लग्न करताय ? त्यापूर्वी जोडीदारासोबत आरोग्याचे हे गुण जरूर जुळवा | पुढारी

लग्न करताय ? त्यापूर्वी जोडीदारासोबत आरोग्याचे हे गुण जरूर जुळवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुळशी विवाह झाला की वेध लागतात ते लग्नसराईचे. लग्नेच्छुक मंडळी अनुरूप जोडीदार मिळावा अशी मनीषा बाळगून असतात. याकामी घरच्यांनींही कंबर कसलेली असते. अनेक घरांमध्ये लग्न जुळवताना जन्मपत्रिकेतील गुण जुळतात की नाही हे आवर्जून पाहिलं जात. पण तुम्हाला माहिती आहे का ? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात लग्न जुळवताना आरोग्याच्या कुंडल्या जुळवणंही महत्त्वाचं झाल आहे.

भावी जोडीदाराबाबत माहिती घेताना त्याची आर्थिक, सामाजिक पत पहिली जाते. पण दुर्लक्ष केलं जातं ते शारीरिक पतकडे. थोडक्यात नव्या जीवनाची सुरुवात करताना वधु आणि वर शारिरीकदृष्ट्या निकोप असणं तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कोणतंही दडपण किंवा आडपडदा न ठेवता विवाहापूर्वी काही तपासण्या करणं गरजेचं आहे. तुम्हीही विवाहवेदीसाठी उत्सुक असाल तर तुमची आणि तुमच्या पार्टनरच्या या तपासण्या जरुर करा.

एचआयव्ही टेस्ट : अनेकजण या टेस्टच नाव काढली तरी घाबरतात. पण ही टेस्ट तुमच्या सहजीवनासाठी अतिशय महत्वाची आहे. रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणाऱ्या या आजाराची चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

ओव्हरी टेस्ट : पुरुष असो किंवा स्त्री उशीरा लग्न करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आजकाल वयाच्या तिशीनंतर लग्न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा वेळी अनेकदा वाढत्या वयामुळे गर्भधारणेची शक्यता कमी- कमी होत जाते. अशा वेळी मातृत्वाचा विचार करणार असाल तर गर्भाशयासंबंधित आवश्यक टेस्ट. गर्भधारणेसंबंधित योग्य कौन्सिलिंग गरजेचं आहे.

वंध्यत्व टेस्ट : आज काळ स्त्री असो व पुरुष वंध्यत्वाची समस्या दोघांनाही समान भेडसावू शकते. अशा वेळी स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही ही टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. पुरुषांनी त्यांच्या स्पर्म (शुक्राणू ) ची टेस्ट आणि स्त्रियांनी गर्भधारणेसंदर्भात आवश्यक ती टेस्ट करणं गरजेचं आहे.

अनुवांशिक चाचण्या : अनेकदा दोघांपैकी एकामध्ये तरी काही अनुवांशिक दोष असल्यास हा आजार पुढील पिढीत उदभवण्याची शक्यता असते. अशा वेळी योग्य वेळी अशा दोषांचं झालेलं निदान हे पुढील पिढीसाठी लाभदायक ठरू शकतं.

ब्लडग्रुप टेस्ट : ब्लडग्रुपचा योग्य समन्वय हा देखील पुढील पिढीच्या दृष्टीने गरजेचा असतो. रक्ताचा RH फॅक्टर हा जोडप्यामध्ये सारखा असणं किंवा समन्वय असणं गरजेचं आहे. त्यामुळे गर्भात निर्माण होणाऱ्या समस्या टाळणं शक्य आहे.

रक्तविकार चाचणी : अनेकदा दोघांपैकी एकाला काही रक्ताचे विकार असले की हा दोष पुढच्या पिढीत येऊ नयेत यासाठी या चाचण्या करणं गरजेचं असतं. त्यामुळे हेमोफिलिया आणि थॅलेसिमिया अशा विकारांची चाचणी योग्यवेळी करणं गरजेचं असतं.

 

Back to top button