दम्याची तीव्रता कशी नियंत्रणात ठेवता येईल, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

दम्याची तीव्रता कशी नियंत्रणात ठेवता येईल, जाणून घ्‍या सविस्‍तर

आपल्या शरीरातल्या श्वसनमार्गावर परिणाम करणारा दमा पूर्णतः बरा करता येत नाही; परंतु प्रयत्नपूर्वक दम्याची तीव्रता व वारंवारिता नियंत्रणात ठेवता आली तर दमाग्रस्त व्यक्तीही सुंदर आणि क्रियाशील जीवन जगू शकतात.

आपल्या शरीरातला श्वसनमार्ग व त्याची यंत्रणा अतिशय महत्त्वाची मानली जाते. या मार्गात ज्या नळ्या असतात त्या तुमच्या फुफ्फुसातून हवा आत-बाहेर नेण्याचे काम करतात. दमाविकार असेल, तर श्वसनमार्गाच्या आतील भिंती सुजतात. या दाहामुळे श्वसनमार्ग संवेदनशील बनतो आणि अ‍ॅलर्जी असलेल्या वस्तूंबाबत, घटकांबाबत किंवा त्रासदायक वाटणार्‍या गोष्टींबाबत तीव्र प्रतिक्रिया देतो. या प्रतिक्रियेमुळे श्वसनमार्ग आकुंचन पावल्याने श्वसनाच्या दरम्यान हवा कमी प्रमाणात फुफ्फुसापर्यंत पोहोचते. यामुळे श्वास जडावणे, खोकला, छाती आवळून येणे आणि विशेषतः रात्री, सकाळी लवकर श्वास घेण्यात अडथळा येणे, अशी लक्षणे दिसून येतात.

आपल्या शरीराचा लठ्ठपणा तसेच अन्य आरोग्य समस्या यांचाही दम्याशी संबंध असू शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्याला होणारा विशिष्ट रसायने किंवा धूळ अशा अ‍ॅलर्जीकारकांचा त्रास, संक्रमणे, संसर्ग, कौटुंबिक इतिहास याही बाबी दम्याशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. ज्या बाळांच्या अवतीभवतीच्या वातावरणात तंबाखूचा धूर आहे अशा बाळांना दमा होण्याची अधिक शक्यता असते. एखाद्या महिलेला गर्भावस्थेत तंबाखूच्या धुराचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तिच्या बाळालाही दमा होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळणेच हिताचे!

सामान्यत: असे दिसून आले आहे की, वातावरणामध्‍ये अशा काही गोष्टी असतात ज्या दम्याची लक्षणे निर्माण करतात आणि त्यामुळे दम्याचा अटॅक येतो. यात प्राण्यांची धूळ (त्यांची त्वचा, केस किंवा पंख), धुळीतील विषाणू, झुरळे, वनस्पती आणि गवतांचे परागकण, बुरशी (घरातील आणि बाहेरील), सिगारेटचा धूर, हवेचे प्रदूषण, थंड हवा किंवा हवामानातील बदल याचा समावेश होत असतो. रंगकाम किंवा स्वयंपाकामुळं निघणारे तीव्र वास, सुगंधी उत्पादने, तीव्र भावनिक अभिव्यक्ती (रडणे किंवा जोरात हसणे) आणि तणाव, विशिष्ट औषधे यामुळेही श्वसनमार्गावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यातून दम्याच्या अ‍ॅटॅकला निमंत्रण मिळू शकते.

दम्याच्या त्रासाची काही चिन्हे आणि लक्षणे आहेत. ती पुढीलप्रमाणे- श्वास लागणे, घरघरणे (सामान्यतः अचानक सुरू होते किंवा वारंवार होते). या घरघरण्याची रात्रीच्या वेळेला किंवा पहाटे तीव्रता वाढते, थंड ठिकाण, व्यायाम आणि छातीत जळजळ यामुळे घरघर अधिक तीव्र होते. थुंकीसह किंवा थुंकीविना खोकला इत्यादी. एक लक्षात घ्यायला हवे की, दमा हा पूर्णतः बरा करता येत नाही; परंतु दमा असलेले बहुतांश लोक त्याला नियंत्रणात ठेवू शकतात जेणेकरून त्यांना थोडी आणि कमी वारंवारतेने ही लक्षणे उद्भवतात आणि ते क्रियाशील जीवन जगू शकतात. दम्याचे काही अटॅक हे इतरांपेक्षा भयानक असतात.

तीव्र दमा अटॅकमध्ये हवेचा मार्ग इतका बंद होतो की, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशी स्थिती वैद्यकीयद़ृष्ट्या आपत्कालीन असते. तीव्र स्वरूपाच्या दमा अटॅकमधे लोकांचा जीव जाऊ शकतो. हे सर्व टाळायचे असेल, तर आपल्याला नेमका कधी व कशामुळे दम्याचा त्रास होतो, याबाबतीत जाणीवपूर्वक निरीक्षण केले आणि वैद्यकीय सल्ला घेतला, तर दम्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य मुळीच नाही. त्यामुळे आपणास दमा असल्यास आपण आपल्या डॉक्टरांना वारंवार भेटले पाहिजे. कोणत्या गोष्टी आपल्यात दम्याची लक्षणे निर्माण करतात आणि त्या कशा टाळायच्या, हे शिकून घेतले पाहिजे. आपला दमा आटोक्यात ठेवण्यासाठी आपले डॉक्टर औषधे लिहून देतील. ते औषध गरजेनुसार बिनचूकपणे घेतले पाहिजे.

डॉ. संजय गायकवाड

Back to top button