‘फिट्स’चा त्रास का हाेताे? जाणून घ्‍या कारणे आणि लक्षणे | पुढारी

'फिट्स'चा त्रास का हाेताे? जाणून घ्‍या कारणे आणि लक्षणे

फिट्स येणे या त्रासाला एपिलेप्सी असे शास्त्रीय नाव आहे. मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यास या आजाराचे लक्षण दिसून येते. जाणून घेवूया या आजाराची कारणे आणि लक्षणे

माणसाच्या मेंदूमध्ये बारा हजार कोटी पेशींचा एक समूह असतो. या पेशींचे एकमेकांत सतत चलनवलन सुरू असते. या चलनवलनाचे स्वरूप विद्युत रासायनिक पद्धतीचे असते. हे चलनवलन एका लयीत सुरू असते. काही कारणाने ती लय विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम म्हणून तीव्रतेने विजेचा ताण मेंदूत पसरतो. तो जेथे जातो तेथील पेशी विघटित होऊ लागतात. मेंदू पेशीत जे काही घडते त्याची प्रतिक्रिया शरीरावर दिसू लागते. काही काळापुरते शरीरात बदल दिसतात. काहीवेळा वागणुकीत फरक पडल्याचे दिसून येते. भीती, क्रोध, चिंता यासारख्या भावना अनुभवास येऊ शकतात. काही व्यक्तींना शरीरात कुठलीतरी संवेदना जाणवू लागते. असा बदल होण्याचे कारण मात्र समजत नाही. काही वेळा मानसिक ताणतणाव, इतर शारीरिक आजार, आहारातील त्रुटी किंवा मद्यपान यांसारखीही कारणे दिसतात.

या आजारामध्ये दहा टक्के रुग्ण विशिष्ट प्रकारची धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्थितीला शास्त्रीय भाषेत स्टेट्झ एपिलेप्सी असे म्हणतात. या स्थितीमध्ये एका मागोमाग एक फिट्स येत राहतात. दोन झटक्यांमध्ये रुग्ण नेहमीसारखा सामन्य राहत नाही. अशी स्थिती काही वेळा प्राणघातक ठरू शकते. प्रत्येक रुग्णाच्या तक्रारीचे स्वरूप वेगवेगळे असते आणि फिट्सचे वेगवेगळे प्रकारही दिसू शकतात.

काही रुग्णांना शरीराच्या एखाद्या भागात मुंग्या आल्या आहेत, इतका छोटा फरक जाणवतो. दुसर्‍या टोकाला हाता-पायांना जोर जोरात झटके येतात. या तक्रारी केवळ फिट्समुळेच येतात असेही नाही. काही प्रकारच्या हृदयविकारात खूप जास्त भीतीमुळे किंवा काहीवेळा श्वसनातील दोषांमुळे देखील अशी लक्षणे येऊ शकतात. म्हणूनच हा त्रास नेमका कशाने झाला आहे हे शोधून मगच त्यावर प्रभावी इलाज करता येतो. काही रुग्णांना त्रास होण्याआधी सूचना मिळते. त्याला ऑरा असे म्हणतात. याचा आजाराचे निदान करण्यास चांगला उपयोग होतो.

शास्त्रानुसार एपिलेप्सीचे दोन प्रकार मानले जातात. पहिल्या प्रकारात संपूर्ण शरीरावर एपिलेप्सीचा परिणाम दिसून येतो. त्याला जनरलाईज्ड एपिलेप्सी, तर दुसर्‍या भागात मेंदूच्या विशिष्ट भागापुरताच त्रास होतो याला पार्शल किंवा फोकल एपिलेप्सी म्हणतात. फिट्सच्या वर्णनावरून जनरलाईज्ड एपिलेप्सिचे काही प्रकार मानले गेले आहेत. त्यावरून उपचारही ठरविले जातात. वेगवेगळ्या काही तपासण्यांमुळे निदान करायला पुष्टी मिळते. प्रत्यक्ष फिट पाहणार्‍या साक्षीदारांकडून फिट्सचे वर्णन समजून घेऊन हा निदान करण्याचा सर्वात विश्वासाचा मार्ग होय.

