डेंग्यू की कोरोना? यांची वेगवेगळी लक्षणे ओळखा | पुढारी

डेंग्यू की कोरोना? यांची वेगवेगळी लक्षणे ओळखा

डॉ. अनिल मडके

डेंग्यू आणि कोरोनाचा ताप या दोन्ही तापांमध्ये डोकेदुखी असते; पण कोरोनामध्ये कपाळ आणि डोळे दुखणे यांचे प्रमाण अधिक असते. कोरोनामध्ये सर्दी, घसा दुखणे आढळते. डेंग्यूमध्ये हे प्रमाण कमी असते. डेंग्यूमध्ये अंगावर पुरळ आणि खाज येते. कोरोनामध्ये पुरळ येत नाहीत. कोरोनामध्ये चव आणि वास जाण्याच्या शक्यता डेंग्यूपेक्षा अधिक असतात. उलटी, पोटदुखी, मळमळ, जुलाब हे दोन्ही तापांमध्ये असतात; पण याचे प्रमाण कोरोनामध्ये अधिक असल्याचे आढळून आले आहे.

सप्टेंबर महिना सुरू झाला आणि पहिल्या – दुसर्‍या तारखेला ‘कम सप्टेंबर’ ची धून व्हॉटस् अ‍ॅपवर व्हायरल झाली. पण सप्टेंबरमध्ये वातावरण एकदम पावसाळी झाले आहे आणि हे पावसाळी वातावरणच अक्षरशः ‘व्हायरल’ झाले आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि आता जणू इथेच ठाण मांडून बसलेले ‘कोरोना’ विषाणू यांनी ‘व्हायरल’ व्हायचे थांबवलेले नाही. यांच्या बरोबरीने मलेरियाचा हिव आणि ताप आहेच.

दरवर्षी पावसाळा आला की, हे सारे जीवजंतू पावसाळ्यातील दमट वातावरणात आपल्याकडे सक्तीने वस्तीला येतात, कारण आपण तशी त्यांची व्यवस्था करून ठेवलेली असते. म्हणजे घराच्या आजूबाजूला साठणारे पाणी – कचरा – चिखल अस्वच्छता…वगैरे.

पण या वर्षीचे चित्र काहीसे वेगळे आहे कारण, अजून कोरोना आपल्यातून गेलेला नाही. तिसरी लाट येणार – येणार अशी आरोळी – आवई असली तरी, आपण अजूनही दुसर्‍या लाटेला टाटा बाय-बाय केला नाही. अजूनही कोरोनाला अव्हेरले नाही. सहिष्णुता किती आणि कुठे दाखवायची याला जणू अंतच राहिला नाही.

या वातावरणात ताप आला तर तो डेंग्यूचा, चिकुनगुनियाचा, मलेरियाचा की कोरोनाचा असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तापाबरोबर भीती, चिंता, काळजी आणि रुग्णालयात दाखल होण्याची टांगती तलवार डोक्यावर राहण्याची शक्यता असते; पण घाबरून जाऊ नका.

तुमच्या घरात किंवा घराबाहेर जर डास असतील विशेषत: एडीस इजिप्ती नावाचे अंगावर पांढरे चट्टे असलेले रंगाने काळे, शक्यतो सकाळच्या प्रहरी आणि संध्याकाळच्या वेळी चावा घेणारे डास असतील, तर डेंग्यूची शक्यता अधिक. यामध्ये मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा ताप येतो. कोरोनाचा ताप हा हलका सौम्य असतो.

दोन्ही तापांमध्ये अंगदुखी, स्नायूदुखी असते; पण कोरोनामध्ये अगदी सकाळी सकाळी अंगदुखी जास्त आणि नेहमीपेक्षा वेगळी- अस्वस्थ करणारी असते. दोन्ही तापांमध्ये डोकेदुखी असते; पण कोरोनामध्ये कपाळ आणि डोळे दुखणे यांचे प्रमाण अधिक असते. कोरोनामध्ये सर्दी, घसा दुखणे आढळते. डेंग्यूमध्ये हे प्रमाण कमी असते. डेंग्यूमध्ये अंगावर पुरळ आणि खाज येते. कोरोनामध्ये पुरळ येत नाहीत.

कोरोनामध्ये चव आणि वास जाण्याच्या शक्यता डेंग्यूपेक्षा अधिक असतात. उलटी, पोटदुखी, मळमळ, जुलाब हे दोन्ही तापांमध्ये असतात; पण याचे प्रमाण कोरोनामध्ये अधिक असल्याचे आढळून आले आहे. अर्थात, व्यक्ती व्यक्तीनुसार यामध्ये भिन्नता आढळून येते.

डेंग्यू हा आजार फ्लावी गटातील डेन्वी (DENV) नावाच्या विषाणूमुळे उद्भवतो. याला ‘हाडमोडी ताप’ (Breakbone) या नावानेही संबोधतात. तो डासांद्वारे पसरतो. याचे चार प्रकार आहेत. एक, तीन आणि त्या पाठोपाठ चार हे प्रकार भारतात अधिक प्रमाणात आढळतात.

