

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे मोठे, वाढलेले आणि जांभळ्या रंगाची सूजलेली नस असते. अशा प्रकारच्या नस पायावर दिसतात. साधारणपणे 40 पेक्षा अधिक वयोगटातील मंडळींना ही समस्या दिसते. शरीरातील नस या हृदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी स्नायू आणि व्हॉल्व्हर अवलंबून असतात. या नसांमध्ये व्हॉल्व्ह असतात आणि हे वॉल्व्ह कोशिकांना ऑक्सिजन दिल्यानंतर ते रक्त परत हृदयाला पाठवण्याचे काम करतात. हे व्हॉल्व्ह वन वे व्हॉल्व्ह असतात. यात कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास रक्त मागे जाते आणि नसांमध्ये जमा होत राहते. परिणामी, त्यामध्ये सूज येते. रक्ताचा वाढता दबाव सहन करताना नसांवरील सूज वाढून व्हेरिकोज व्हेन्स दिसू लागतात.
व्हेरिकोज व्हेन्सचे प्राथमिक लक्षण म्हणजे फुगणारी नस. याशिवाय अन्य काही लक्षणे सांगता येतील. पाय आणि टाचेजवळ नस सूजणे, बाधित पायावर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे नसांचे जाळे दिसणे, पाय जड होणे, दुखणे, आगआग होणे, पायातील स्नायू कडक होणे, बाधित क्षेत्रात काळसरपणा येणे इत्यादी लक्षणेही यात दिसून येतात.
पायाच्या नसा कधी कधी फुगतात. त्यामुळे बाधित पायांत दुखणे आणि भरपूर सूज येऊ लागते. ही बाब ब्लड क्लॉटिंगचा संकेत असू शकते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत 'थ्रोम्बोफ्लिबिटस्'असे म्हटले जाते. व्हेरिकोज व्हेन्समध्ये त्वचेवर विशेषत: टाचेजवळ वेदनादायी अल्सर तयार होतात.
उपाय : रक्तप्रवाह चांगला राहण्यासाठी पायांच्या स्नायूंना बळकटी देणे गरजेचे आहे. व्हेरिकोज व्हेन्स रोखण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे वजन कमी करणे. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण चांगले राहू शकते आणि वजनही नियंत्रित राहू शकते. नियमित व्यायाम, योगासन केल्याने व्हेरिकोज व्हेन्समुळे होणार्या अडचणी दूर करण्याबरोबरच त्यास रोखण्यासाठीदेखील मदत करू शकते.
फायबरयुक्त आणि कमी मिठाचा आहार याचाही व्हेरिकोज व्हेन्स रोखण्यासाठी आधार लाभतो. घट्ट कपडे हे शरीरातील रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम करतात. रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्व्ह अगोदरपासूनच डॅमेज असेल, तर अशा कपड्यांमुळे नसांचे आवरण आणखी कमकुवत होऊ शकते. त्यामुळे सैलसर कपडे वापरा.
अलीकडील काळात व्हेरीकोज वाढण्याचे एक मुख्य कारण दिसून आले आहे ते म्हणजे दीर्घकाळ एकाच ठिकाणी पाय सोडून बसणे. यामुळे शिरांवर ताण पडतो. यामुळेही हेरिकोज व्हेन्सचा त्रास बळावतो. म्हणूनच पायांच्या हालचाली कायम ठेवा. एकाच स्थितीत पाय जास्त काळ ठेवू नका. झोपताना पायाखाली उशी ठेवल्यास नसांवरील ताण हलका होतो. कार्यालयात टेबलवर काम करताना पायाखाली लाकडी बॉक्स ठेवा. स्थिती गंभीर बनल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्क्लेरोेथेरेपी, मायक्रोस्क्लेरोथेरेपी, लेसर सर्जरी, अँडोव्हेनसर अॅब्लेशनथेरेपी, एंडोस्कोपिक सर्जरी आदींच्या साहाय्याने यावर प्रभावी उपचार होऊ शकतात.