कंबरदुखी चा त्रास | पुढारी

कंबरदुखी चा त्रास

डॉ. संजय गायकवाड

पाठदुखी व कंबरदुखी यामुळे खूप तीव्र्र स्वरूपाचा त्रास होतो; पण वेळेत उपचार घेतल्यास यापासून आराम मिळतो. आपल्या पाठीवरच आपल्या शरीराचा भार पडत असल्यामुळे पाठीची काळजी घेणे हे आपले दैनंदिन व्यवहार उत्तम चालण्यासाठी खूप आवश्यक आहे.

आपल्या पाठीच्या कण्यावरच आपल्या संपूर्ण शरीराचा भार अवलंबून असतो. त्यामुळे पाठदुखीचा त्रास म्हणजे आपल्या शरीराच्या बहुतांश क्रियांवर बंधने येतात. काहीवेळा फक्‍त खाली वाकल्यास किंवा एखादी वस्तू उचलल्यासही वेदना होतात. यामध्ये पाठीच्या खालच्या भागातील म्हणजेच कंबरेतील वेदना या जास्त तीव्र असतात. यालाच ‘लो बॅक पेन’ असे म्हणतात. यामध्ये कंबरेच्या भागात सतत कमी वा जास्त वेदना होतात. सततच्या वेदनांमुळे आग होणे, स्नायू आखडणे, बधिरता, मुंग्या येणे इत्यादी त्रास होतात.

आपण उभे राहतो तेव्हा आपल्या शरीराचा बहुतांश भार आपल्या कंबरेवर पडतो. जेव्हा आपण वाकतो, वळतो किंवा एखादी जड वस्तू उचलतो तेव्हा कंबरेचीही मोठ्या प्रामाणावर हलचाल होते. कंबरदुखीचा त्रास असेल, तर अशाप्रकारची हलचाल केल्याने तीव्र वेदना होतात. कंबरदुखीमुळे आपल्या दैनंदिन कामकाजावर तर परिणाम होतोच शिवाय सततच्या दुखण्यामुळे आपल्या उत्साहातही कमतरता येते. त्यामुळे रोजचे आयुष्य म्हणजे एक दुखणे होऊन बसते.

एका सर्वेक्षणानुसार 70 टक्के लोक आयुष्यात एकदा तरी कंबरदुखीने त्रस्त होतातच. याचे जास्त प्रमाण 45 ते 64 या वयोगटातील व्यक्‍तींमध्ये असते. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. 90 टक्के लोकांच्या बाबतीत सहा आठवड्यांमध्ये कंबरदुखी थांबते. 5 टक्के लोकांना यासाठी 12 आठवडे लागतात, तर उर्वरित 5 टक्के लोकांची पाठदुखी ही तीव्रता होऊन बसते.

कारणे : कंबरदुखी किंवा पाठदुखीचे एक सर्वसामान्य कारण बसण्याची व उभे राहण्याची चुकीची पद्धत हे आहे. सरळ बसण्यामुळे आपल्या पाठीच्या कण्यावर व कंबरेवर पडणार्‍या अनावश्यक भाराचे ओझे कमी होते व आपला कणा, हाडे व इतर अवयव त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत राहतात. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो व परिणामी त्याच्या आसपासचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे कंबरदुखीची सुरुवात होते. याशिवाय ओस्टिओपोरोसिस, स्कोलिओसिस, स्पाईनल स्टेनॉसिस इत्यादी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. फायब्रोमायल्जिया व पाठीच्या भागात एखादी गाठ असणे हेही कारण असते. याशिवाय पाठीत आघात होणे, पाठीवर अती भार पडल्यामुळे पाठीतील उतींना दुखापत होणे किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे इत्यादी कारणांमुळेही पाठदुखीचा, कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

उपचार : कंबरदुखी ही गंभीर समस्या असली, तरीही त्यावर उपचार शक्य आहे. वेळेत व योग्य उपचार घेतल्यास उपचारात वेळही जात नाही व त्रासही कमी होतो. कंबरदुखीसाठी सामान्यपणे केला जाणारा उपचार म्हणजे कॉन्झरवेटिव्ह ट्रिटमेंट होय. यामध्ये पाठीला विश्रांती देण्यापासून शॉर्ट वेव्ह डायथेरमी, नॉन स्टेरॉयडल अँटी इनफ्लेमेटरी औषधे, वजनावर नियंत्रण, स्टेरॉईड इंजेक्शन असे टप्प्याटप्प्याने उपचार केले जातात.

