अस्थिक्षयाने त्रस्त आहात? | पुढारी

अस्थिक्षयाने त्रस्त आहात?

वैद्य विनायक खडीवाले

अस्थिक्षयाला वातवृद्धी-रुक्षता हे प्रमुख कारण आहे. त्याकरिता शरीर रुक्षतेची कारणे टाळून स्नेहनाच्या चार प्रकारांपैकी योग्य प्रकाराची निवड करणे आवश्यक असते.

अस्थीचा विचार करताना नुसत्या हाडांचा, कवट्यांचा पोकळ विचार करून चालत नाही. अस्थिक्षयाचा विचार करताना मोठ्या सांध्यातून, गुडघे, पाठीचे मणके, खांदा, मान यातून आवाज येतो का? याचा मागोवा घ्यावा. विशेषत: जिने उतरताना त्रास होत असेल, तसेच एवढ्या तेवढ्या कमी शब्दांमुळे रुग्णाला राग येत असेल, चिडचिड होत असेल, तर अस्थिक्षय समजून पुरेशी काळजी आणि औषधे न कंटाळता घ्यावी.

लाक्षा, शृंगभस्म, आस्कंद, तूप अशी घटकद्रव्ये असणारी विविध औषध योजना तारतम्याने वापरावी. लाक्षादि, संधिवातारी, गोक्षुरादि, आभादि गुग्गुळ आणि चंद्रप्रभा प्र. 3 गोळ्या दोन वेळा पाण्याबरोबर घ्याव्यात. रात्री आस्कंदचूर्ण घ्यावे. अशा कृश व्यक्तीने शतावरी किंवा अश्वगंधाघृत; स्थूल व्यक्तीने महातिक्तघृत घ्यावे. ज्यांना सिद्धघृत सहजपणे मिळत नाही त्यांनी शतावरीचुर्णाची लापशी किंवा शतावरीकल्प घ्यावा. मानसिक ताणतणाव, काळजी, खूप बौद्धिक काम, रात्रपाळी आणि कुपोषण, अवेळी जेवण अशी करणे असल्यास सारस्वतारिष्ट, ब्राह्यीवटी, ब्रालीघृत, ब्राह्यीप्राश यांचा युक्तीने वापर करावा. मुंग्या येणे, पोटर्‍या दुखणे, चिडचिड होणे, चाल मंदावणे, हाताला कंप येणे अशा विविध लक्षणांंनुरूप अनुक्रमे 1) मुंग्या येणे – लाक्षदिगुग्गुळ, चंद्रप्रभा 2) पोटर्‍या दुखणे-चंद्रप्रभा, शृंगभस्म 3) चिडचिट होणे-लघुसूतशेखर च्यवनप्राश सुवर्णमाक्षिकादिवटी 4) चाल मंदावणे – चंद्रप्रभा, शृंग, सुवर्णमाक्षिकादि, आस्कंद चूर्ण 5) हाताला कंप – लघु मालिनी वसंत, सुवर्णमाक्षिकादि, लाक्षदि, गोक्षुरादि, चंद्रप्रभा यांची योजना करावे. रात्रौ आस्कंचूर्ण आणि निद्राकरवटी घ्यावी.

अस्थिक्षयाचा त्रास असणार्‍या रुग्णांनी कटाक्षाने विविध व्यसने, उशिरा आणि अपुरा आहार, जागरण टाळावे. पोटात वायू धरू नये आणि सदा उल्हसित राहावे इतपत हलका व्यायाम करावा. माफक फिरणे असावे.

पथ्य : ओले खोबरे, भाजलेले शेंगदाणे, मूग, उडीद, मका, गहू, हातसडीचा तांदूळ, राजमा, सोयाबीन, ओटस्, अहाळीव, डींक अशा विविध आहार पदार्थांची कमी-अधिक योजना करावी. कटाक्षाने सफरचंद, डाळिंब, पांढरे खरबूज, ताडगोळे, खजूर, खारीक यांचा आलटून-पालटून वापर करावा.

कुपथ्य : आंबट, खारट, तिखट, लोणची पापड, क्षोभकारक पदार्थ टाळावेत. खूप थंड, शिळे अन्न, शंकास्पद जेवण, रात्री उशिरा जेवण टाळावे. व्यसने वर्ज्य.

रसायन चिकित्सा : च्यवनप्राश, धात्री रसायन, लाक्षादिघृत, शतपाकीक्षीरबलादि तेल, कुष्मांडकालावलेह, कुष्माडपाक, शृंगभस्म.

अस्थिक्षय विकारग्रस्त कृश व्यक्तीने अन्नपचन सुलभ व्हावे, पोटात वायू साठू नये हे लक्षात घेऊन माफकच व्यायाम करावा. अतिरेक नको. विविध बलातेलाचे, मात्रा बस्ती, शिरोबस्ती, हलक्या हाताने चंदनबला लाक्षादि तेलाचे अभ्यंग यांचाही लाभ होतो. तीव्र वेदना असणार्‍या सांध्यावर दोषघ्न लेपगोळीचा दाट आणि गरम लेप दिल्यास आराम मिळतो. याखेरीज टाकणखार पोटीसही लाभदायक ठरते. अस्थिक्षासाठीचा चिकित्साकाल किमान तीन महिने आहे. या व्याधीवरील निसर्गोपचारांमध्ये हवापालट, मोकळी हवा वेळेवर आणि संयमित जेवण, सायंकाळी सूर्यास्ताच्या आसपास भोजन, पुरेशी झोप, शाकाहार, फलाहार यांचा समावेश होतो. गुडघे बदल, खुबेबदल अशा शस्त्रकर्मांचा सल्ला मिळाला असल्यास शतपाकी क्षीरबलादितेलांचा किमान तीन महिने वापर न कंटाळता केल्यास अस्थिक्षय विकारावर मात करता येईल. खुबा बदलणे टाळता येते.

Back to top button