दीर्घकाळच्या खरुजावर ‘हे’ आहेत आयुर्वेदोपचार | पुढारी

दीर्घकाळच्या खरुजावर 'हे' आहेत आयुर्वेदोपचार

वैद्य विनायक खडीवाले

रोगाचे नाव : खरूज, आगपेण,
संबंधित व्याधी : इसब, गजकर्ण, नायटा, कृमी.
पोटभेद : ओली व कोरडी खरूज. अवस्था : साम व निराम
स्रोतम् : रस व रक्तवह.
शारीर : त्वचा.
दोष : कफ, पित्त. धातू : रस, रक्त. मल : स्वेद.
चिकित्सादिशा : कृमिनाशक, रक्तदोषहर चिकित्सा,
संबंधित अवयव : पक्वाशय
गुरुकुलपारंपरिक उपचार : खरूज : दीर्घकाळची खरूज असल्यास प्रवाळ, कामदुधा प्रत्येकी 3/3 गोळ्या सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घ्याव्यात. तसेच उपळसरी चूर्ण दिवसातून सकाळी एकवेळ 1 चमचा पाण्याबरोबर घ्यावे. मीठ पाण्यात विरघळवून उकळवून खरजेचे फोड धुवावेत. कोरडे करावेत. यास करंजकर्पूर तेल लावावे. कोरड्या खरजेस कापूर व संगजिर्‍याचे मिश्रण लावावे. खाज कंड असल्यास कडुनिंबाच्या पाण्याने (काढ्याने) किंवा कडूनिंबाच्या पाल्याच्या रसाने खरजेचे फोड साफ करावेत. आगपेणकरिता पोटात आरोग्यवर्धिनी, प्रवाळ व कामदुधा प्रत्येकी तीन तीन गोळ्या सकाळ संध्याकाळ रिकाम्यापोटी पाण्याबरोबर घ्याव्यात. त्रिफळाकाढ्याने अथवा कडुनिंबपानांच्या रसाने धुवून कोरडी करून, कर्पूर करंजतेल लिंबोणी तेल, एलादितेल, जात्यादि तेल यांपैकी एक तेल लावावे. कृमी-जंत असल्यास कृमिनाशक औषध घ्यावे.
ग्रंथोक्त उपचार : पंचनिंबचूर्ण, कासीसादिघृत मलम, बृहन्मरीच्यादि तेल.
विशेष दक्षता व विहार : मीठ व आंबट पदार्थ वर्ज्य करावेत.
पथ्य : गोड ताक, लाह्या, ज्वारीची भाकरी, उकडलेल्या भाज्या, पडवळ, कारले, दुधभोपळा, मूग
कुपथ्य : आंबवलेले व आंबट पदार्थ, खारट, तिखट, मसालेदार पदार्थ, मांसाहार, डालडा, थंड पेये, विरुद्धान्त्र भक्षण, चहा, केळे, पापड, लोणचे, मसूर, तूर, बाजरी, फरसाण, वांगी, अंडी.
रसायनचिकित्सा : रोज एक आवळा खावा.
योग व व्यायाम : पुरेसा व्यायाम.
रुग्णालयीन उपचार : कोठा जड असल्यास जुलाबाचे औषध द्यावे.
अन्य षष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : त्रिफळा वा अन्य सौम्य विरेचन उपयुक्त.
चिकित्साकाल : 1 महिना.
निसर्गोपचार : नायलॉन, टेरिलीन, प्लास्टिक, रबर यांचा वापर टाळावा.
अपुनर्भवचिकित्सा : आळणी आहार घ्यावा. मलमूत्रप्रवृत्ति साफ असाव्यात. जागरण टाळावे.
संकीर्ण : रुग्णाचे कपडे, रुमाल, टॉवेल इ. वेगळे उकळत्या पाण्यात धुवावेत.

Back to top button