

डॉ. मनोज शिंगाडे
हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण आज खूप वाढले आहे. पूर्वी चाळिशी, पन्नाशीनंतर जडणारा हा आजार आता ऐन तिशीतच गाठू लागला आहे. बदललेली जीवनशैली, स्पर्धेचा ताण वगैरे कारणे यामागे आहेत. साहजिकच आयुष्य कितीही धकाधकीचे असले तरी स्वत:च्या आरोग्याची थोडी काळजी घेतली तरी अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो.
हृदयाची काळजी घेणे तर गरजेचे बनले आहे. यासाठी योग्य आहार-विहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे, वजन आटोक्यात ठेवणे, वेळोवेळी हृदयाची तपासणी करून घेणे आणि हृदयाशी संबंधी समस्यांविषयी जागरूक असणे आवश्यक आहे.
रक्तदाबाची नियमित तपासणी करा.
कोलेस्टरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवा.
मधुमेह असेल तर रक्तातील साखर आटोक्यात आणा.
आपल्या आहाराचे, विहाराचे, व्यायामाचे आणि वजनाचे मूल्यांकन करा.
कुटुंबातील कुणाला म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ यापैकी कुणाला हृदयविकाराची काही समस्या असेल तर अनुवंशिक कारणांमुळे तुम्हालाही हृदयविकार जडू शकतो, हे ध्यानात घ्या.
धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवनामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर रहा.
हलका, पचेल असा आहार घ्यावा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या, कोशिंबीर, बदाम, मनुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा समावेश असावा.