बाळाला स्तनपान करताना घ्या काळजी | पुढारी

बाळाला स्तनपान करताना घ्या काळजी

बाळाला स्तनपान करताना मातांना अनेकदा अडचणी येतात. त्यांना अस्वस्थता जाणवते. त्यामुळे स्तनपानाची योग्य स्थिती कोणती हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्तनपानामुळे आई आणि बाळ दोघांनीही आरोग्याच्या द़ृष्टीने अनेक प्रकारचे फायदे होतात.

बाळाला स्तनपान देणे हे बर्‍याच वेळेस आईसाठी थकवणारे असू शकते. काही स्त्रियांना स्तनपानाची योग्य स्थिती माहीत नसल्याने अडचणी उद्भवू शकतात. योग्य स्तनपानासाठी बाळाला कसे धरायचे आणि योग्य स्थिती कोणती हे जाणून घेणे आवश्यक आहे. काही आरामदायक पोझिशन्सचा अवलंब केल्यास आईलाही आराम मिळेल व बाळाचे पोटही नीट भरेल.

– आईने बाळाचे शरीर तिच्या स्तनाच्या जवळ असलेल्या हाताने धरावे. जर तुम्ही बाळाला तुमच्या डाव्या स्तनावर दूध पाजत असाल, तर तुम्हाला तुमच्या बाळाला डाव्या हाताने धरावे लागेल. त्यानंतर बाळाच्या तुमच्या हाताने कुशीत घेऊन त्याचे डोके तुमच्या छातीजवळ धरावे.

– साईड लाईंग पोझिशन : जेव्हा तुम्ही आणि बाळ दोघेही एकमेकांना तोंड करून बेडवर झोपलेले असता तेव्हा साईड लाईंग स्थिती फायद्याची ठरते. बाळाचे तोंड तुमच्या स्तनांच्या जवळ असल्याची खात्री करावी. तुमचा अंगठा आणि तर्जनी वापरून तुम्ही बाळाला दूध पाजू शकता. ही सर्वात आरामदायक स्थितींपैकी एक आहे.

– क्रॅडल होल्ड – बर्‍याचशा महिला या स्थितीत स्तनपान करतात. यासाठी तुम्हाला मांडी घालून ताठ बसावे लागेल. त्यानंतर बाळाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये झोपवावे लागेल. यामध्ये बाळाचे डोके व तोंड तुमच्या खांद्याजवळ असेल.

– बाळाला पोटाजवळ धरावे आणि बाळाचे डोके स्तनाजवळ असल्याची खात्री करावी. त्याच्या/तिच्या पाठीवर हात ठेवून आणि आपल्या हाताच्या बोटांनी मानेला आधार देऊन तुम्ही त्यांना तुमच्या जवळ आणि योग्य स्थितीत धरणे शक्य होईल.

– एका कुशीवर झोपणे – या पोझिशनचा वापर सामान्यत: झोपताना केला जातो. दुपारच्या वेळेस किंवा रात्री झोपताना तुम्हाला व बाळालाही आरामाची गरज असते. अशा वेळेस बाळाला गादीवर झोपवावे व आईने एका कुशीवर झोपावे. या स्थितीत बाळाला सहजरीत्या स्तनपान करता येऊ शकते.

डॉ. नितीन गुप्ते, स्त्री रोगतज्ज्ञ

Back to top button