Arthritis in the elderly : हिवाळा आणि वयोवृद्धांमधील सांधेदुखी | पुढारी

Arthritis in the elderly : हिवाळा आणि वयोवृद्धांमधील सांधेदुखी

हिवाळ्यात केवळ श्वसनसंस्था किंवा त्वचेच्या समस्याच नव्हे तर वयोवृद्धांमध्ये सांधेदुखीचाही त्रास बळावतो. त्यासाठी ऊबदार कपडे घालावेत, दररोज व्यायाम करावा आणि योग्य वजन राखावे, दुखत असलेल्या सांध्यावर हिटिंग पॅडचा वापर करावा. यामुळे लोकांना सांधेदुखीत (Arthritis in the elderly) आराम मिळू शकतेा.

हिवाळा ऋतू हा विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना आमंत्रण देतो. गुडघे, नितंब, घोटे, हात आणि पायांच्या वेदना सतावतात. हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे शरीराला कमी रक्तपुरवठा होतो. त्यामुळे सांधे आखडतात आणि दुखू लागतात. शिवाय स्नायू आणि आसपासच्या ऊतींचा विस्तार होऊन वेदना होतात. थंड हवामानामुळे स्नायूंवर ताण येऊन सांधे दुखू शकतात. सांधेदुखी सामान्यतः 60 ते 85 वयोगटातील व्यक्तींमध्ये जास्त दिसून येते.

हिवाळा आणि सांधेदुखीचा परस्पर संबंध आहे. हिवाळ्यात व्हिटॅमिन ‘डी’ची पातळी कमी होते आणि त्यामुळे सांधे कमकुवत होतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच संधिवात आहे, त्यांनी थंडीच्या महिन्यात अधिक सावधगिरी बाळगावी. व्हिटॅमिन ‘डी’ची चाचणी शरीरातील व्हिटॅमिन ‘डी’ची पातळी जाणून घेण्यास मदत करते. जर सांधेदुखी असेल तर व्हिटॅमिन ‘डी’ 3 चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळ्यात सांधेदुखीपासून बचाव करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी भाज्या, तृणधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये आणि हंगामी फळे यांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घ्यावा. पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांचा आहारात समावेश करण्यास विसरू नये. यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश आवश्यक आहे. स्ट्रेचिंग आणि हलक्या वजनांचा समावेश असलेले व्यायाम सांधेदुखीचा सामना करण्यास मदत करू शकतात. सांध्यांची लवचिकता सुधारण्यासाठी आणि सांधेदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी सायकलिंग, चालणे, एरोबिक्स आणि पोहणे यांसारख्या इतर व्यायामाचा अवलंब करावा.

ज्येष्ठांनी ऊबदार राहावे, गरम पाण्याने अंघोळ करावी, जड वस्तू उचलणे टाळावे, सांधेदुखीचा सामना करण्यासाठी हिटिंग पॅड वापरावे आणि वजन नियंत्रित ठेवावे. पुरेसे पाणी प्यावे आणि हायड्रेटेड राहावे. एखाद्या वेळी काळजी घेऊनही काही त्रास जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. केवळ डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधे घ्यावीत.

हेही वाचा : 

 

Back to top button