गृहिणींचे आराेग्‍य सर्वात महत्त्‍वाचे, कशी असावी आरोग्यदायी दिनचर्या? | पुढारी

गृहिणींचे आराेग्‍य सर्वात महत्त्‍वाचे, कशी असावी आरोग्यदायी दिनचर्या?

वैद्य विजय कुलकर्णी

[/author

कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर असणार्‍या, कुटुंबातील व्यक्तींसाठी सतत धावपळ करणार्‍या घरातील गृहिणींचे स्वतःच्या आरोग्याकडे बहुतांश वेळा लक्ष नसते. वास्तविक, सततची धावपळ, चिंता, जेवणाची वेळ पाळली न जाणे, सततचे उपवास, यंत्रांचा वापर वाढल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होणे, दुपारची झोप यांसारख्या कारणांमुळे गृहिणींमध्ये आम्लपित्त, डोकेदुखी, वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्या टाळण्यासाठी त्यांची दिनचर्या आरोग्यदायी असली पाहिजे.

आपल्या कुटुंबव्यवस्थेतील गृहिणी हा एक अविभाज्य घटक आहे. या गृहिणींचा एकंदर दिनक्रम अतिशय धावपळीचा असतो. नोकरी करत असणे वा नसणे, व्यवसाय करत असणे वा नसणे यांनुसार या धावपळीत थोडा बहुत फरक पडत असेलही; परंतु एकंदरीत विचार केला तर गृहिणींचा दिनक्रम हा सतत धावपळीचाच असतो असे लक्षात येते. कुटुंबातील सर्वांसाठीची तयारी करताना, त्यांची काळजी घेताना बहुतांश गृहिणींचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, असे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते.

स्नायूची क्षमता योग्य अशी ठेवायला हवी

 गृहिणींना दररोज उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काही ना काही व्यवधाने असतात. सकाळी गृहस्थ लवकर कामावर अथवा व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यास निघत असतील तर त्यांचे चहापान, डबा, तसेच मुलांच्या शाळा, त्यांचे डबे अस कार्यचक्र सकाळपासून सुरू होते. एका अर्थाने थोडा शारीरिक व्यायाम सुरू होतो. एका मर्यादेपर्यंत हे चालून जाते. पुढे श्रम व्हायला लागतात. घरात सतत करावी लागणारी ऊठबस, धावपळ, पेलायची असेल तर गृहिणींनी आपल्या स्नायूची क्षमता योग्य अशी ठेवायला हवी. म्हणून सकाळच्या पेयामध्ये गाईच्या दुधाचा समावेश आवर्जून करायला हवा. त्यामध्ये शतावरी कल्प घेतल्यास अधिक उत्तम. (या कल्पात साखर असल्याने मधुमेही गृहिणींनी नुसतं शतावरी चूर्ण घ्यावे.) शतावरी कल्प हा केवळ बाळंतपणातच घेतला जावा, असा काही जणींचा समज असतो; मात्र तसे नाही, तर एकूणच शरीराला रसधातू बलवान होण्यासाठी त्याची आवश्यकता असते. या रसधातुमुळेच त्यांची त्वचा तुकतुकीत राहते, सहनशक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते, चिडचिड होत नाही.

 शतावरी ही स्त्रियांची एका अर्थाने मैत्रीणच आहे. अनेकदा गृहिणींना पस्तिशीच्या पुढे पाय दुखणे, कंबर दुखणे, मान दुखणे अशी दुखणी सतावण्याची शक्यता असते. ही दुखणी टाळण्यासाठी बाहेरून अंगाला तेल लावण्याची सवय गृहिणींनी ठेवणे खूपच उपयुक्त ठरणारे आहे. यामुळे गृहिणींच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी त्यांची त्वचाही सतेज, सुरकुत्याविरहित राहण्यास मदत होते.

