अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती कमी होणे. अग्नी बिघडला की शरीराचे गणित बिघडते. अग्निमांद्य घडले म्हणजे अग्नीच्या पचन सामर्थ्यात विकृती निर्माण होते व शरीर पोषणाची क्रिया मंदावते. आयुर्वेदात सुंठ, मिरे आणि पिंपळी ही तीन महाऔषधी शरीराच्या तीन प्रमुख अवयवात अग्निवर्धनाचे काम करतात. सुंठ आमाशयात, मिरी पक्काशयात आणि पिंपळी प्राणवह स्रोतसावर काम करते. त्या द़ृष्टीने नेहमी त्रिकटूचूर्ण लहान मात्रेने म्हणजे अर्धा ग्रॅम सकाळी रसायन काळी रिकाम्या पोटी आणि सायंकाळी जेवणापूर्वी घ्यावे. प्रकृतीनुरूप आणि ऋतुमानाप्रमाणे मध, तूप, तुळशीचा रस, खडीसाखार किंवा विविध अवलेह या अनुपानाबरोबर घ्यावे.
भोजनानंतर पोट जड होऊन पुन्हा अग्निमांद्य ( पचनशक्ती ) होत असेल तर हे चूर्ण भोजनानंतर ताकाबरोबर रिकाम्यापोटी घ्यावे. जेवणाअगोदर आरोग्यवर्धिनी व त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या घ्याव्यात. जेवणानंतर अभयारिष्ट चार चमचे घ्यावे. यकृत दुर्बलता असल्यास कुमारी आसव घ्यावे. तोंडाला चव नसल्यास जेवणाच्या सुरुवातीला आमलक्यादिचूर्ण चिमूटभर चांगल्या तुपाबरोबर घ्यावे.
सर्व अवस्थेत नियमाने त्रिफळाचूर्ण घ्यावे. शरीर कृश असल्यास च्यवनप्राश किंवा अगस्तीप्राश पहाटे घेऊन खडखडीत भूक लागेपर्यंत काही खाऊ नये. बालकांच्या अग्निमांद्यात रिकाम्यापोटी कृमिनाशक गोळ्या आणि जेवणानंतर आरोग्यकाढा घ्यावा.
विशेष दक्षता आणि विहार : अतिकाम टाळावे. स्वत:च्या अग्नीला धरून त्याप्रमाणे आहार घ्यावा. समानाने कार्यावर लक्ष ठेवावे आणि ते सुधारण्यास दक्षता घ्यावी.
पथ्य : हलके, उकडलेले पदार्थ, गरम पाणी, लघू आहार, एक वेळ जेवण बंद, जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात, शेळीचे दूध, प्रमाणात जेवण. आले, लसूण, पुदिना यांची चटणी.
कुपथ्य: तेल, तूप (डालडा) बेकरीचे पदार्थ टाळावेत, जागरण नको. फार पाणी अथवा जलपदार्थ, बैठे काम टाळावे.
योग आणि व्यायाम : जेवणानंतर शतपावली, सूर्यनमस्कार.
संकीर्ण : थंड पेये, वातूळ पदार्थ खाऊ नयेत. लंघन, फिरणे, पाचक पदार्थ सेवन, व्यायाम याबाबत दक्ष राहावे.