सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर गर्भारपणात टाळा | पुढारी

सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर गर्भारपणात टाळा

डॉ. प्राजक्ता पाटील

सौंदर्यसाधनेसाठी सौंदर्यप्रसाधनांचा वापर काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. बहुतेक सर्वच स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी विविध गोष्टींचा वापर करत असतात; पण या सौंदर्यप्रसाधनांमध्ये काही हानिकारक रसायनांचा वापर केला जातो, ज्याचा दुष्परिणाम स्त्रियांच्या संप्रेरकांवर अर्थात हार्मोन्सवर आणि विशेषतः त्यांच्या पुनरुत्पादन संस्थेवर गंभीर दुष्परिणाम करतात.

महिलांमध्ये वाढते वंधत्व, गर्भपाताचे प्रमाण यामागे सौंदर्यप्रसाधने हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. त्याविषयी प्रत्येक महिलेने जाणून घेणे आवश्यक आहे.

हल्लीच्या काळात महिलांमधील वाढते वंधत्व, अकाली गर्भपात यांची संख्या वाढताना दिसते. तसेच अंडाशयाचे कार्य अयोग्य पद्धतीने होण्यामागे एंडोक्राईन रसायने कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. ही रसायने स्त्रियांच्या गर्भधारणेच्या क्षमता प्रभावित करतात.

सौंदर्यप्रसाधनांमधील रसायनांचा दुष्परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये नेलपॉलिश, अँटी बॅक्टेरिअल साबण तसेच अँटी एजिंग क्रीम, हेअर स्प्रे तसेच पर्फ्युम इत्यादींचा समावेश आहे.

कसा होतो दुष्परिणाम?

अँटिबॅक्टेरिअल साबण : साबण हा अंघोळीतील महत्त्वाचा घटक आहे. साबणामध्ये विविध रसायने असतात, हल्ली अँटिबॅक्टेरिअल साबणाचे विविध प्रकार बाजारात मिळतात; पण या साबणांमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते आहे. या साबणात ट्रायक्लोसन नावाचे रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे एंडोक्राईनवर प्रभाव पडून त्याचा परिणाम थेट हार्मोन्सवर होतो. त्यामुळे पुनरुत्पादन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.

साबण, शॅम्पू आणि कंडिशनर यांच्यामध्ये वापरले जाणारे पॅराबिन्स एकप्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह आहे, ज्यामुळे जीवाणूंची निर्मिती रोखली जाते. पण त्याचे जास्त प्रमाण गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. कारण हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते त्यामुळे आरोग्यपूर्ण स्त्रीबीज आणि शुक्राणू तयार होण्याची शक्यता कमी होत जाते.

नेलपॉलिश आणि रिमूव्हर्स : ज्या महिला नियमितपणे नेलपॉलिश लावतात त्यांना यात रसायनांचे मिश्रण वापरले जाते याची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक प्रकारचे ऑरगॅनिक सयुंगे तयार होऊन ते बनलेले असते. महिला आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर ते परिणाम करते. नेलपॉलिश रिमूव्हरमध्ये काही विषारी रसायने असतात.

जसे अ‍ॅसिटोन, मिथाईल मेथाक्राईलेट, टोल्यूनी, इथाईल एसिटेट इत्यादी. टोल्युनी हे सॉल्व्हंट आहे, त्यामुळे नखांना एक चमक प्राप्त होते; पण यामुळे सीएनएस आणि पुनरुत्पादन संस्थेला नुकसान होते. फ्लाईटस देखील अशाच प्रकारचे रसायन हे जे सर्वसाधारणपणे सर्वच सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी कमी जास्त होते. गर्भावस्थेतील महिलांच्या स्तन्यात म्हणजे आईच्या दुधात मिसळले जाते.

नेलपॉलिशमध्ये आढळणारे ट्रायफिनाईल फॉस्फेटसुद्धा डायफिनाईल फॉस्फेटमुळे मेटाबोलाईज्ड होऊन स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेशी निगडित जोखीम आणि समस्या गंभीररीत्या वाढवू शकते.

तसेच या रसायनांच्या संपर्कात आल्याने गर्भपाताचा धोका वाढतोच; पण पोटीतील गर्भावर शारीरिक आणि मामसिक दोन्ही रुपांत परिणाम करू शकते. त्यामुळे बाळामध्ये शारीरिक किंवा मानसिक विकृती निर्माण होण्याची शक्यता वाढते. तसेच गर्भपात, वेळेआधी प्रसूती, कमी वजन, मेंदू, मूत्रपिंड तसेच मज्जासंस्था यांच्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो.

सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्यापूर्वी सुरक्षेचा महत्त्वाच मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सौंदर्यप्रसाधनांचा गरजेपेक्षा अधिक वापर गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यासाठीच घातक रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर कमीत कमी करावा. गर्भधारणा झाल्यानंतर तर त्यांचा वापर न केल्यास अधिक चांगले.

Back to top button