Silent Walking | ‘सायलेंट वॉकिंग’ ट्रेंडमध्‍ये का आहे, त्याचे आरोग्यासाठी फायदे काय? | पुढारी

Silent Walking | 'सायलेंट वॉकिंग' ट्रेंडमध्‍ये का आहे, त्याचे आरोग्यासाठी फायदे काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ चालण्याचा सल्ला दिला जातो. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की चालणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. बरेच लोक सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला बाहेर पडतात. सध्या ‘सायलेंट वॉक’ (Silent Walking) ही संकल्पना ट्रेंडिंगमध्ये आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी सायलेंट वॉक चांगले असल्याचे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे सायलेंट वॉक आणि त्याचे काय फायदे आहेत…

सायलेंट वॉक म्हणजे काय? What is a Silent Walk

सायलेंट वॉक म्हणजे चालताना कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम आवाजापासून दूर राहणे. टिक टॉक स्टार मॅडी माओने एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर या सायलेंट वॉकची क्रेझ अधिक वाढल्याचे दिसून आले. जवळपास अर्धा तास चालत असल्याचा माओचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला, यामुळे सायलेंट वॉक हा ट्रेंड चर्चेत आला. काही न बोलता जवळपास 30 मिनिटे चालत असल्याचे व्हिडिओतून दिसून आले. तसेच यामध्ये एकट्याने हा वॉक पूर्ण करावा लागते. यासाठी चालत असताना, कोणत्याही प्रकारच्या आवाज किंवा विचलनापासून दूर शांत ठिकाणी चालणे अपेक्षित आहे. चालताना पूर्णपणे शांत राहणे या संकल्पनेला सायलेंट वॉक असं नाव दिलेलं आहे.

सायलेंट वॉकचे फायदे | Benefits of Silent Walking

तणाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात

द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, शांतपणे चालणे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निसर्गात काही मिनिटे शांतपणे चालल्याने तणाव कमी होऊ शकतो. दररोज असे केल्याने मानसिक आजारांना कारणीभूत असलेल्या मज्जासंस्थेतील प्रक्रिया सुधारतात. यामुळे तणाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात.

स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य

संशोधकांच्या मते, तुम्ही शांतपणे चालण्याने स्वतःला आनंदी ठेवू शकता. ट्रिपल बोर्ड प्रमाणित मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रफात डब्ल्यू. गिरगीस म्हणतात की, शांतपणे चालणे हे ध्यानासारखे आहे. वास्तविक, बाहेरचे आवाज जेव्हा मनात येतात तेव्हा तणाव वाढतो. अशा स्थितीत शांतपणे चालल्याने तणाव दूर होतो आणि मन प्रसन्न होते.

Back to top button