संकोचदायी समस्या | पुढारी

संकोचदायी समस्या

डॉ. मनोज कुंभार :  वाढत्या वयोमानानुसार आपल्यातल्या अनेक व्यक्तींना विविध प्रकारची औषधं घ्यावी लागतात. त्यातील मूळव्याध, बद्धकोष्ठ किंवा इतर काही ठराविक औषधे घ्यावी लागणे, मूत्राशयासंदर्भाने एखादे इन्फेक्शन होणे अशी कारणेसुद्धा मूत्राशयावर संयम न रहाण्यासाठी पुरतात.

मूत्रपिंडाचा एखादा स्नायू दुबळा झाला, मूतखडा झाला, पार्किन्सन्स किंवा अर्थरायटीससारखा मूत्रपिंडावरचा संयम जाऊ शकणारा आजार झाला तर काही वेळा त्यामुळे आलेली मूत्रपिंडावरची अस्वस्थता ही जास्त कालावधीसाठी टिकून रहाते. नेमकेपणाने सांगायचे तर मूत्राशयावर संयम न रहाण्याची अनेक कारणे व लक्षणे असू शकतात. ती पुढीलप्रमाणे सांगता येतात.

घाई होणे आणि ताबा न रहाणे हे यातील प्रमुख सूचन. लघवीसाठी जाताना त्या जागी पोहोचेपर्यंतसुद्धा काहीजण स्वत:वर ताबा ठेवू शकत नाहीत इतकी त्यांना घाई होते. सुद़ृढ-निरोगी व्यक्तींमध्ये सहसा ही अडचण दिसत नाही, परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन्स ह्या व्याधींसहित जगणार्‍या व्यक्तींमध्ये लघवीवरील ताबा न रहाण्याची अडचण बर्‍याचदा दिसून येते. दुसरं म्हणजे व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरीरावर ताण येणारी कोणतीही हालचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मूत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यमवयीन स्त्रियांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रियांना ही अडचण येऊ शकते. मूत्रप्रवाहावर असंयमन होते, जेव्हा थोडी लघवी न होता खूपच जास्त होते. पुरुषांचे प्रोस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्यांना अनेकदा ह्या व्याधीला सामोरे जावे लागते. मधुमेह किंवा मणक्याची काही व्याधी ह्यामुळेसुद्धा अतिप्रवाह असंयमनाची अडचण वाढू शकते. वृद्ध व्यक्तींमध्ये मूत्राशयावरील सामान्य असंयमनाची अडचण अनेकदा येते. ही अडचण अशांवर येते, ज्यांचे मूत्राशयावरील संयमन सर्वसामान्य आहे परंतु त्यांना लघवी लागल्यावर इतर काही कारणांमुळे उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, अर्थरायटीस, गुडघे दुखी, अशक्तपणा ह्या व्याधींमुळे ही अडचण येऊ शकते.

तसे पाहता वृद्धत्वामुळे नेहमी येणार्‍या अडचणी अनेक असतात. मूत्राशयाच्या समस्या, द़ृष्टीमध्ये येणार्‍या अडचणी, अल्झायमर, डिमेंशिया, हृदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. याविषयी तुलनेने मोकळेपणाने बोलले जाते पण मूत्राशयावर ताबा नसलेली अनेक माणसे ह्या व्याधीबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचे टाळतात. खरे तर प्रथम थोडा त्रास होत असेल तरीही डॉक्टरांशी बोलणे अत्यंत जरुरीचे असते. कारण उपचारामुळे मूत्राशयाचा थोडा जरी त्रास असेल तरीही तो आटोक्यात येऊ शकतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तुमच्या अनेक चाचण्या घेतील, तुमच्या आरोग्याचा पूर्व इतिहास विचारतील, कौटुंबिक आरोग्याचा इतिहास विचारतील, आणि त्यावरून तुमच्या उपचारांचा निर्णय घेऊन सुरुवात करतील. डॉक्टर कदाचित तुमची मल-मूत्र चाचणी, रक्त तपासणीही करायला सांगतील आणि तुमचे मूत्रपिंड कितपत रिकामे होऊ शकते ह्याचीही चाचणी घेतील.

मूत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण हा या त्रासावरचा एक प्रभावी उपाय ठरू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. आपल्या मूत्राशयाशी संबंधित काही व्याधी सुरू झाली असेल, लघवीवरील नियंत्रण जात असेल तर डॉक्टर आपल्याला त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे ह्याचे प्रशिक्षण देतात. ह्यासाठी खरं तर अनेक मार्ग आहेत, परंतु आपल्या मूत्राशयाची व्याधी नेमकी काय आहे ह्यावर सुद्धा ते प्रशिक्षण अवलंबून असते.

आणि प्रशिक्षण आत्मसात केल्यास आपण योग्य असे नियंत्रण मूत्राशयावर ठेवू शकतो. अर्थात मूत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण हा एकच मार्ग नसून इतरही अनेक मार्ग आहेत. काहीजणांना असंयमनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर औषधे देतात. त्या औषधांनी नुसते नियंत्रणच येते असे नाही, तर स्नायू बळकट होतात, मूत्राशय पूर्ण रिकामे व्हायला मदत होते. पेल्विक स्नायूंच्या व्यायामानेही काहींच्या बाबतीत यथायोग्य परिणाम साधतो. हा व्यायाम आपले मूत्राशयाजवळचे काही स्नायू बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतो. हा स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. तसे पहाता हे व्यायाम खूप सोपे आहेत. त्यामुळे आपला ताणही हलका होतो. शरीराकडून येणारे संदेश ओळखण्यासाठी बायोफीडबॅकचीही मदत हल्ली घेतली जाते. त्याद्वारे मूत्राशयाजवळच्या स्नायूंवर संयम आणण्यासाठीसुद्धा मदत होते. पेल्विक स्नायूंच्या व्यायामासाठीसुद्धा बायोफीडबॅकचा उपयोग केला जातो. हल्ली अशा विविध प्रकारचे उपचार व व्यायाम घेता येऊ शकतात. त्यामुळे मूत्राशयावरील संयम नसण्याचा त्रास लपवण्यापेक्षा त्याविषयी तज्ज्ञांशी मोकळेपणाने बोलणे आणि फार सोसत न राहता योग्य उपचार घेणे अत्यावश्यक ठरते. असे केल्यास अनावश्यक गुंतागुंत टाळणेही शक्य होते.

Back to top button