व्यायाम करताना… | पुढारी

व्यायाम करताना...

डॉ. भारत लुणावत

वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी हल्ली प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करताना दिसतो; मात्र व्यायाम कसा करावा, किती करावा या विषयी कोणाला न विचारताच अनेक जण व्यायाम चालू करतात. असे केल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून व्यायाम सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे.

  •  डॉक्टरांकडून आपली तब्येत तपासून घ्या. व्यायाम केल्याने आपल्या शरीरावर काही वेगळा परिणाम होणार नाही ना, हे डॉक्टरांना विचारून घ्या. तसेच दररोज किती वेळ आणि कोणता व्यायाम केला तर चालू शकेल, हेही डॉक्टरांना विचारून घ्या.
  •  जिममध्ये जाणार असाल, तर सर्व साहित्य, सुविधा उपलब्ध असलेल्या जिमची निवड करा. तसेच जिममधील वातावरण कसे आहे, तेथील प्रशिक्षक कसे आहेत, याची समक्ष जाऊन माहिती करून घ्या. जिममधील सध्याच्या लोकांनाही त्यांचे अनुभव विचारा.
  • जिममध्ये गेल्या-गेल्या लगेच व्यायाम चालू करू नका. जिममध्ये गेल्यानंतर लगेच वजन उचलण्यासारखे व्यायाम केले, तर स्नायूंवर ताण पडतो.
  •  व्यायाम करण्यासाठी एखादा जोडीदार बरोबर घ्या. अशाने दोघांमध्ये शरीर कमवण्याची तसेच वजन कमी करण्याची स्पर्धा होऊ शकते. जोडीदाराने एवढ्या दिवसांत एवढे वजन कमी केले, हे लक्षात आल्याने आपणही जिद्दीने व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करू लागतो.
  • कोणताही व्यायाम सुरू करताना तो आपल्या शरीराला झेपेल की नाही, याची प्रथम खात्री करून घ्या. शरीराला झेपणार नसेल तो व्यायाम करू नका.
  • व्यायाम करताना ज्या क्षणी तुम्हाला दमल्यासारखे वाटेल त्या क्षणाला व्यायाम थांबवा. व्यायामामुळे शरीरावर कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी घ्या.
  • श्रजिममध्ये गेल्यानंतर सुरुवातीला स्ट्रेचिंगचे एक्सरसाईज करा. यामुळे आपले शरीर लवचिक बनते.
  • व्यायाम करताना श्वास कसा घ्यायचा याचे विशिष्ट तंत्र आहे. हे तंत्र आत्मसात करा. योग्य पद्धतीने श्वास घेतल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढल्यास आपली ऊर्जा वाढते.
  • शरीराला व्यायाम केल्यावर विश्रांतीची आवश्यकता असते. ही विश्रांती सात ते आठ तास झोप घेतल्यानंतरच मिळू शकते. त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तास झोप घ्या.
  • व्यायाम केल्यामुळे भूक लागते. भूक लागल्यावर भरमसाट खाऊ नका. त्यामुळे व्यायाम करून जेवढ्या कॅलरीज जळालेल्या असतील त्याच्या दुप्पट कॅलरी शरीरात जमा होतील आणि वजन वाढेल.
  •  वजन कमी करण्याबाबत अवास्तव कल्पना बाळगू नका. महिन्यात 15 ते 20 किलो वजन कमी करू, अशी स्वप्ने पाहू नका. असे ध्येय ठेवून व्यायाम चालू केला आणि हे ध्येय साध्य न झाल्यास आपण मनाने खचून जाण्याची शक्यता असते. एवढा व्यायाम केला, तरी त्याचा उपयोग होत नाही असा नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता असते.
  •  व्यायाम प्रकारात बदल करा. कायम एकच प्रकारचा व्यायाम केलात, तर तुम्हाला त्या व्यायामाचा साहजिकच कंटाळा येईल. म्हणून वेगवेगळे व्यायाम प्रकार करत जा.
  •  आठवड्यातून एक दिवस व्यायामाला विश्रांती देत जा. एक दिवस व्यायाम न केल्यास शरीराला विश्रांती मिळून शरीर ताजेतवाने राहते.
  • जिममध्ये स्क्वॉट, डेडलिफ्ट, बेन्च प्रेस, मिलिटरी प्रेस यासारखे व्यायाम करावेत. या व्यायामांमुळे आपल्या प्रत्येक स्नायूंचा आकार वाढतो.
  •  वजन उचलण्याचा व्यायाम करताना दर आठवड्याला मागील आठवड्यापेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने आपले शरीर जास्तीत जास्त किती वजन उचलू शकते, याची कल्पना तुम्हाला येईल.
  •  व्यायाम करताना आपली बसण्याची पद्धत तसेच उभी राहण्याची पद्धत कशी आहे, याकडे बारकाईने लक्ष द्या. जिममधील ट्रेनरना आपल्या बसण्याच्या आणि उभ्या राहण्याच्या पद्धतीबद्दल विचारून ती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
  • व्यायाम चालू असताना तसेच दिवसभरात भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि थकवा येत नाही.
  • व्यायाम करताना छोटी दुखापत झाली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या दुखापतीवर व्यवस्थित उपचार करा.

Back to top button