Proteins : जाऊन घ्या प्रोटिन्सबाबत समज आणि गैरसमज | पुढारी

Proteins : जाऊन घ्या प्रोटिन्सबाबत समज आणि गैरसमज

  • वैद्य वृषाली कुलकर्णी

शरीराच्या रचनेमध्ये/ वाढीमध्ये प्रोटिन्स (Proteins) अत्यंत महत्त्वाचे आहेत. शरीराच्या इतर आवश्यक अन्नघटकांपैकी प्रोटिन्सचे वेगळेपण हे त्यांच्या रचनेमध्ये आणि कार्यामध्ये आढळून येते. प्रोटिन्स हे आकाराने मोठे असतात.

शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये किंवा पेशीभित्तींमध्ये प्रोटिन्स (Proteins) आहेत. मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाण पाण्याचे असेल तर त्याखालोखाल प्रोटिन्सचा क्रमांक लागतो. कुठल्याही वनस्पती पेशींपेक्षा प्राण्यांच्या पेशींमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असते. प्रोटिन्सचा एक कण हा अनेक अमिनो असिडस्च्या एकत्रीकरणाने बनलेला असतो. एकूण 20 अमिनो अ‍ॅसिडस् असतात. त्यातील 7 अत्यंत आवश्यक असतात. म्हणजे ते शरीरात तयार होत नाही. ते अन्नातून मिळवावे लागतात. बाकीचे 13 अमिनो अ‍ॅसिडस् अन्नातून मिळाले नाहीत तरी शरीराकडून तयार केले जातात. प्रोटिन्सचे प्रमाण ज्या आहारात जास्त असणार्‍या पदार्थांमध्ये दूध, मासे, अंडी, चिकन, मटण, डाळी, उसळी, कडधान्ये, सोयाबीन यांचा समावेश होतो. (Proteins)

एका सर्वसाधारण निरोगी माणसाला 0.8 ग्रॅम एवढे प्रोटिन्स पुरेसे असतात. म्हणजेच तुमचे वजन 50 किलो असेल तर तुम्ही दररोज 40 ग्रॅम प्रोटिन्स रोज खाल्ले पाहिजेत. असे म्हटले जाते की, आपल्या आहारामध्ये भरपूर कर्बोदके कमी फॅटस् आणि पुरेसे प्रोटिन्स असावे. एकूण कॅलरिजपैकी 10 ते 15 टक्के कॅलरिज प्रोटिन्सपासून मिळाव्यात. त्यापेक्षा जास्त गरज अ‍ॅथलिटस्, गरोदर बायका, स्तनपान करणार्‍या माता, वाढीच्या वयातील मुले यांना असते. एखाद्या आजारपणानंतर, शस्त्रक्रियेनंतर लवकर तब्येत सुधारावी म्हणून त्या ठराविक काळात प्रोटिन्सची (Proteins) गरज जास्त असते. ही मात्र वैद्यकीय सल्ल्यानुसार 1.5 ते 2 ग्रॅमएवढी सुद्धा वाढविता येते. 1 ग्रॅम प्रोटिन्समधून चार कॅलरीज ऊर्जा आपल्याला मिळते.

प्रोटिन्सचे (Proteins) मुख्य काम हे बॉडीबिल्डिंगचे आहे. कर्बोदकांचे काम हे ऊर्जा आहे. आहारातून कर्बोदके पूर्ण बंद केल्यास आणि हाय प्रोटिन्स घेतले तर सुरुवातीच्या काळात वजन कमी होते आणि नंतर रोगप्रतिकार क्षमतासुद्धा.

