्याला काही औषधे, आहार नियंत्रण आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतात. अर्थात, मधुमेहावर दिलेल्या औषधांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहू शकते. मुखावाटे औषधे सेवन करणे ही एक उपचार पद्धती आहे. काही वेळा मधुमेही रुग्णांना जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहाची पातळी चढी असल्यास डॉक्टर इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला देतात.  मधुमेहामध्ये औषध जेवणापूर्वी अर्धा तास आधी सेवन करायचे असते. त्यामुळे पाचक ग्रंथी उत्तेजित होतात. मधुमेहातील औषधांचे सेवन रक्तातील साखरेची पातळी आणि व्यक्तीची स्थिती यावर अवलंबून असते.
मधुमेहाची काही औषधे ही जेवणादरम्यानही सेवन केली जातात. त्यामुळे आहारात असणार्‍या ग्लुकोजचा परिणाम शरीरावर कमी प्रमाणात होतो.  इन्सुलिनच्या इंजेक्शनचे काही प्रकार दिवसातून तब्बल 4-5 तास काम करतात आणि जेवणापूर्वी 15-20 मिनिटे आधी ते घ्यावे लागते.  काही इन्सुलिनची इंजेक्शन दीर्घकाळ म्हणजे 24 तास परिणाम करतात. त्यामुळे दिवसातून एकदा झोपण्यापूर्वी किंवा न्याहारीपूर्वी हे इंजेक्शन दिले जाते.  डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते आणि योग्य प्रमाणात औषधे सेवन करणे, हा एकमेव सुरक्षित आणि योग्य उपाय आहे.  रक्तातील साखर मोजण्यासाठी ग्लुकोमीटरसारख्या यंत्रांचा वापर करावा. कारण त्यामुळे ग्लुकोजच्या प्रमाणावर देखरेख करणे सोपे जाते.

नियमित व्यायामाचे महत्त्व :

मधुमेह आहे म्हणून नव्हे, तर रोजच्या दिनचर्येत नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्धा तास चालणे हा व्यायाम आपल्या दिनचर्येचा भाग व्हायला पाहिजे. आठवड्यातून 5 दिवस फिरणे आपल्या शरीराला खूप गरजेचे आणि फायदेशीर आहे. जिम किंवा पोहणे या व्यायामाइतकाच फायदा तीस मिनिटे नियमित चालण्याने होतो. ऑफिसमध्ये जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर बसून काम करू नये. अमेरिकन डायबेटिस असोसिएशन नुसार, साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे तो म्हणजे 30 मिनिटे चालणे किंवा आपल्याच जागेवर बसून ताणाचे व्यायाम करू शकता.

*अख्ख्या धान्याचा समावेश-

हल्ली तंतुमय पदार्थांचे सेवन कमी झाले आहे आणि अति प्रमाणात कार्ब्स आणि स्टार्च असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात होतो आहे. उदा. मैदा, ब्रेड, पास्ता आणि तांदूळ यांचे सेवन कमी करावे. कारण या पदार्थांमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते. आपल्या आहारतज्ज्ञांकडून कार्ब काऊंटिग विषयी जाणून घ्यावे. विशेषतः टाईप वनच्या मधुमेही रुग्णांसाठी ते उपयुक्त आहे.

साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाहेर खाणे कमी करावे. बाहेर खाणे होत असेल तर कोणत्या कारणाने बाहेर खाता आणि काय खाता यावर लक्ष द्या.  अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. जेवण तयार करताना तेलाचा अतिवापर टाळावा तसेच साय, तूप यांचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ खाऊ नयेत.  जेवण करताना थाळीचे प्रमाण लक्षात ठेवा. जेवणाच्या ताटात 2 भाग भाजी असली पाहिजे, एक भाग प्रथिने म्हणजे डाळ, पनीर किंवा अंडे असावे. एक भाग धान्याचा म्हणजे पोळी, ज्वारी, बाजरी यांचा समावेश असावा.
मांसाहारी जेवण करताना ते शक्यतो भाजलेल्या स्वरूपात असावे. रस्सा, दाट रस्सा प्रकारातील मांसाहारी जेवण टाळावे.

रोज जेवणात सलाड अर्थात कच्च्या भाज्यांचा समावेश असावा. त्यामुळे शरीरातील तंतुमय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढण्यास मज्जाव होतो. जंक फूडमुळे शरीराला फायदा न होता नुकसान होते. बाजारात मिळणारे प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये हानिकारक चरबीयुक्त घटक असतात. परिणामी, त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

वजनावर ठेवा लक्ष :

आपल्या शरीराचे वजन समतोल राखणे खूप महत्त्वाचे आहे. वजन कमी असल्यास शरीर इन्सुलिनप्रति संवेदनशील राहाते.
साखरेवर नियंत्रण ठेवणे मधुमेहासाठी जितके महत्त्वाचे तितकेच वजनावरही नियंत्रण ठेवले पाहिजे. वजन नियंत्रणात असेल तर कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यांच्या पातळीतही सुधारणा दिसते. महिलांमध्ये पीसीओएससारख्या हार्मोन्सच्या असंतुलनाच्या समस्या ठीक करण्यासही मदत होते.

