मुकाबला हार्पिसचा

मुकाबला हार्पिसचा
Published on
Updated on

अनेकदा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर लहान लहान पुरळ येतात. आपल्याला वाटते अ‍ॅलर्जी किंवा फंगल इन्फेक्शन आहे. आपण काहीतरी थातूरमातूर उपचार करतो, तेवढ्यापुरते बरे वाटते मग आपण त्याकडे लक्षच देत नाही, पण असे करणे धोकादायक ठरू शकते. शरीरावर उठणारे हे लहान लहान पुरळ पुढे हार्पिस (नागीण) या विकाराचे लक्षणही असू शकतात.

एका संशोधनानुसार हार्पिस (नागीण)हा आजार वयाच्या 40 वर्षांनंतर बहुतांश करून होतो. हार्पिस वेरिसेला जोस्टर नावाच्या विषाणूपासून हा आजार होतो. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे यात अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. हा आजार वयाच्या चाळिशीनंतर कुणालाही आणि केव्हाही होऊ शकते, पण ज्यांना कांजिण्या येऊन गेल्या असतील त्यांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते असे म्हटले जाते. कांजिण्याचा विषाणू म्हणजेच वेरिसेला जोस्टर शरीरात आधीपासूनच असेल तर हार्पिस होण्याचा धोका जास्त असतो.

हार्पिसचे प्रकार आणि लक्षणे

हार्पिस दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे एचएसव्ही-1 म्हणजे हार्पिस टाईप 1 किंवा ओरल हार्पिस आणि दुसरा एचएसव्ही-2 म्हणजे जिनायटल हार्पिस किंवा हार्पिस टाईप 2. या आजाराच्या लक्षणांबाबत बोलायचे तर काही लोकांमध्ये या आजाराची लक्षणे अगदी काही महिन्यांपर्यंत दिसून येत नाहीत. तर काहींच्या बाबतीत दहा दिवसांमध्येच ती दिसतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हार्पिसमध्ये जननेंद्रिये आणि शरीराच्या अन्य भागांवर पाण्याने भरलेले पुरळ उठतात. जसे ते मोठे होतात, तसे ते फुटतात आणि त्यातून जे पाणी बाहेर पडते ते शरीराच्या अन्य भागांना लागते आणि तेथे संसर्ग होतो. म्हणूनच असे फोड किंवा पुरळ उठले तर ते फोडू नका किंवा त्यांना हातही लावू नका. कारण ते फोडले तर ते पाणी शरीरावर इतरत्र लागते किंवा कपड्यांना लागते आणि त्यातून संसर्ग वाढतो. अशा रुग्णालाही अन्य लोकांपासून लांब ठेवले पाहिजे. त्याचे कपडे, भांडी इतकेच नव्हे तर तो वापरत असलेल्या सर्व वस्तूही वेगळ्या ठेवल्या पाहिजेत आणि त्या सर्व वस्तू स्वच्छ असल्या पाहिजेत.

अन्य लक्षणे –

– हार्पिस असेल तर जननेंद्रिये आणि शरीराच्या अन्य भागांवर पाण्याने भरलेले फोड उठतात. ते मोठे झाल्यावर फुटतात आणि त्यातील पाणी शरीराच्या अन्य भागांना लागते आणि त्यातून संसर्ग पसरतो.
– संपूर्ण शरीरात वेदना आणि खाज सुटते. तोंडात तसेच शरीरातील अन्य भागांवरही व्रण उठतात.
– सारखा ताप येतो आणि लिंफ नोड्स मोठे होतात.
– शरीरावर सर्वत्र लाल चट्टे उठतात.
– हे फोड उठण्यापूर्वी रुग्णाला वेदना होतात.
– वेदना झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्या जागेवरील त्वचेवर लाल रंगाचे पुरळ उठायला सुरुवात होते आणि हळूहळू या फोडांमध्ये पाणी होते.
– याशिवाय सांधेदुखी, डोकेदुखी आणि थकवा येऊ लागतो. फोडांमध्ये वेदना होणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. अनेक रुग्णांमध्ये या वेदना असह्य असतात.

पावसाळ्यात हा आजार होण्याचा धोका जास्त. वास्तविक पाहता हार्पिसचा विषाणू कायमच वातावरणात असतो, पण हिवाळा आणि पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. शरीराच्या कोणत्याही भागात हा आजार दिसतो. अनेक वेळा लोक याकडे गंभीरपणे पाहत नाहीत आणि वेळेवर लक्ष न दिल्यामुळे त्याचा संसर्ग डोळे आणि नाकाकडेही पसरू लागतो. सर्वसाधारणपणे याच्या संसर्गाची सुरुवात सर्वाधिक चेहरा आणि छातीवर दिसून येते. या आजाराबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे या आजारातील संसर्ग किंवा इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट करता येत नाही. वारंवार त्याची लक्षणे दिसून आल्यावर ते केवळ बरे केले जाऊ शकते.

हार्पिसपासून बचाव करायचा असेल सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे गरजेचे आहे. सेक्सच्या वेळी निरोधचा वापर करा. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध ठेवू नका. याशिवाय पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेवर कुठेही वेदना होऊन फोड आलेले दिसले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुखणे अंगावर काढू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news