पोश्चर आणि आरोग्य | पुढारी

पोश्चर आणि आरोग्य

शरीरातील पाठीचा कणा सर्वात महत्त्वाचा असतो त्यावरच तर आपण टिकाव धरतो. अर्थात बदलत्या जीवनशैलीत खुर्चीवर बसून तासन्तास काम केले जाते. मात्र, चुकीच्या पद्धतीने बसल्याने अनेक त्रास आपणच ओढवून घेतो. शरीराच्या ठेवणीत बदल होतो आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागतो. कधीतरी हा त्रास जन्मभर पिच्छा पुरवतो आणि त्याने कायमस्वरूपी नुकसानही होऊ शकते.

सध्याच्या काळात प्रत्येकजण घाईत असतो जीवनशैली दमवणारी असते. ही सगळी दमछाक ज्याच्या जीवावर करतो, त्या शरीराचीच आपण काळजी घ्यायला विसरतो. धावपळीत आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आणि आपण खुर्चीत अनेक तास बसून काम करत असतो. किंवा कॉम्प्युटरवर एकटक बघत काम किंवा गेम असे काहीतरी करत असतो. एकाच स्थितीत खुर्चीवर बसून राहण्याने काय नुकसान होते पाहूया-

रक्ताभिसरणावर परिणाम : खुर्चीवर तासन्तास बसून काम करण्यामुळे सर्वात मोठा परिणाम होतो तो रक्ताभिसरणावर. मुख्य म्हणजे ओटीपोटाचा भाग आणि नितंबांचा खालचा भाग येथील रक्ताभिसरणावर त्याचा परिणाम होतो. रक्ताभिसरण योग्य प्रकारे न झाल्यास भविष्यात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या कामात इतके गढून जातो की या गोष्टींचे भानच आपल्याला राहात नाही. शरीर खूप संवेदनशील असते आपण एकाच स्थितीत तासन्तास बसून राहिलो तर शरीराच्या खालील भागातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नाही कारण तिथे पुरेशा प्रमाणात रक्ताचा पुरवठा होत नाही.

संबंधित बातम्या

तासन्तास एकाच जागी बसणे योग्य नाही तसेच ते चुकीच्या पद्धतीने बसणे तर एकदमच अयोग्य आहे. त्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम अधिक होतात. पाठदुखी, सांधेदुखी आणि स्नायू यांच्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराची ठेवण बदलते त्यामुळे भविष्यात स्नायूंचा असमतोल होऊ शकतो. दीर्घ काळ बसून राहिल्याने पाठीच्या कण्यातील चकत्यांवर त्याचा परिणाम होतो आणि एकूण शरीराच्या ठेवण बिघडू शकते. या सर्वांचा परिणाम म्हणून पाठीच्या कण्याची ठेवण बदलते आणि तिथल्या सांध्यांलगत असलेल्या ऊतींचा र्‍हास होऊ लागतो.

स्थूलपणा : एकाच जागी बसून बसून शरीरात मेद साठू लागते असे सांगितले तर पटणार नाही; पण ते खरे आहे. शरीरात ही अनावश्यक चरबी साठत राहते. त्यामुळे भविष्यात काही दुष्परिणाम होतात. अनावश्यक चरबीने आलेल्या स्थूलपणामुळे उच्च रक्तदाब किंवा काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यासाठी नियमित व्यायाम क?णे तसेच जिन्याचा वापर करणे आदी गोष्टी केल्या पाहिजेत.

फुफ्फुसांची कार्यक्षमता घटते : अधिक काळ खुर्चीत बसून राहिल्याने फुप्फुसांची क्षमता कमी होते हा देखील एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. चुकीच्या पद्धतीने म्हणजे पोक काढून बसल्याने फुफ्फुसाचे स्नायू आकुंचन पावतात. तसेच घशाच्या स्नायूंवरही परिणाम होऊ शकतो. चुकीच्या ठेवणीमुळे पाठीच्या वरच्या बाजूचे स्नायू शिथिल होत कालांतराने अशक्त होतात त्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढतात.

पाठीचे, मानेचे स्नायूंना थकवा : पाठ आणि मान यांच्या उतींमधील ताणामुळे रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे पाठीच्या चकत्या, लिगामेंट आणि हाडे यांचे ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे आपल्याला थकवा येतो.

पचनाच्या समस्या : सतत एकाच अवस्थेत बसून काम केल्याने हालचाल कमी झाल्याने पचनसंस्थेत बिघाड होतो. त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते ज्याला डीहायड्रेशन असेही म्हणतात.

डोळ्यांवर ताण : ऑफिस किंवा घरी कॉम्प्युटरवर सतत काही ना काही पाहात राहतो. या प्रक्रियेमध्ये नकळपणाने टक लावून सतत स्क्रीनकडे पाहिले जाते. त्यामुळे डोळ्यांवरही दुष्परिणाम होतो. रोखून बघत राहिल्याने डोळ्यांच्या पापण्यांचे स्नायूही थकतात. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. स्क्रीन आपल्या चेहर्‍याला समांतर आणि डोळ्याच्या दृष्टीसमोर असयला हवा; पण चुकीच्या पद्धतीने बसल्यावर हे गणित चुकते. त्यामुळे डोळ्यांवरचा ताण वाढतो आणि कधी कधी खूप डोके दुखते.

मधुमेह आणि हृदयविकार जडण्याची शक्यता वाढते सतत बसून राहिल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीत असाधारण पद्धतीने वाढ होते, असेही काही पाहण्यांमधून दिसून आले आहे.

डॉ. महेश पाटील

Back to top button