कार्डिक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरची लक्षणे काय? | पुढारी

कार्डिक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरची लक्षणे काय?

डॉ. अभिजित जोशी

हृदयाशी संबंधित गोष्टी असतात त्यावेळी त्याच्याशी संबंधित अनेक आजार हे एकमेकांसारखेच दिसतात आणि त्यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अ‍ॅड रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जगभरातील हृदयरोगांपैकी 60 टक्के आजार हा भारतीय लोकांमध्ये दिसून येतो. कार्डिक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअर हे अगदी सर्वसामान्य आजार आहेत, ज्यामध्ये संभ्रम निर्माण होत असतो आणि म्हणूनच या दोघांच्या लक्षणातील आणि उपचारातील फरक जाणून घेणे आवश्यक असते.

कार्डिक अरेस्ट म्हणजे अचानकपणे हृदयाची क्रिया बंद पडणे तसेच हृदयाचे ठोके अचानक बंद होण. यामुळे शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांना होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. वेळेत यावर उपचार करता आले नाहीत, तर रुग्णाचा मृत्यूही होतो. कार्डिक अरेस्टमध्ये व्यक्ती प्रतिसाद देत नाही आणि सामान्यपणे श्वास घेणे थांबवतो. उपचार करता आले नाहीत, तर मेंदूला ऑक्सिजन प्राप्त न झाल्याने इजा पोहोचू शकते.

दुसरीकडे हार्ट फेल्युअर म्हणजे एक जुनाट आजार असून यामध्ये हृदय हे शरीराला आवश्यक प्रमाणात रक्त पुरवठा करू शकत नाही. हळूहळू कालांतराने किंवा कधीकधी अचानकपणे हा आजार बळावून हार्ट अटॅकसारखी स्थिती निर्माण होते. हार्ट फेल्युअरच्या साधरण केसेस या उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरीरण केसेस या उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि मधुमेह यामुळे होतांना दिसतात.

दोन परिस्थितीतील प्रमुख फरक हा सुरुवातीपासूनच दिसून येतो. कार्डिक अरेस्ट हा अचानक होतो. कधीकधी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय होतो, तर हार्ट फेल्युअर हे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यासारख्या आरोग्य समस्यांमुळे तयार होते. दोघांमधील प्रमुख फरक हा लक्षणांतही दिसून येतो. दोन्हीमध्ये छातीत दुखू लागते आणि श्वास लागत असला, तरीही कार्डिक अरेस्टमुळे व्यक्ती बेशुद्ध पडते किंवा लगेच उपचार मिळाले नाहीत, तर मृत्युमुखी पडू शकते. हार्ट फेल्युअरच्या लक्षणांमध्ये थकवा येणे, पायांना सूज येणे आणि मेहनत केल्यानंतर श्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ लागते.

उपचारांविषयी सांगायचे झाल्यास त्यातसुद्धा फरक आहे. कार्डिक अरेस्टच्या केसेसमध्ये वेगाने वैद्यकीय लक्ष देण्याची आवश्यकता असते. यामध्ये सीपीआर आणि डीफायब्रिलेशनमुळे जीव वाचू शकतो. हार्ट फेल्युअरने त्रस्त रुग्णांच्या उपचारांमध्ये जीवनशैलीतील बदल (जसे अन्नसेवनातील बदल) तसेच औषधांच्या माध्यमातून व्यवस्थापन करणे आवश्यक असते. दोन्ही प्रकारच्या रुग्णांच्या उपचारांदरम्यान रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन करणे आवश्यक असते. कार्डिक अरेस्टच्या रुग्णांमध्ये आयसीडी पेसमेकरचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता पडू शकते, तसेच हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये सीआरटी (CRT) नावाच्या पेसमेकरचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता पडू शकते.

कार्डिक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरची लक्षणे

लक्षणांवरून हे शोधणे महत्त्वाचे असते की, रुग्णाला कार्डिक अरेस्ट आला आहे की हार्ट फेल्युअर? कार्डिक अरेस्टच्या लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे अचानक शुद्ध हरपणे, नाडी न लागणे किंवा श्वास थांबणे, प्रतिसाद न देणे, छातीचे ठोके सामान्य नसणे, सायक्नोसिस म्हणजे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्वचेचा रंग निस्तेज होणे, निळसर किंवा करडा होणे, हालचालींवर नियंत्रण नसणे.

रुग्णाला हार्ट फेल्युअर आहे किंवा नाही हे समजण्यासाठी लक्षणे तपासणे महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया हळूहळू होत असल्याने कालानुरूप त्रासदायक ठरते. हार्ट फेल्युअरच्या सर्वसाधारण लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे? धाप लागणे, भूक न लागणे आणि मळमळणे, हृदयाचे ठोके वेगाने किंवा अनियमित असणे, सातत्याने खोकला किंवा छातीत धडधडणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, सूज येणे किंवा द्रव पदार्थ जमा होणे.

हेही वाचा : 

Back to top button