आरोग्य : डोकेदुखीची काय आहेत कारणे आणि त्यावर उपाय | पुढारी

आरोग्य : डोकेदुखीची काय आहेत कारणे आणि त्यावर उपाय

डॉ. भारत लुणावत

सकाळी उठल्या-उठल्या जर खूप डोकेदुखी जाणवते का, दिवसाच्या सुरुवातीलाच डोकेदुखीच्या गोळ्यांचे सेवन करता का, डोकेदुखीमुळे सकाळ खराब होते का. या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर ही गोष्ट दुर्लक्षित करू नका. सर्वसाधारणपणे कामाचा ताण किंवा चुकीची जीवनशैली डोकेदुखीचे कारण असते; पण रात्री उशिरा जागणे किंवा कामाचा ताण एवढेच डोकेदुखीचे कारण नाही तर सकाळी होणार्‍या डोकेदुखीचे आणखी एक कारणही आहे. काय आहेत ही कारणे पाहूया.

अनेक कारणे

रोज सकाळी होणारी डोकेदुखी गंभीरपणे घेतली पाहिजे. सतत काही दिवस ही समस्या भेडसावत असेल तर त्वरित डॉक्टरकडे जायला हवे. सकाळी होणार्‍या डोकेदुखीची कारणे अनेक असू शकतात. मायग्रेन हे देखील त्याचे मुख्य कारण असू शकते. सकाळी चार ते आठ – नऊ वाजता शरीरातून काही नैसर्गिक वेदनाशामक जसे एंडोमॉर्फिन आणि एनकेफलिनों स्रवतात. आपला रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांचा प्रसरण आणि आकुंचन प्रभावित करते. विशेषतः मायग्रेनच्या रुग्णांना त्याची जाणीव अधिक होते. त्यामुळे सकाळी उठताच तीव्र वेदना होतात.

आजारपण ठरते कारण : मायग्रेन आणि तणाव यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या आजारांमुळे सकाळची डोकेदुखी होते. त्यात हेमोरेज, सायनोसायटिस, ब्रेन ट्युमर, उच्च रक्तदाबाची समस्या, डिप्रेशन, स्लीप एप्निया, अनिद्रा अर्थात रात्री नीट झोप न येण्याची समस्या इत्यादी प्रमुख कारणे असतात. काही वेळा अनेक प्रकारच्या औषधांचे सेवन, रात्री अति कॉफी किंवा अल्कोहोलचे सेवन यामुळेही झोपेत अडथळा येतो. रात्री नीट झोप न झाल्यास व्यक्तीला सकाळी उठल्यावर डोके जड झाल्यासारखे वाटते.

संबंधित बातम्या

गंभीर परिणाम

सकाळी होणार्‍या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात किंवा सकाळी गोळी घेऊन टाळतात त्यांना नंतर गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. सकाळी होणार्‍या डोकेदुखीवर योग्य उपचार न केल्यास भविष्यात व्यक्तीला लकवा, फीटस् आणि अवेळी बेशुद्ध होणे यांसारख्या गंभीर समस्या भेडसावतात.

असे करावे उपाय : आठवड्यातून दोन तीन वेळा उठल्यावर डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरी सल्ला घेण्याची गरज घेण्याची वेळ आली आहे. डॉक्टरांचा सल्ला, एमआरआय आणि ईईजी सारख्या तपासण्या केल्यानंतर डोकेदुखीची कारणे शोधता येतात. त्यामुळे त्यावर उपचार करणे सोपे जाते आणि प्रभावी होते. डोकेदुखीमुळे रात्री नीट झोप लागत नसेल तर त्याच्या कारणांवर काम करावे. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी टीव्ही पाहाण्याचा वेळ कमी करावा. रात्री झोपण्यापूर्वी अल्कोहोल किंवा कॅफिनचे सेवन करणे टाळावे. तणाव कमी करण्यासाठी सकाळी ध्यानधारणा करावी. त्यामुळे मन शांत होते आणि रात्री चांगली झोप येते. औषधांमुळे डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांमध्ये आवश्यक ते बदल करावेत. काही स्थितींमध्ये औषधांचे सेवन केल्याने सकाळी होणार्‍या डोकेदुखीवरील उपचार करणे शक्य होते.

Back to top button