ऊर्जेकरिता प्रोटिन्सचा वापर केल्यामुळे बॉडीबिल्डिंगचे काम नीट होत नाही. शरीरातील बहुतेक हार्मोन्स आणि एन्झाईम्स ही रचना वैशिष्ट्यांमुळे प्रोटिन्स असतात. त्यामुळे यांच्याशी कुठलाही खेळ अंगाशी येऊ शकतो. (Proteins)

आता मुद्दा येतो प्रोटिन्सच्या पचनाचा. स्वभावतः प्रोटिन्स पचायला जड असतात. ते पचवण्यासाठी मुळात तुमचा पाचकाग्नी योग्य लागतो. प्रोटिन्स शरीरात योग्य प्रकारे शोषले जाणे आणि त्याचे विसर्जन होणे या क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी शरीरातील लिव्हर आणि किडनीचे कार्य उत्तम असणे आवश्यक असते. जितके तुमच्या आहारात प्रोटिन्सचे प्रमाण जास्त तितके तुमच्या शरीरात नायट्रोजनचे प्रमाण अधिक असते. यकृतामध्ये त्याचे युरियामध्ये रुपांतर होते आणि किडनीद्वारे त्याचे विसर्जन होते. यापैकी एखादे जरी कार्य नीट झाले नाही तरी त्याचा दुष्परिणाम लिव्हर आणि किडनीवर होतो.

गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स जरी खाल्ले तरी ते मेदामध्ये रुपांतर करूनच शरीरात साठविले जातात. प्रोटिन्स जास्त खाण्याच्या नादात मांसाहार सेवन केला तर बरोबरीने फॅटस्सुद्धा खूप खाल्ले जातात. त्याचे स्वरूप योग्य नसेल तर अशा प्रकारच्या मांसाहारामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. अर्धवट पचलेले प्रोटिन्सचे कण आतड्याच्या आतील भागात चिटकून बसतात, कालांतराने सडतात आणि दुर्गंधीयुक्त वायू तयार होतो. पोट बिघडते. जुलाब तरी होतात किंवा बद्धकोष्ठता तरी होते.(Proteins)

शाकाहारी आहारातून प्रोटिन्स खाताना डाळी, उसळी जास्त खाल्ल्या जातात. त्या स्वभावतः रुक्ष असतात. त्याबरोबरीने तेल, तूप नाही खाल्ले तर वातूळपणा वाढतो. खाण्यामध्ये फक्त प्रोटिन्सवरच भर दिला तर आपोआप इतर जीवनसत्त्वे इ. कमी जातात व त्याच्या कमतरतेमुळे आजार उद्भवू शकतात. जास्त प्रोटिन्स खाताना जास्त पाणी नाही प्यायले तर प्रोटिन्सचे विसर्जन नीट होत नाही आणि उगीच जास्त पाणी प्यायले तरी किडनीवर ताण येतो. मांसाहारातून मिळणार्‍या प्रोटिन्सपेक्षा शाकाहारातून मिळणारे प्रोटिन्स पचायला जास्त हलके असतात.

पुढील काही आहारातून तुम्हाला साधारणतः किती प्रोटिन्स (Proteins) मिळतील याचा अंदाज देते. त्याप्रमाणे तुम्ही योग्य प्रोटिन्सचा ताळमेळ घालू शकता.

1 वाटी भात = 6 ग्रॅम प्रोटिन्स,
1 पोळी = 11 ग्रॅम ,
1 वाटी डाळ = 20 ते 22 ग्रॅम,
1 वाटी सोयाबीन = 43ग्रॅम ,
100 ग्रॅम बदाम = 21 ग्रॅम,
दाणे = 25 ग्रॅम,
अंडे = 13 ग्रॅम,
मटण = 21 ग्रॅम,
चिकन = 18 ग्रॅम,
दूध = 3.3 ते
4.3 ग्रॅम
दही = 3.1 ग्रॅम,
चीज = 24 ग्रॅम,
मिल्क पावडर = 38 ग्रॅम.

याव्यतिरिक्त भाज्या / फळे यांमधून साधारणतः 100 सा नाधून 2 ते 3 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. या सगळ्याचा सामंजस्याने विचार करा आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच आहार घ्यावा.

Back to top button