‘स्वरभंगा’वर आयुर्वेदोपचार

‘स्वरभंगा’वर आयुर्वेदोपचार

पारंपरिक उपचार : एलादिवटी एक- दोन गोळ्या, दिवसातून तीन ते चार वेळा चघळून खाव्या. अस्सल वंशलोचनयुक्त सीतोफलादिचूर्ण चांगल्या दर्जाच्या मध आणि तुपाबरोबर चाटण स्वरूपात घ्यावे. प्रवाळ आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, या दोन वेळा, सकाळ आणि संध्याकाळ वासापाकाबरोबर घ्याव्यात. फुफ्फुसात कफ आहे; पण कफ सहज सुटत नसेल आणि त्यामुळे कोरडा खोकला येत असेल तर कोरफडीचा गर खावा.

खोकला काढा दोन्ही जेवणानंतर चार चमचे, समभाग पाण्याबरोबर घ्यावा. रूक्ष व्यक्तींनी भरपूर मनुका चघळून खाव्यात. मधुमेहामुळे कोरडा खोकला असल्यास मधुमेहाचे उपचार अवश्य चालू ठेवावे. क्षय विकारात कोरडा खोकला असल्यास चौसष्ट पिंपळीचूर्ण नियमितपणे चाटण स्वरूपात किंवा दुधाबरोबर तारतम्याने घ्यावे. रसक्षय किंवा अति जागरणाने, धूम्रपान, चहा पिऊन किंवा मद्यपानाने कोरडा खोकला असल्यास कोहळे वड्या कुष्मांडपाक आणि सोबत प्रवाळ भस्म घ्यावे. वासावलेह, उर:क्षत फुफ्फुस व्रणामुळे कोरडा खोकला असल्यास लाक्षादि किंवा द्राक्षादिघृत घ्यावे.

ग्रंथोक्त उपचार : कंटकार्यावलेह, सीतोपलादिचूर्ण, द्राक्षावलेह, मौक्तिकभस्म, च्यवनप्राश, कुष्मांडकावलेह, वासावलेह.
विशेष दक्षता आणि विहार : मौन पाळणे हिताचे आहे, शक्यतो कमी बोलावे, रात्रीचे जागरण टाळावे. स्वरयंत्राचा क्षोभ होईल अशी हवा, पाणी, राहणी आणि व्यसने टाळावीत. खालच्या पट्टीत बोलावे.

पथ्य : कमी तेला तुपाचे, बिन मसाल्याचे, सात्त्विक जेवण जेवावे. गोड द्राक्षे, गाईचे दूध, मुगाचे वरण, सुकी चपाती, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या, जुने तांदूळ.

कुपथ्य : तेलकट, तूपकट, चहा, कॉफी, कोल्ड्रिंकसारखी कृत्रिम पेये, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ आणि शिळे अन्न.
रसायनचिकित्सा : सीतोपलादिचूर्ण, द्राक्षावलेह, एलादिवटी.

योग आणि व्यायाम : दीर्घश्वसन आणि प्राणायाम. भरपूर विश्रांती.

रुग्णालयीन उपचार : मीठ, हळद आणि गरम पाणी, किंवा तूप आणि गरम पाणी यांच्या तारतम्याने गुळण्या.
अन्य षष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : कफ मोकळा होत नसल्यास रोगी बलवान न असल्यास वमन कर्म.

चिकित्साकाल : दोन ते सात दिवस.

निसर्गोपचार : उकडलेले अन्न, माफक जेवण, सायंकाळी लवकर जेवावे किंवा लंघन करावे.

अपुनर्भवचिकित्सा : भरपूर मनुका खाव्यात, राजयक्ष्मा विकारात प्रवाळ आणि मौक्तिकभस्म वापरावे.

संकीर्ण : रोगाच्या इतिहासात मधुमेह, राजयक्ष्मा यांचा विचार तसेच शिक्षक, वक्ते, वकील यांच्या नेहमीच्या दिनचर्येकडे लक्ष असावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news