बाळाला अतिघाम येतोय?; घामाची 'ही' ५ कारणे माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्‍य वेळी उपचार करता येतील | पुढारी

बाळाला अतिघाम येतोय?; घामाची 'ही' ५ कारणे माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्‍य वेळी उपचार करता येतील

डॉ. प्राजक्ता पाटील :  शरीराला घाम येणे ही चांगली गोष्ट आहे. वास्तविक घामावाटे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात; मात्र बाळाला झोपताना नेहमीपेक्षा जास्त घाम येणे नक्कीच चांगले नाही. विशेषतः बाळाच्या हातांना किंवा तळव्यांना जास्त घाम येत असेल तर एखाद्या गंभीर विकाराचे हे संकेत आहेत. खूप उष्णता किंवा वाढते तापमान याचा हा परिणाम आहे असे समजून जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर मात्र नंतर पश्चात्तापाची पाळी येणार आहे. त्यामुळे बाळांना येणार्‍या घामाचे कारण माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य वेळी त्यावर उपचार करता येऊ शकतात. बाळांच्या हाताला किंवा तळव्यांना घाम येण्याची 5 कारणे पाहूयात.

हातांना आणि तळव्यांना घाम गंभीर समस्या : उन्हाळ्याच्या काळात जास्त उष्णतेमुळे शरीरातून घाम येणे अगदीच नैसर्गिक आहे, पण बाळांच्या हातांना किंवा तळव्यांना कोणत्याही कारणाशिवाय घाम येत असेल तर हा गंभीर समस्येकडे इशाराही असू शकतो. असे झाल्यास बाळाला उठवावे जेणेकरून ते रडू लागेल. त्यानंतर बाळाला डॉक्टरकडे घेऊन जावे.

श्वास घेण्यास त्रास : अनेकदा झोपेत बाळाचा श्वास काही काळासाठी थांबतो. बाळाला श्वास घेण्यात अडचण येत असेल तर बाळाच्या तळव्यांना, शरीरातून खूप घाम येतो. अशा वेळी बाळाला हलवून उठवावे जेणेकरून ते रडू लागेल. रडताना बाळ जोराजारात श्वास घेऊ लागते. त्यामुळे शरीरात ऑक्सीजनची पूर्तता होते. बाळ झोपत असताना श्वासाची घरघर जास्त प्रमाणात ऐकायला येत असेल तर मात्र बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे. कारण अशी घरघर होणे प्राणघातक ठरू शकते.

तापाचे कारण : ताप येतो तेव्हा शरीरातून खूप जास्त घाम बाहेर पडतो. बाळाला घाम येत असेल तर त्याला ताप नाही ना हे तपासावे.

हृदयरोग :  बहुतांश वेळा बाळांना जन्मापासूनच हृदयाशी निगडित एखादा आजार असतो. हृदयामध्ये छिद्र असणे, अनियमित ठोके, अनुवांशिक हृदयरोग यामुळे बाळांना सामान्य पातळीपेक्षा जास्त घाम येतो. अशा वेळी घाम येत असताना बाळाच्या त्वचेचा रंग तर बदलत नाही ना किंवा त्याचा श्वास थांबत नाही ना हे पहावे. तसे होत असल्यास बाळाला सीपीआर द्यावा किंवा त्वरित चांगल्या रुग्णालयात हलवावे.

हायपरहायड्रोसिस : हायपरहायड्रोसिसमुळे बाळांच्या शरीरावर जास्त घाम येऊ लागतो. अशा वेळी घाबरून न जाता बाळाला घेऊन डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.

Back to top button