तंदुरुस्तीसाठी जॉगिंग करा, पण पायात बूट चढवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा | पुढारी

तंदुरुस्तीसाठी जॉगिंग करा, पण पायात बूट चढवण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

डॉ. सुनीलकुमार जाधव

तंदुरुस्ती राखायची असा निर्धार करूनही अनेकदा ते शक्य होत नाही. मग जिम जॉईन करण्यापोटी हजारो रुपये घालवूनही नियमितता राखता येत नाही आणि तंदुरुस्तीही मागे पडते. मग वेळ येते ती दुसर्‍या मार्गाने तंदुरुस्ती मिळवण्याची. तंदुरुस्ती तर राखली जाईलच, पण खिशाला चाटही बसणार नाही असा एखादा व्यायामप्रकार शोधला जातो. असा व्यायामप्रकार म्हणजे जॉगिंग.

धावणे किंवा पळणे हे अगदी मोफत असते. हा व्यायाम आपण कुठेही आणि कसाही करू शकतो. अगदी रोजच्या दिनक्रमात व्यग्र असणार्‍या व्यक्ती रात्री धावण्याचा पर्याय निवडतात. धावण्याचे आरोग्य ?फायदे काही वेगळे सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे अनेक आजारांचे जसे हृदविकार, मधुमेह आणि लकवा यांच्यासारखे धोके टाळता येतात. इतर कोणत्याही व्यायाम प्रकाराप्रमाणे आपली मनःस्थिती आणि वजन दोन्हीही चांगले ठेवण्यात धावण्याच्या व्यायामाचा फायदा होतो. अर्थात, धावण्याचा किंवा पळण्याचा व्यायाम करायला पायात बूट चढवण्यापूर्वी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

आरोग्य तपासणी

आपली ठेवण योग्य नाही किंवा काही इजा, दुखापत झाल्याचा पूर्वेतिहास असल्यास धावण्याच्या व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. धावणे हा कष्टप्रद व्यायामप्रकार आहे. त्यामुळे व्यक्तीची जीवनशैली जर बैठी असेल तर तंदुरुस्ती मिळवण्यासाठी हळूहळू प्रयत्न करावेत. सुरुवातीला थेट धावण्याऐवजी जॉगिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग करावे. हळूहळू पळण्याची सवय लावणे, मग हळूहळू आपला वेग आणि अंतर वाढवणे ही नक्कीच चांगली कल्पना आहे.

गरज कशाची?

धावणे किंवा पळणे, जॉगिंग यासाठी गरज आहे ती योग्य पादत्राणांची अर्थातच बुटांची. पायाला शूज व्यवस्थित बसताहेत ना, याची खात्री करावी आणि मुख्य म्हणजे पायाला त्याचा त्रास होत नाही ते पाहावे. बुटांमधील शॉक अ‍ॅबसॉर्ब्स काळाप्रमाणे हळूहळू ढिले होतात किंवा कमजोर होतात. त्यामुळे इजा किंवा दुखापत होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे अगदी जुने, ढिले झालेले बूट घालून धावायला बिलकूल जाऊ नका.

वेळापत्रक बनवा-

धावण्याचे एक नियोजन करा. धावण्याचेही एक वेळापत्रक असू द्या. शक्यतो पहाटे लवकरची वेळ नक्कीच चांगली आहे. आपल्या धावण्याचा रस्ता आणि किती वेळ धावणार, हे ठरवा.

वॉर्मअप

वॉर्मअप हे कोणत्याही व्यायामापूर्वी गरजेचे असते. त्यामुळे धावण्याला सुरुवात करण्यापूर्वी पाच मिनिटे वॉर्मअप जरूर करावे. त्यात भरभर चालणे, जागेवरच कदमताल किंवा मार्चिंग करणे, गुडघे वर उचलणे, पायर्‍या चढणे आणि उतरणे. त्यानंतर आरामदायक वाटेल तितका वेळ चालावे. एकदा का तीस मिनिटे आपण व्यवस्थित चालू शकलो की, मग हळूहळू चालण्याच्या मध्ये आपल्याला झेपेल त्या वेगात एक किंवा दोन मिनिटे धावायला सुरुवात करावी. व्यायाम संपल्यानंतर काही मिनिटे कूल डाऊनसाठी द्यावीत. त्यामुळे हृदयाचे ठोके पुन्हा पूर्ववत होतात. चालणे किंवा पळणे याच्यानंतर पायाला ताण देण्याचा व्यायाम जरूर करावा. त्यामुळे पायाचे स्नायू शिथिल होण्यास मदत होते.

धावण्याची स्थिती-

खांदे आणि हात शिथिल ठेवून आणि कोपर्‍यातून हात वाकवलेले ही पळण्याची योग्य स्थिती आहे. शरीराचा वरचा भाग ताठ असावा आणि पळताना ताठ आणि शांतपणे जमिनीवर पायाचा मधला भाग टेकवून पळावे.

प्रोत्साहन गरजेचे-

आपल्या गतीने धावणारी एखादी व्यक्ती आपल्याबरोबर असली तर प्रोत्साहन जरूर मिळते. अर्थात, एकटे किंवा दुकटे पळण्यापेक्षाही रनिंग क्लब हादेखील नियमित पळण्यासाठी उत्तम पर्याय आहे. रनिंग क्लबमध्ये विविध पातळ्यांवरील गट असतात, त्यात अगदी नवखे सुरुवात करणारे लोकही असतात किंवा वैयक्तिक प्रशिक्षकही आपल्याला मदत करू शकतो. आपल्या भोवती प्रेरणा देणारी चित्रे, संदेश असावेत. आपल्या लॅपटॉपवर, मोबाईलवर अशीच प्रेरणा देणारे वॉलपेपर्स लावू शकता. त्यामुळे सतत उत्साही राहणे शक्य होईल.

खूप अतिकष्टही टाळा

आपल्या धावण्याबाबत अति अपेक्षा ठेवू नका. वास्तववादी लक्ष्य ठेवल्यास आपल्या उत्साहावर पाणी पडणार नाही. आपले लक्ष्य गाठण्यासाठी पुरेसा वेळही द्या. मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण घेणे हा चांगला मार्ग आहे. त्यामुळे आपले लक्ष्य निश्चित वेळेत आणि योग्य प्रयत्नाने गाठता येईल.

Back to top button