वारंवार डोकं खाजवताय? जाणून घ्या कारणे | पुढारी

वारंवार डोकं खाजवताय? जाणून घ्या कारणे

डॉ. मनोज कुंभार

अधूनमधून डोके खाजवणे स्वाभाविक आणि नैसर्गिक असते; पण हे वारंवार घडत असेल, तर मात्र ते चिंतेचे कारण आहे.

काही वेळा सोयरासिससारख्या त्वचारोगामुळे खाज सुटते, काही वेळा ही खाज केवळ डोक्यापुरतीच मर्यादित असते, काही केसेसमध्ये संपूर्ण शरीराला खाज सुटते. पण, सारखे डोके खाजवल्यामुळे डोक्याला खरचटल्याप्रमाणे जखमा होऊ शकतात. त्यात जीवाणूंचा संसर्ग होऊन समस्या आणखी गंभीर होऊ शकते.

डोक्याला सुटणार्‍या खाजेवरील उपचार हे त्या खाजेच्या कारणावर अवलंबून असतात. म्हणूनच त्या खाजेचे निदान होणे सर्वात जरूरी असते. जितक्या लवकर हे निदान होईल, तितक्या लवकर उपचार करणे शक्य होते.

डोक्याला खाज सुटण्याची विविध कारणे :

टाळूची त्वचा कोरडी असणे

अनेकांची त्वचा कोरडी असते, अगदी टाळूची त्वचाही कोरडी असते. कोरडेपणामुळे खाज सुटते. तीव्र स्वरूपाचे शांपू वापरून वारंवार डोक्यावरून स्नान केल्यानेही टाळूचा कोरडेपणा वाढतो आणि खाज सुटते.

उवा होणे हे डोक्यात खाज सुटण्याचे एक प्रमुख कारण आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलींमध्ये उवा होण्याचे प्रमाण जास्त असते. उवा एका व्यक्तीच्या डोक्यातून दुसर्‍या व्यक्तीच्या डोक्यात पसरतात. मुली आणि महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. उवा चावल्याने खाज सुटते, विशेषत: कानांमागे जास्त खाज सुटते. सारखे खाजवल्याने डोक्यात जखमा होतात आणि मग संसर्ग होतो. उवांची अंडी म्हणजे लिखा केसांना चिकटलेल्या असतात. त्यावरून डोक्यात उवा झाल्याचे ओळखता येते.

डोक्यात कोंडा होणे ही समस्या किशोरवयानंतर जास्त प्रमाणात आढळून येते. कोंडा झाला की तेलकट टाळूला मॅलेसेझिया फरफर नावाच्या बुरशीचा संसर्ग होतो आणि मग डोके खाजू लागते. रुग्ण सारखे डोके खाजवू लागतो, खाजवले की त्वचेचे कोरडे कण खाली पडू लागतात, यालाच आपण कोंडा म्हणतो. त्यामुळे केसही गळू लागतात, अर्थात केस गळणे तात्पुरते असते. अतिशय तेलकट टाळूवर कोंडा असणे, त्याची आग होणे याला सेबोरिक डर्माटायटिस असे म्हणतात.

तीन महिन्यांपर्यंतच्या नवजात बालकांमध्ये खपली धरणे ही समस्या आढळते. यात टाळूवर खपल्या धरतात. डोक्यावर केस नसल्याने टाळूवर खपली धरते. या स्थितीचे नेमके कारण अजून समजलेले नाही. सेबॅसीयस ग्रंथीतून होणार्‍या अतिरिक्त स्रावामुळे हे घडत असावे, असा अंदाज आहे. आईच्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे हा स्राव पाझरतो. यीस्ट, मेलेसेझिया फरफरचा प्रादुर्भावही याचे एक कारण असू शकते. ही स्थिती धोकादायक नसते. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत आपोआपच ही समस्या दूर होते.

गजकर्ण किंवा नायटा बुरशीच्या संसर्गाने होणारी समस्या आहे. यात गोलाकार जाड जखमा होतात. डोक्यात जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा जिथे नायटा झाला असेल त्याच्या भोवतीने खाज सुटते आणि केस तुटतात.

जीवाणू संसर्गामुळे डोक्यात खाज सुटते. त्याचबरोबर पू येतो, तो गळू लागतो, खपल्या धरतात आणि केसांची चमक जाते. यावर मलमाच्या स्वरूपात किंवा पोटात घ्यायच्या अँटिबायोटिक्स औषधांच्या मदतीने मात करता येते.

काही शांपूतील विशिष्ट घटकांमुळे अ‍ॅलर्जी उठते आणि त्यामुळे खाज सुटते. असे शांपू वापरणे टाळल्यामुळे ही समस्या दूर होते. पण, दुर्लक्ष केले तर समस्या गंभीर बनते.

टाळूचा सोरायसिस खाज सुटण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. हा त्वचारोग आहे. यात शरीरावर जाड चट्टे उठतात आणि त्यावर खवल्यासारखी खपली धरते.

एकूणच डोक्यात उठणारी खाज ही साधी आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. एका टप्प्यावर आपले डोके प्रमाणाबाहेर खाजते आहे, हे लक्षात आल्याबरोबर लगेचच त्वचारोगतज्ज्ञाशी संपर्क साधा. वेळीच उपचार केल्याने पुढील गुंतागुंत टाळता येते, हे लक्षात घ्या.

Back to top button