मधुमेहाशी निगडित सुरुवातीची लक्षणे :

मधुमेह हा श्रीमंतांचा आजार, असे पूर्वी म्हटले जायचे; पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. मधुमेह शरीरासाठी घातक असतो; कारण रक्तातील शर्करेच्या पातळीत वाढ असे त्याचे स्वरूप न राहता शरीराचे काही अवयव हळूहळू निकामी करण्याची क्षमताही असते. मधुमेह अर्थात डायबेटिसमुळे अनेक आजारांच्या विळख्यात माणूस अडकू शकतो. या आजारांवर वेळेत उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळेच मधुमेही व्यक्तींना आहाराच्या बाबतीत काटेकोर राहिले पाहिजे. तसेच सावधगिरीही बाळगली पाहिजे. त्याव्यतिरिक्त नियमित व्यायाम आणि साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवले पाहिजे. त्याव्यतिरिक्तही मधुमेहाची काही लक्षणे दिसून येतात. ती माहीत असल्यास मधुमेहाशी निगडीत ज्या समस्या आहेत, त्या हाताळणे सोपे जाईल.
*पायाला मुंग्या येणे ः रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने शरीरातील मज्जासंस्थांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हात आणि पाय यांच्या नसांचे नुकसान होते. त्याला डायबेटिक पेरिवेरल न्युरोपॅथीया नावाने ओळखले जाते. बोटे आणि घोटा यांना मुंग्या येणे हे या आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. मधुमेह असणार्‍या व्यक्तीला अशा मुंग्या आल्यानंतर सुन्न वाटत असेल, जळजळ होत असेल तर ताबडतोब स्क्रिनिंग चाचणी करून घ्यावी. तसेच न्यूरॉलॉजिस्टकडून याचे कारणही जाणून घ्यावे.

*जखमा आणि अल्सर ः मधुमेहाच्या लोकांमध्ये आपोआप अल्सर होणे हे अनियंत्रित शर्करा पातळीचा परिणाम आहे. मधुमेहामुळे होणारे अल्सर हे बोटे, घोटा आणि पाय यांच्यामध्ये होतात. पण अशा जखमा आणि अल्सर का होतात याचे ठोस कारण मात्र कळू शकलेले नाही.

* जखमा लवकर न भरणे ः मधुमेहात केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही, तर इतरही शरीरक्रियांवर त्याचा विपरीत परिणाम होत असतोच. रक्तप्रवाहावरही मधुमेहाचा परिणाम होतो. त्यामुळेच शरीरावर काही जखम झाल्यास ती लवकर भरून येत नाही. त्यामुळेच अगदी लहान जखम, इजा तसेच अल्सर भरण्यासही वेळ लागतो. असे सतत होत असल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, याची ही सूचना आहे.

* त्वचेच्या समस्या ः जखम भरून न येण्याची समस्याच आहे; पण रक्ताभिसरणातील अडथळ्यांमुळे शरीर संसर्गाशी लढण्यासही असमर्थ असते. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागावर लाल चट्टे, खाज येणे, सूज जाणवत असेल तर मधुमेहामुळे होणारा त्वचेचा संसर्ग आहे, असे समजा.

* पायाला सूज ः मधुमेही व्यक्तीच्या पायाला सूज येते तसेच पायात येणारे गोळे हे एक प्रकारे मधुमेहातील न्युरोपॅथी संबंधित लक्षण आहे. मूत्रपिंडाचे काम असते की लघवीवाटे शरीरातील विषद्रव्ये शरीराच्या बाहेर टाकणे. ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण उच्च असते त्यांच्या मूत्रपिंडावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मूत्रपिंडाच्या कामावरही विपरीत परिणाम होतो. परिणामी, शरीरात विषद्रव्ये, टाकाऊ पदार्थ साठतात. त्यामुळे पायावर सूज येते. एवढेच नव्हे तर परिस्थिती गंभीर झाल्यास किडनी फेल होऊ शकते. मधुमेही व्यक्तींनी योग्य उपचार आणि आहार, व्यायाम ही त्रिसूत्री अवलंबून साखरेवर नियंत्रण ठेवल्यास मधुमेहाला बरोबर घेऊनही चांगले आरोग्य जगणे शक्य होते. घरगुती उपायांच्या जोडीने योग्य औषधोपचार हे रोगाच्या मुळापर्यंत पोहोचू शकतात आणि रुग्णाला एक आश्वासक आयुष्य जगण्यास मदत करू शकतात.

Back to top button