depression : दिवे चालू ठेवून झोपल्याने येते नैराश्य | पुढारी

depression : दिवे चालू ठेवून झोपल्याने येते नैराश्य

  • डॉ. दिलीप बागल

अनेकांना झोपताना खोलीतील सर्व दिवे बंद करण्याची सवय असते. कोणत्याही प्रकारच्या उजेडाचा त्रास होऊ नये, म्हणून अनेकजण असे करतात; पण काही लोक असे करत नाहीत. त्यांना दिवे सुरू ठेवून झोपायला आवडते. काही लोक आळशीपणामुळे दिवे बंद करत नाहीत. दिवे चालू ठेवून झोपणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे नैराश्य वाढू शकते. निरोगी जीवनशैलीसाठी प्रकाशाची गरज असते; पण अंधाराचीही तेवढीच गरज असते.

रात्री विजेचे दिवे सुरू ठेवून झोपत असाल, तर आरोग्यतज्ज्ञांच्या मते ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तरुण-तरुणींनी चांगल्या आरोग्यासाठी आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीसाठी चांगली झोप ही थेरपीसारखी असते. ती शरीराला संपूर्ण थकव्यापासून आराम देते. शांत झोपेमुळे मेंदू व्यवस्थित काम करतो. तसेच शरीर पुन्हा एकदा रिचार्ज होते. पुन्हा नवी ऊर्जा प्राप्त करते. मूड चांगला राहतो तसेच अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. म्हणूनच झोपताना काही प्रकारची खबरदारी पाळली पाहिजे; अन्यथा शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

स्वीडन आणि नॉर्वेसारख्या देशांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात सुमारे सहा महिने सूर्य मावळत नाही. त्यामुळे अनेक लोक नैराश्याला बळी पडतात. आपल्याकडे अनेकांना रात्री झिरो बल्ब सुरू ठेवून झोपण्याची सवय असते. या ‘झिरो बल्ब’च्या प्रकाशामुळे चिडचिडेपणा येऊ शकतो. अनेक आजारांचा धोका असतो. दिवे सुरू ठेवून झोपलात, तर शांत झोप येत नाही. यासोबतच अनेक आजारांचा धोका असतो. त्यात उच्च रक्तदाब, हृदयासंबंधित समस्या अशा गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच दिवे सुरू ठेवून झोपू नये. रात्री दिवे लावून झोपल्याने झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्याने थकवा येतो. त्याचा परिणाम दुसर्‍या दिवशी दिसून येतो. यामुळे ऑफिसची कामे करण्यात अडचण येऊ शकते. सुस्त आणि थकल्यासारखे वाटू शकते.

Back to top button