डॉ. निखिल देशमुख
आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी खावं तर लागतंच. दातांनी नीट चावून खावं लागतं. या दातांची काळजी घेण्यासाठी खाताना काळजी घ्यायवा हवी. त्यासाठी योग्य खाद्यपदार्थ निवडायचे आणि त्याचा योग्य क्रम राखायचा. खूप गोड, खूप मऊ, चिकट आणि पिठूळ पदार्थ टाळावेत. गोळ्या, चॉकलेटण बिस्किटं अति प्रमाणात खाऊ नयेत; पण नुसती चॉकलेट-बिस्किटंच लहान मुलांच्या दात किडण्याला कारणीभूत ठरतात असे नव्हे, तर कोणतेही मऊ-चिकट पिष्टमय, पिठूळ पदार्थ दात किडण्याला निमंत्रण देऊ शकतात.
उदा : पेढा, बर्फी, पोहे, पेस्ट्रीज, केक, शिरा, नानकटाई, लाडू, गुलाबजाम इत्यादी प्रकारचे पदार्थ खूप गोड आणि मऊ असतात, खाल्ल्यानंतर त्यांचे बारीक-बारीक कण हिरडी आणि दातांत अडकून बसतात. या उलट, धागेदार, कच्ची-कुरकुरीत फळे, कडक-टणक फळे, पालेभाज्या खाल्ल्यास दात आपोआप स्वच्छ होतात; कारण अशा कडक-टणक-धाणेदार अन्नपदार्थांचे दाताशी घर्षण होते आणि दात आपोआपच घासले जातात. त्याचप्रमाणे जेवताना कधीही शेवटी गोड, मऊ, पिठूळ पदार्थ खाऊ नयेत. खाल्ले तर जास्त चांगल्या चुळा भराव्यात वा दात घासावेत; पण दरवेळी हे असे शक्य नसते. म्हणूनच जेवताना सर्वांत शेवटी काही कडक-टणक-धागेदार फळ, पालेभाजी वा तत्सम अन्नपदार्थ खावेत. उदा. गाजराचा तुकडा, काकडी, सफरचंद, सॅलड इत्यादी. म्हणजे दात आपोआपच स्वच्छ होऊन जातात. दोन जेवणामध्ये काही जणांना सतत काहीतरी खाण्याची, चघळण्याची सवय असते. असे केल्यास अन्नकण तसेच तोंडात साचून राहतात. त्यामुळे सतत काहीतरी खाण्याची सवय टाळावी किंवा खाल्यास किमान चुळा तरी भराव्यात आणि दात स्वच्छ करावेत.
गरोदरपणात आणि बाळाला दूध पाजण्याच्या काळात अशा महिलांनी भरपूर कॅल्शियम-फॉस्फेटसारखा खनिज पदार्थांचा समावेश असलेला आहार करावा. उदा. अंडी, केळी, दूध, मासे इत्यादी. म्हणजे बाळाच्या दातांची वाढ चांगली होते. कोक-पेप्सी यासारख्या एअरेटेड पेयांमध्ये फॉस्फोरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दातांचे इनॅमल झिजते आणि असे झिजलेले इनॅमल सहजरीत्या किडू शकते. म्हणूनच अशा शीतपेयांचा अतिरेक टाळावा. पान-विडी-तंबाखू-सिगारेट-मिश्री-सुपारी-मावा-गुडखा या पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळावे. या पदार्थांमुळे तोंडावा कर्करोग होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.