सतत बैठे काम करणे, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे, पोषक आहाराचा अभाव, वाढते वजन यासारख्या कारणांमुळे कंबरदुखीची ( Back Pain ) समस्या वाढत असल्याचे दिसते. मात्र या त्रासावर नियंत्रण मिळवणे तितकेसे अवघड नाही. योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराला योग्य शिस्त लावली तर या त्रासावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे.
अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्येच नाही तर कंबरदुखीची समस्या हल्ली तरुणांमध्येदेखील वाढत असल्याचे दिसत आहे. सामान्यत: कंबरदुखीमुळे उभे राहणे, वाकणे, वळणे यांसारख्या क्रिया करताना खूप त्रास होतो. सुरुवातीलाच याबाबत उपचार केले नाहीत तर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते; मात्र वेळेवर उपचार केल्यास त्रास कमी करता येतो. खास करून बदललेल्या जीवनशैलीमुळे सतत बैठे काम करणे, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे, पोषक आहाराचा अभाव, वाढते वजन यांसारख्या कारणांमुळे कंबरदुखीची समस्या वाढत आहे. मात्र या त्रासावर नियंत्रण आणणे तितकेसे अवघड नाही. योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराला योग्य शिस्त लावली तर या त्रासावर नियंत्रण मिळवणे सहजशक्य आहे.
अर्थात कुठल्याही त्रासावर, अडचणीवर वा अडथळ्यावर मात करायची तर तो त्रास कशासंबंधीचा आहे आणि कशापायी निर्माण झाला आहे हे विज्ञाननिष्ट द़ृष्टिकोनातून समजून घेणे अत्यावश्यक असते. त्यामुळे आपण कंबरदुखीची मुळं शोधायचा प्रयत्न करूया. आपला पाठीचा मणका ३२ हाडांनी बनलेला असतो. यामधील २२ हाडे सक्रिय भूमिका निभावत असतात. या हाडांच्या गतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो तेव्हा कंबरदुखीची समस्या सुरू होते. मणक्याच्या हाडांव्यतिरिक्त आपल्या कंबरेच्या बनावटीत कार्टिलेज, डिस्क, सांधा, स्नायू आणि लिगामेंट इत्यादींचा समावेश असतो. यापैकी कुठल्याही भागाला कुठल्याही प्रकारचा त्रास निर्माण झाला म्हणजे कंबरदुखी सुरू होते.
आपल्या शरीराची उठण्या-बसण्याची पद्धत योग्य नसेल तर मणक्याच्या हाडाची संरचना बदलते. यामुळे कंबरेच्या खालच्या भागात, मानेमध्ये वेदना सुरू होतात.