खाल्ल्यावर लगेचच कष्टाची कामे करणे टाळायला हवे

गृहिणींच्या दिनक्रमात आणखी एक चुकीची गोष्ट बर्‍याचदा घडत असते, ती म्हणजे काही खाणे झाल्यावर लगेच श्रमाची कामे करणे. म्हणजे दुपारचे जेवण झाले की लगेच कपडे धुवायला घेणे, भांडी घासायला घेणे इत्यादी. परंतु, अशी श्रमाची कामे जेवण झाल्यावर लगेचच करण्याची सवय असेल तर त्यामुळे आमवात हा सांधेदुखीचा एक त्रासदायक प्रकार निर्माण होण्याची शक्यता असते. यामध्ये सांधे सुजतात. गरम होतात. हालचाल नीट करता येत नाही. ते टाळण्यासाठी गृहिणींनी खाल्ल्यावर लगेचच कष्टाची कामे करणे टाळायला हवे.

सततचे उपवास टाळा

आपल्याकडील अनेक जणी आठवड्यातून दोन-तीन दिवस उपवास करतात. उपवासादरम्यान साबुदाण्याची खिचडी खाणे, दिवसातून एक वेळा खाणे, फक्त फलाहार करणे असा प्रकार सुरू होतो. त्यामुळे मग वाताचे, पित्ताचे अनेक विकार त्रास सुरू होतात. आम्लपित्त आणि डोकेदुखी या तक्रारी त्यातूनच सुरू होण्याची शक्यता बळावते. दिनचर्येतील अनियमितपणामुळे किंवा दुर्लक्षामुळे गृहिणींमध्ये निर्माण होणारी आम्लपित्त ही आणखी एक मोठी समस्या आहे. डोके चढते, मळमळ होते, उलटी झाल्यावर बरे वाटते, गृहिणींमध्ये खूपदा वेगवेगळी किंवा एकत्रितपणे हे प्रकार घडताना आढळतात. सततची घाई असल्यामुळे खाण्याकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. सततची चिंता आणि तिखट भरपूर खाण्याची (काही) गृहिणींना असलेली हौस ही देखील आम्लपित्ताची समस्या उद्भवण्याची प्रमुख कारणे आहेत.

दुपारची झोप टाळा

अनेक जणींना दुपारी डुलकीच्या नावाखाली भरपूर झोप घ्यायची सवय असते; परंतु त्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता अधिक असते. या दुपारच्या झोपेमुळे कफ, पित्त, यांच्या तक्रारी वाढतात. बरेचदा वजन वाढण्याचीही समस्या यामुळे निर्माण होते. दुपारी जेवल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी, पडावेसे वाटणे स्वाभाविक असले तरी अशावेळी आरामखुर्चीत बसून थोडा आराम करावा. कारण आडवे पडले की झोप लागते आणि त्यातून आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी दिनक्रम आरोग्यदायी ठेवणे आवश्यक

घरातील कामांमध्येच बरेच श्रम होतात, त्यामुळे वेगळ्या व्यायामाची, चालण्याची गरज नाही, असा समज अनेक गृहिणींमध्ये असतो; परंतु गृहिणींनी दिवसभरात शक्यतो सकाळी, अन्यथा संध्याकाळी काही वेळ तरी फिरायला जाणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे शरीराबरोबरच मनाचेही स्वास्थ्य टिकून राहते.पूर्वीच्या काळी चटणी करण्यासाठी पाटा-वरवंटा वापरत असत; पण आता मिक्सरने त्याची जागा घेतली आहे. खाली पाटावर बसून जेवण्याची आणि जेवायला वाढण्याची पद्धत होती. त्यामुळे निसर्गतः खाली वाकण्याची प्रक्रिया घडून येत होती. यामुळे कंबरेला काही प्रमाणात व्यायामही होत होता; परंतु आता डायनिंग टेबल आल्यामुळे कमरेतून वाकणे, मांडी घालून बसणे कमी झाले. ते नीट होण्यासाठी मग योगासनांचा मार्ग अवलंबावा लागतो. अर्थात योगासनांचा उपयोग गृहिणींसाठी नक्कीच आहे; यात वाद नाही. परंतु दैनंदिन कामातच जर योग्य प्रमाणात शारीरिक हालचाली ठेवल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून गृहिणींनी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी आपला दिनक्रम आरोग्यदायी ठेवणे आवश्यक आहे.

Back to top button