एपिलेप्सीचा नेहमी अढळणारा प्रकार म्हणजे ग्रँड माल सिझर्स. हा फ्रेंच शब्द असून, त्याचा अर्थ मोठा आजार असा होतो. रुग्णाला आपल्या पोटात खड्डा पडत आहे आणि आता फिट येणार असे काही सेकंद जाणवते. यानंतर त्याच्या तोंडातून मोठा आवाज बाहेर पडतो. त्यानंतर संपूर्ण शरीराचे स्नायू ताठरतात. हात, पाय, पाठ कडक होते. नंतर हातापायाचे, चेहर्‍याचे स्नायू जोरात आकुंचन प्रसरण होऊ लागतात, झटके येतात. ऑरा संपता संपता पूर्ण बेशुद्ध होतो. या स्थितीत रुग्णाला ऑरा आठवतो; पण नंतरचे काहीच आठवत नाही. बेशुद्ध झाल्यानंतर रुग्ण खाली पडतो, त्यामुळे मोठी इजा होण्याची शक्यता असते. या झटक्यानंतर काही काळ रुग्ण निपचिप, बेभान स्थितीत पडून राहतो. काही वेळा नकळत मलमूत्र विसर्जन होते, घाम येतो, उलटी येते. काही काळ बेशुद्ध राहिल्यानंतर रुग्ण हळूहळू शुद्धीवर येतो. पूर्ण जाग येण्यास कमी जास्त वेळ लागतो. या अर्धवट जागृतीच्या काळात रुग्णाला स्थळकाळाचे भान नसते. त्याला पोस्ट एपिलेप्टीक ऑटोमॅटिझम असे म्हणतात. या काळात रुग्णाचे वागणे चमत्कारिक वाटते. असा काळ कमी-जास्त असतो. यावेळी रुग्णाला झोप लागू शकते.

झोपेतून उठल्यावर रुग्ण जागा होतो; पण एपिलेप्सीचा झटका आल्याचे त्याला स्मरत नाही. जीभ चावली गेल्या किंवा पडल्यामुळे झालेली इजा त्याला जाणवू लागते. एपिलेप्सीचा हा प्रकार सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतो.

जनरलाईज्ड एपिलेप्सीचा दुसरा प्रकार म्हणजे पेती माल होय. पेती म्हणजे लहान. हा प्रकार लहान मुलात विशेष करून आढळतो. मूल काही सेकंदापुरते जाणीव हरवते. काही मुले अन्न चावण्याची क्रिया करतात, तर काहींना काही सेकंदापुरते हातापायांना कंप येतो.

मायोक्लॉनिक सिझर्स हा जनरलाईज्ड सिझर्सचा तिसरा प्रकार आहे. अचानक शरीर दचकावे म्हणजे एखादा झटका बसल्यासारखे यामध्ये होते. एका मागोमाग एक असे झटके बसू लागतात. अ‍ॅटोनिक सिझर्समध्ये व्यक्तीचे क्षणभर भान हरपते. बेशुद्ध होते, स्वाभाविकपिणे पडतो, यामुळे डोक्याला व शरीराला इजा होतात. पार्शल एपिलेप्सीमध्ये मेंदूच्या एखाद्या मर्यादित भागातच हा अनैसर्गिक विजेचा प्रवाह वाहतो. काहीवेळा अशी सुरुवात होऊन मग तो प्रवाह मेंदूत पसरू शकतो. यामध्ये साध्या आणि गुंतागुंतीच्या केसेस मिळू शकतात. साध्या प्रकारात रुग्ण बेशुद्ध होत नाही. केवळ एखाद्या ठिकाणी स्नायूंचा गोळा होतो. एखाद्या ठिकाणी मुंग्या येतात. काही मिनिटांत सारे पूर्ववत होते. तर गुंतागुंतीच्या किकच्या वेळी रुग्ण एकाद्या मिनीटभर भान हरपतो. रुग्ण अवकाशात नजर लावतो. निरर्थक हालचाली करतो. मात्र या प्रसंगाची रुग्णाला आठवण राहत नाही.

फिट्स येण्याच्या प्रत्येक प्रकारावर चांगले औषध उपलब्ध आहेत; मात्र योग्यवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्य सल्ल्यानुसार औषधोपचार घेऊन सल्ल्याप्रमाणे नियम पाळावेत. या रुग्णांनी जागरणे टाळावीत, टीव्हीपुढे सिनेमा पाहणे टाळावे, चहा- कॉफीसारखी उत्तेजक पेये टाळावीत, जास्त थकवा येईल अशी कामे करू नयेत. पुरेशी विश्रांती घ्यावी. अशा प्रकारे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करून घेतले तर हा आजार सहज नियंत्रणात ठेवता येतो.

डॉ. महेश बरामदे

Back to top button