तीव्रतेनुसार डेंग्यूचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे एक डेंग्यूचा सौम्य ताप. यात कमी तीव्रतेची लक्षणे असतात. घरी राहून औषधे आणि विश्रांती घेतली तर, डेंग्यूवर मात करू शकतो. रक्ताची सीबीसी नावाची चाचणी करून, यातील प्लेटलेटस् नावाच्या पेशी पुरेशा संख्येत आहेत याची खातरजमा करून घ्यावी.

दुसर्‍या टप्प्यातील आजार म्हणजे डेंग्यू हिमोरेजिक फिवर. यात प्लेटलेटस्ची संख्या कमी होत जाते. नाकातून, तोंडातून, हिरड्यातून, आतड्यांतून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. खोकला, दम लागणे, खोकल्यातून रक्त पडणे, अशी लक्षणे दिसतात. या स्थितीत रुग्णालयात दाखल व्हावे लागते आणि प्लेटलेटस्च्या संख्येवर लक्ष ठेवून गरज पडल्यास प्लेटलेटस् द्यावे लागतात. तिसरा टप्पा हा अधिक तीव्र असतो.

डेंग्यू शॉक सिंड्रोम या गंभीर प्रकारात रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट कमी होतातच; पण शरीरातील क्षार आणि द्रव यांचे प्रमाण कमी होते. रक्तदाब कमी होतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा रुग्णाला आयसीयूत दाखल करून उपचारांचा मारा करावा लागतो. त्यामुळे डेंग्यूकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार आणि काळजी घ्यावी लागते.

जर ताप कमी तीव्रतेचा असेल, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी असेल, सर्दी, घसादुखी उलट्या-जुलाब अशा तक्रारी असतील आणि आणि रक्ताची – डेंग्यूची चाचणी नकारात्मक असेल तर, तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी. जर खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मात्र, कोरोना गंभीर होण्याच्या मार्गावर असू शकतो, हे लक्षात ठेवून तातडीने पावले उचलावीत.

कोरोनाच्या रॅपिड टेस्टचा निर्णय अर्ध्या एक तासात समजतो. रक्ताच्या चाचणीवरून कोरोनाचा अंदाज येतो. समजा, डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही चाचण्या नकारात्मक आल्या तर याच सीबीसी चाचणीवरून मलेरियाचा म्हणजे हिवतापाचे निदान होते. तोही नसेल तर अशा तापाला सद्यस्थितीत कोरोना समजून घाबरून राहणे हिताचे ठरते. तातडीने घरातच आयसोलेट – म्हणजे वेगळे व्हावे. दुसर्‍या दिवशी पुन्हा टेस्ट करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर चाचण्या कराव्यात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तापाच्या कोणत्याही लक्षणांमध्ये कुठल्याही चाचणीची चालढकल करू नये. पहिली चाचणी नकारात्मक आली म्हणून, तो कोरोना नाही, असे समजून गाफील राहिल्यास, कोरोना आपल्या फुफ्फुसांवर आक्रमण करतो आणि चार – पाच दिवसांनंतर जेव्हा लक्षणे तीव्र होतात, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.

त्यामुळे जोपर्यंत आजूबाजूला कोरोना आहे, तोपर्यंत कोरोनाची शक्यता डोक्यात ठेवून तपासण्या करत राहणे आणि डोके शांत ठेवून तातडीने उपचार घेणे, हा तापावरचा सोपा उपाय आहे. अन्यथा हा ताप किती तापदायक ठरेल हे सांगता येत नाही.

हा ताप कोरोनाचा नसला तरी, नेमेचि येतो मग पावसाळा… या धरतीवर पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार पावसाळ्याची आणि त्यापाठोपाठ आपल्यापैकी अनेकांची पाठ सोडत नाहीत. डासांची संख्या पावसाळ्यात वाढते.

आपल्या आजूबाजूला जर छोटे-छोटे पाण्याचे साठे असतील किंवा अगदी एक सेंटीमीटरइतके पाणी साचून राहण्याजोगी परिस्थिती असेल तर, एडीस इजिप्ती डासांची तिथे वाढ होते आणि हे डास डेंग्यूचा प्रसार करतात. अंधारी जागा, अडगळीची जागा, दारामागचे भाग, फोटो तसबिरी यांच्या मागची जागा आणि विशेष करून काळा रंग ही या डासांची आवडते ठिकाणे. त्यामुळे घराला आतून शक्यतो पांढरट रंग द्यावा.

शक्यतो पांढरे कपडे वापरावेत आणि अर्थात घरात – घराबाहेर पाणी साठून राहू नये याची दक्षता घ्यावी. कचर्‍याचे नियोजन करावे. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. म्हणजे निदान डेंग्यूचे विषाणू आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि मग ‘नसता ताप’ असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

Back to top button