आठ ते बारा आठवड्यांच्या सतत उपचारांनंतरही बरे न वाटल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. ‘डिसेक्टॉमी’ ही शस्त्रक्रियेची पद्धत यासाठी वापरली जाते. या पद्धतीत शस्त्रक्रिया करून पाठीतील वेदनेचे कारण असलेला मणक्यामधील एक छोटासा पातळ भाग काढून टाकला जातो. या शस्त्रक्रियेनंतर मज्जातंतूवरील भार कमी करून मणक्याचा तो भाग आणखी चांगल्याअवस्थेत आणता येतो. मज्जातंतूंवर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जन फोरॅमिनॉटॉमी ही उपचार पद्धतही वापरू शकतात.

दरवेळी शस्त्रक्रियाच करावी लागते, असे नाही. काहीवेळा सामान्य उपचारांनीही हे दुखणे घालवता येते; पण त्यासाठी प्राथमिक लक्षणे ध्यानात घेऊन त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय काहीवेळा शारीरिक आघातापेक्षा किंवा दुखापतीपेक्षाही मानसिक त्रासामुळे बसण्याच्या व उभे राहण्याच्या पद्धतीत बदल होणे हेही त्रासाचे कारण होऊ शकते. अशा त्रासावर काहीवेळा शस्त्रक्रियेने उपचार करता येत नाही.

आयुर्वेदिक द‍ृष्टिकोन: आयुर्वेदानुसार कंबरदुखी किंवा पाठदुखी ही ‘वात’, ‘कटिग्राहम’ व परिष्टशूल या त्रिदोषांमुळे होते. याशिवाय हाडे व स्नायू यांच्या कमजोरीमुळेही पाठदुखीचा त्रास होतो, असे आयुर्वेदात म्हटले आहे.

आयुर्वेदिक उपचार : आयुर्वेदिक उपचारांनुसार बिघडलेले त्रिदोष त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत पुन्हा आणल्यास कंबरदुखी थांबते. आयुर्वेदात कंबरदुखीसाठी बाह्य व अंतर्गत असे दोन्ही उपचार सांगितलेले आहेत. ‘अस्थवार्गम’ हे आयुर्वेदिक औषध दिले जाते. त्याचबरोबर रोज विरेचन करण्याचा उपचार सांगितला आहे. यामुळे शरीरातील सर्व विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

आयुर्वेदिक पंचकर्मामुळेही खूप फायदा होतो. पंचकर्मातील अभ्यंग, बस्ती यासारख्या क्रियांमुळे शारीरिक क्रियांमध्ये समतोल येतो व हाडे आणि स्नायूंच्या सर्व समस्या दूर होतात. योगराजगुगुळ, लक्षादिगुगुळ, त्रिफळ गुगुळ, महानारायण तैलम इत्यादी औषधे यासाठी उपयुक्‍त आहेत.

योगासनाचे फायदे : शारीरिक व्याधींचे मूळ शरीरातील दोषांमध्ये तर आहेच, त्याचबरोबर मानसिक दोषांमध्येही आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. यासाठी योगासन व प्राणायाम सांगितला आहे. ध्यान पद्धतही खूप प्रभावी आहे. यामध्ये एका जागी बसून मन शांत करावे
व आपले पूर्ण लक्ष दुखर्‍या भागावर केंद्रित करावे. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा त्या एका भागावर केंद्रित करून दुखर्‍या भागावर उपचार करता येतो.

पाठदुखी व कंबरदुखी यामुळे खूप तीव्र स्वरूपाचा त्रास होतो, पण वेळेत उपचार घेतल्यास यापासून आराम मिळतो. आपल्या पाठीवरच आपल्या शरीराचा भार पडत असल्यामुळे पाठीची काळजी घेणे, हे आपला दैनंदिन व्यवहार उत्तम चालण्यासाठी खूप आवश्यक आहे.

Back to top button