जागतिक आरोग्यदिन विशेष : सर्वांसाठी आरोग्य !

जागतिक आरोग्यदिन विशेष : सर्वांसाठी आरोग्य !

आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नव्हे; तर त्यात मानसिक, सामाजिक, आत्मिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक अशा स्वास्थ्याशी निगडित अनेक बाजू असतात. आरोग्य म्हणजे क्रियाशीलता. आरोग्य म्हणजे आशा आणि जिथे आशा आहे, तिथे सर्व काही आहे. उद्या 7 एप्रिल जागतिक आरोग्यदिन. त्यानिमित्ताने…

आरोग्य ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं पहिलं सुख म्हणजे आरोग्य, हेल्थ इज वेल्थ. शरीर माध्यमं खलु धर्म साधनम, Health is the highest from of Happiness अशी अनेक सुभाषिते जीवनातील आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करतात.

2023 मधल्या उद्याच्या आरोग्य दिनाला विशेष महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे जागतिक आरोग्य दिन ज्या संस्थेच्या स्थापनेच्या निमित्ताने साजरा केला जातो, त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेला उद्या 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 7 एप्रिल 1948 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली.

दुसर्‍या महायुद्धानंतर म्हणजे 1945 मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. यात सहभागी झालेल्या देशांनी जागतिक आरोग्याच्या बाबींशी निगडित एक वेगळा गट स्थापन करायचे ठरवले. त्यानुसार युनायटेड नेशन इकॉनॉमिक आणि सोशल कौन्सिल यांनी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली. जागतिक आरोग्य संघटना ही एक स्वायत्त संस्था आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने साजरा केल्या जाणार्‍या अनेक आरोग्य दिनांपैकी हा एक महत्त्वाचा आरोग्य दिन आहे. आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर त्यात मानसिक, सामाजिक, आत्मिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक अशा स्वास्थ्याशी निगडित अनेक बाजू असतात. जगातील वेगवेगळ्या भागातील आरोग्यविषयीच्या अनेक प्रश्नांविषयी जनजागरण करण्यासाठी इ.स. 1950 पासून 'सात एप्रिल' हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.

यानिमित्ताने दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे 'Health for All' म्हणजे 'सर्वांसाठी आरोग्य.'..    जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेपासून 'सर्वांसाठी आरोग्य' हे महत्त्वाचे ध्येय होते. मध्यंतरी म्हणजे ऐंशीच्या दशकात आम्ही जेव्हा विद्यार्थीदशेत होतो, तेव्हा 'इ. स. 2000 पर्यंत सर्वांसाठी स्वास्थ्य' अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली होती. पण 2000 साल उलटूनदेखील सर्वांसाठी आरोग्याचा कुठे मागमूसही दिसत नाही. सर्वांसाठी किंवा सर्वांना आरोग्य याचा अर्थ काय? आरोग्य म्हणजे स्वास्थ्य – म्हणजे स्वस्थ असणे. हे स्वास्थ्य सर्व पातळ्यांवर असायला हवे. व्यक्तिगत आणि सार्वजनिक पातळीवरचे स्वास्थ्य जपण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी आरोग्य ही संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे.

जग वेगाने बदलत आहे आणि प्रत्येकाची जीवनशैली प्रचंड बदलली आहे. चैन -भोग- विलास अशी आत्मकेंद्रित जीवनशैली बनल्याने प्रत्येक जण, केवळ स्वतःचा विचार करत आहे. आणि या विचारशैलीचा – मनोवृत्तीचा तोटा सर्वांना सहन करावा लागत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे, जागतिक पातळीवर आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, विषयुक्त अन्न, प्रचंड महापूर, त्सुनामी, भूकंप, वादळी वारे, भूस्खलन, हिमस्खलन अशा एक ना अनेक प्रश्न.

हवा, पाणी, अन्न या माणसाच्या मूलभूत गरजा, ज्या निसर्गाने मोठ्या प्रमाणात आणि विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या आजच्या माणसाला चक्क बाजारात विकत घ्याव्या लागत आहेत. ही आपली अधोगती नव्हे तर काय? या पार्श्वभूमीवर 'सर्वांसाठी आरोग्य' अशी घोषणा आपल्याला करावी लागते यापेक्षा दुसरी मोठी नामुष्की नसेल.
विज्ञानाने प्रचंड वेग धारण केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सारे जग जोडले गेले आहे. प्रत्येकाच्या हातात एक आभासी जगच आलेले आहे. 'तंत्रज्ञान- टेक्नॉलॉजी' आणि स्पर्धेच्या या जगात मूठभर लोकांच्या हाती पुष्कळ पैसा आहे.

तीन-चार दशकांपूर्वी प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समान संधी होत्या. आज परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे दुसर्‍या बाजूला बहुसंख्य जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे. जीवनाच्या मूलभूत गरजांनाच वंचित असलेली ही जनता अनेक प्रश्नांना तोंड देत आहे. यातील आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा.

अज्ञान आणि त्यापाठोपाठ दारिद्य्र आणि लोकसंख्यावाढ हे दुष्टचक्र सुरूच राहिल्याने, दोन वेळा पोट भरण्यासाठी त्याला यातायात करावी लागते. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यातही शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी यापासून तो अजूनही कोसो दूर आहे. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आणि त्यासाठी उत्तम शौचालयांची, मलमूत्राची नि कचर्‍याच्या आरोग्यदायी विल्हेवाटाची व्यवस्था असायला हवी. जगभरातल्या वंचित घटकांना आजही ती उपलब्ध नाही. दारिद्य्र आणि अज्ञान यामुळे इकडे व्यसनांचा विळखा अधिक. गर्दीची वस्ती आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे संसर्गजन्य रोग सदैव साथीला. या सर्व गोष्टींबरोबर स्त्री-पुरुष भेदभाव, स्त्रियांना हीन वागणूक आणि स्त्रियांवरील अत्याचार सुरूच आहेत.

ही परिस्थिती सुधारायला हवी.

आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, तो मिळायला हवा. प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, पुरेसे सकस विषमुक्त अन्नही प्रत्येकाची गरज आहे. आजारी पडल्यानंतर आजाराचे निदान आणि उपचार व्हायला हवेत. कमीत कमी खर्चात औषधे मिळायला हवीत. मलनिस्सारणाची पुरेशी आरोग्यदायी व्यवस्था हवी. महापूर, भूकंप यांसारख्या आपत्तींवर मात करता येण्यासारखी यंत्रणा हवी. संसर्गजन्य रोग तर मुळापासून निघायला हवेत. हे होऊ शकते; पण त्यासाठी गरज आहे ती, प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची. दुर्दैवाने तिचा अभाव आहे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. चांगलं जगणं नशिबी येण्यासाठी त्याला आरोग्य तर हवंच; पण त्याबरोबर भोवतालचं वातावरण निरोगी हवं. जगणं सुसह्य होण्यासाठी मूलभूत गरजांबरोबर, समाज निरोगी हवा. शिक्षण, कायदा, दळणवळण यांसारख्या अशा सार्वजनिक व्यवस्था या सर्वांसाठी खुल्या असायला हव्यात.

– डॉ. अनिल मडके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news