blood pressure : रक्तदाब कमी का होतो? | पुढारी

blood pressure : रक्तदाब कमी का होतो?

डॉ. संतोष काळे

रक्तदाब कमी होण्याच्या समस्येला बहुतांश डॉक्टर समस्या मानतच नाहीत. ताणतणाव किंवा रिकाम्या पोटी अधिक कष्ट केल्यामुळे कधीकधी रक्तदाब कमी होणे स्वाभाविकच असते. परंतु वारंवार असे होऊ लागले, तर मात्र जीवनशैली बदला, असा शरीराने तुम्हाला दिलेला तो इशारा समजा. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय करावे, याची माहिती.

रक्तदाबाला आजार समजूनच आपण त्यावर चर्चा करीत असतो आणि अशा वेळी विशेषत्वाने उच्च रक्तदाबच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. परंतु कमी रक्तदाबाची (हायपोटेन्शन) समस्याही उच्च रक्तदाबाइतकीच सामान्य आहे, हे वास्तव आहे. कमी रक्तदाबाच्या समस्येत शरीरातील रक्ताच्या प्रवाहाची गती कमी होते. त्यामुळे डोके जड होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, मनाची चलबिचल, अस्पष्ट दिसणे आणि श्वास घेण्यात अडथळे अशी लक्षणे दिसून येतात. खरे तर रक्तदाब कमी झाल्याची जाणीव होताच एक कप चहा किंवा कॉफी घेतल्याने तातडीने थोडा आराम मिळतो; मात्र दीर्घकाळ ही समस्या कायम राहिली तर ऑक्सिजन आणि अन्य पोषकद्रव्यांचा मेंदूला होणारा पुरवठा बंद होऊ शकतो. त्याचे शरीरावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतात.

संबंधित बातम्या

अशक्तपणा म्हणजे हायपोटेन्शन?

शरीराचा रक्तदाब सामान्यतः 120/80 असतो. परंतु प्रत्येक व्यक्तीचा रक्तदाब तेवढाच असेल असे म्हणता येत नाही. यापेक्षा कमी-अधिक रक्तदाब असलेली व्यक्ती ठणठणीत प्रकृतीची असू शकते. कधी-कधी चक्कर येणे, मनाची चलबिचल किंवा अस्पष्ट दिसण्याची समस्या तुम्हाला सतावत असेल तर त्याचे कारण हायपोटेन्शन हेच आहे, असे समजण्याचे कारण नाही. शरीरात पोषकद्रव्यांची कमतरताही एक कारण असू शकते. काही कारणांमुळे तुमचे शरीर पोषकद्रव्ये शोषून घेऊ शकत नसतील, तरी असे घडू शकते. तुमच्या पिण्याच्या पाण्यात दोष असेल तर त्याचा परिणाम हिमोग्लोबिनच्या पातळीवर होऊन अशी लक्षणे दिसू शकतात. विशेषतः महिलांमध्ये कमी रक्तदाब असण्याचे प्रमाण अधिक असते. शरीरात लोहाच्या कमतरतेसह अन्य पोषकद्रव्यांची कमतरता यास कारणीभूत असू शकते. मासिक पाळीच्या दिवसांत अधिक रक्तस्राव झाल्यामुळेही असे घडू शकते. रक्तदाब कमी झाल्यामुळे तुम्हाला चक्कर येत असेल; परंतु नियमित वेळेनंतर लघवीला जावे लागत असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. नियमित अंतराने लघवी होण्याचा अर्थच असा की, तुमची मूत्रपिंडे व्यवस्थित काम करू शकतील एवढा तुमचा रक्तदाब आहे. चक्कर येण्यासारख्या समस्यांचेही योग्य कारण शोधून उपाय करण्याची गरज असते.

अशी असू शकतात कारणे

डिहायड्रेशन: डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होय. त्यामुळे बराच वेळ चक्कर येणे, उलटी होणे किंवा डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात. तासन्तास व्यायाम करणे, अधिक घाम वाहून जाणे अशा कारणांमुळेही डिहायड्रेशन होऊ शकते. या कारणांमुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता वेळेत भरून काढली गेली नाही तर रक्तदाब कमी होऊ शकतो. अस्पष्ट दिसण्याची तसेच कधी-कधी बेशुद्ध होण्यासारखी चिन्हेही दिसू शकतात.

रक्तस्राव : कोणत्याही कारणामुळे अति रक्तस्राव झाल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. एखाद्या अपघातामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळेही अतिरक्तस्राव होऊन रक्तदाब कमी होतो. कधी-कधी मुलाच्या जन्मावेळी अति रक्तस्राव होऊन मातेला कमी रक्तदाबाची समस्या भेडसावते.

हृदयाचे आजार : हृदयाशी संबंधित आजारांमध्ये किंवा ज्यांच्या हृदयाचे स्नायू कमजोर असणार्‍या व्यक्तींमध्ये कमी रक्तदाबाची समस्या जाणवू शकते. हृदयाचे स्नायू कमकुवत असल्यास हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि हृदय रक्ताचे ‘पंपिंग’ कमी प्रमाणात करते. त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका तसेच हृदयात संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. हृदयाच्या धमन्यांत रोध निर्माण झाल्यास रक्तदाबावर थेट परिणाम जाणवतो. त्याचप्रमाणे हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक झाल्यास रक्तदाब कमी-जास्त होतो.

गंभीर संसर्ग : सेप्टिक किंवा गंभीर संसर्ग झाल्यास रक्तदाब पटकन कमी होतो. बॅक्टेरिया शरीरातील आपली जागा सोडून जेव्हा रक्तात प्रवेश करतात, तेव्हा सहसा असे झाल्याचे पाहायला मिळते. उदाहरणार्थ, फुफ्फुसे किंवा आतड्यात राहणारे बॅक्टेरिया रक्तात प्रवेश करतात तेव्हा विषारी घटक निर्माण करतात. त्यामुळे रक्तदाब कमी होतो.

पोषकद्रव्यांची कमतरता : शरीराला आपले काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अनेक पोषकद्रव्यांची गरज सातत्याने असते. यापैकी कोणतेही पोषकद्रव्य कमी पडल्यास शरीरात अनेक त्रास उत्पन्न होतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो. उदाहरणार्थ, बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता भासल्यास शरीरात लाल कोशिकांची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो.

एन्डोक्राइन ग्रंथींशी संबंधित समस्या : एन्डोक्राइन ग्रंथीतून कमी प्रमाणात संप्रेरक स्रवल्यामुळे थायरॉइड, मधुमेह यांसह अनेक आजार होऊ शकतात. उपचारांच्या बाबतीत निष्काळजीपणा झाल्यास रक्तदाब अनेकदा सरासरीपेक्षा कमी होतो.

Back to top button